-->
आशा व अपेक्षांचे वर्ष...

आशा व अपेक्षांचे वर्ष...

2 जानेवारी 2022च्या मोहोरसाठी चिंतन आशा व अपेक्षांचे वर्ष... कालच सुरु झालेले नवीन वर्ष केवळ आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. चालू वर्ष हे आर्थिक व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. भारतीय राजकारणाला नवीन दिशा मिळेल किंवा नाही याची निश्चिती याच वर्षात होईल. गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या छायेत काढली आणि नवीन वर्षातही कोरोनाची पडछाया आपली पाठ काही सोडत नाही असे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या सोबतच आपल्याला आता सुरु झालेले २२ सालही काढावयाचे आहे, हे गृहीत धरुन चालावे लागणार आहे. त्यामुळे आपल्या तोंडावरील मास्क यंदा तरी काही खाली उतरणार नाही याची खात्री बाळगली पाहिजे. संपूर्ण जगात गेली दोन वर्षे कोरोनामुळे चिंतेत आहे हे खरे असले तरी सर्व व्यवहार थांबवून आपण घरी बसू शकत नाही हे वास्तव देखील सर्वांनी मान्य केले आहे. त्यामुळे चालू वर्षात आपल्याला सर्व खबरदारीचे उपाय हाती घेत कोरोनाशी मुकाबला करावयचा आहे. कोरोनामुळे घाबरुन घरात बसण्याचे दिवस आता संपले आहेत. गेल्य़ा दोन वर्षात जगभरात वेगवेगळ्या देशात एक-दोन-तीन-चार लाटा आल्या. त्यात लाखो लोकांना आपले जीवही गमवावे लागले. मात्र लसीकरण सुरु झाल्यापासून कोरोनाशी मुकाबला करण्याची चांगली ढाल मिळाली आणि आपण आता कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना पूर्णपणे संपणार नाही, त्याचे अस्तित्व सर्दी-ताप अशा स्वरुपाचे राहिल, असा तज्ज्ञांचा अंदाज खरा होत चालला आहे. २२ मध्ये कोरोनाचे आव्हान संपविणे हेच जगापुढचे लक्ष्य राहिल. परंतु सर्व व्यवहार करीत असताना गर्दी टाळणे हे सर्वांसाठी मोठे आव्हान असेल. आपल्याकडे रात्रीची संचारबंदी जारी केली जाते आणि दिवसा राज्यकर्त्या पक्षाच्या मोठ्यामोठ्या निवडणुकीच्या मिरवणुका काढल्या जातात. आपल्याकडे ही जी भोंदुगिरी चालू आहे, ती कधी थांबणार असा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्षात केंद्रातील सरकारने घोषणाबाजी करुन लोकांना झुलविले. यंदाच्या वर्षात देशात जशी आर्थिक पातळीवर सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार आहे तसेच राजकीयदृष्ट्याही परीक्षा होईल. केंद्रातील मोदी सरकारच्या नवीन कालखंडातील अडीज वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे केवळ अर्धाच कालखंड आता हातत राहिला आहे. गेली दोन वर्षे तर कोरोनाच्या संकटात गेली, परंतु कोरोनाची आव्हाने आपण खरोखरीच पेलली का, असा सवाल आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यंदाच्या वर्षात उत्तरप्रदेश, हरयाणा, उत्तराखंड, गोवा, हिमाचलप्रदेश, पंजाब, मणिपूर व वर्ष अखेरीस गुजरात या महत्वाच्या राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. याचा निकाल काय लागतो, त्यावरुन जनमताचा कौल सध्या काय आहे, ते समजेल. त्यादृष्टीने सत्ताधारी व विरोधकांसाठी या निवडणुका अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत. भाजपाच्या आक्रमक प्रचारापुढे विरोधकांचा कितपत निभाव लागतो ते पहावे लागेल. त्याहून जनतेच्या मनात काय आहे त्याचा अंदाज या निकालातून येईल. विरोधकांच्या यशावरच पुढील काळातील आघाड्या कशा होतील त्याची गृहीतके बांधली जातील. त्यादृष्टीने हे वर्ष म्हणजे २४च्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीमच ठरेल. राजकारणाच्या बरोबरीने अर्थकारणाच्या दृष्टीने सरकारची कसोटी लागणार आहे. गेल्या वर्षी सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे गुडघे टेकले आणि नव्याने संमंत केलेले तीन कृषी कायदे मागे घेतले. कोणाचेही ठोस नेतृत्व नसलेल्या या अराजकीय शेतकरी आंदोलनाने सरकारशी एक वर्षाहून जास्त काळ लढत दिली. सरकारने सर्व मार्गांचा अवलंब करुन हे आंदोलन चिरडण्याचा चंग बाधंला परंतु हे शेतकरी शरण येत नाहीत हे पाहिल्यावर त्यांना शरण जाण्याशिवाय सत्ताधाऱ्यांना काहीच मार्ग राहिला नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची मोठी सरशी झाली खरी परंतु आता या आंदोलनाचे प्रामुख्याने उत्तरेतील राज्यात राजकीय पडसाद निवडणुकीच्या माध्यमातून कसे उमटतात ते यंदाच्या वर्षात पहायला मिळेल. भविष्यात अशा प्रकारे कोणाशीही चर्चा न करता आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर कायदे संमंत करण्याचा सरकारने जो चंग बांधला आहे, त्याला भविष्यात निश्चित आळा बसेल. त्यादृष्टीने शेतकऱी आंदोलनाचे यश हे फार लक्षणीय आहे व त्याचे पडसाद २२ मध्ये निश्चितच उमटणार आहेत. गेल्या वर्षात शेअर बाजारात तुफान तेजी आली व निर्देशांकाने ६० हजारांची पातळी ओलांडली. परंतु याचा अर्थ आपली डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरली असा अजिबात नाही. कोरोना सुरु होण्याअगोदर एक वर्षापासून आपली अर्थव्यवस्था घसरणीला लागली होती, मात्र सरकार कोरोनाचे निमित्त करीत आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास आपली अर्थव्यवस्था पुढील दोन-तीन वर्षात रुळावळ येऊ शकते. मात्र त्यातच येत्या दोन वर्षात जागतिक पातळीवर मंदी येण्याचे संकेत मिळत आहेत, तसे झाल्यास अर्थव्यवस्था घसरु शकते. एकूण पाहता २२ साल हे आशा व आकांक्षांचे वर्ष ठरावे.

Related Posts

0 Response to "आशा व अपेक्षांचे वर्ष..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel