-->
जो गरजते है...  वो बरसते नही!

जो गरजते है... वो बरसते नही!

सोमवार दि. 20 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
जो गरजते है...
वो बरसते नही!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अखेर पाच वर्षाच्या खंडानंतर झालेली पत्रकार परिषद म्हणजे जो गरजते है वो बरसते नही या म्हणी प्रमाणेच झाली. पंतप्रधान मोदी यांनी आजवर अनेक वाहिन्यांना, वृत्तपत्रांना आपल्या मुलाखती दिल्या होत्या. अर्थातच या सर्व मुलाखती पाहिल्या की त्या मॅनेज होत्या हे कुणीही सांगेल. मात्र मोदींनी पत्रकार परिषदेत थेट प्रश्‍नांना उत्तर देण्याचे नेहमीच गेल्या पाच वर्षात टाळले आहे. मुलाखत देणे व पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देणे यात जमीन आसमानचा फरक आहे. शुक्रवारी देखील मोदींच्या ठरलेल्या पत्रकार परिषदेत अचानक मोदी आले व त्यांनी पत्रकारांपुढे भाषण दिले. ही परिषद भाजपाची असल्याने आपण उत्तरे देऊ शकत नाही असे सांगून त्यांनी सर्व प्रश्‍न शहांकडे टोलावले. याचा अर्थ स्पष्टच आहे, मोदी पत्रकारांच्या प्रश्‍नाला थेट उत्तरे देण्यास घाबरत आहेत. त्यांच्याकडे काही प्रश्‍नांची उत्तरे नाही आहेत. त्याउलट कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी ज्यांना हेच मोदी पप्पू संबोधितात ते मात्र पत्रकारपरिषदेत सफाईतदारपणे उत्तरे देताना दिसले. त्यामुळे आता पप्पू कोण असा सवाल उपस्थित होतो. पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पुन्हा एकदा केंद्रात आमची सत्ता येईल असा विश्‍वास व्यक्त केला. पाच वर्षात एकदाही पत्रकार परिषद न घेतल्याने नरेंद्र मोदींना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला उपस्थित असल्याने ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्षही लागले होते. पूर्ण बहुमत मिळून त्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे असे सांगताना पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेले सरकार येईल असा विश्‍वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. मोदींची ही पत्रकार परिषद पूर्ण एकतर्फी होती. पत्रकारांच्या प्रश्‍नाला ते खेळीमेळीच्या वातावरणात उत्तरे देतील ही अपेक्षाच फोल ठरली. मोदींनी नेहमीप्रमाणे या पत्रकार परिषदेतही भाषणच केले. भारत हा जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जगावर आपल्या देशाने छाप सोडली पाहिजे असे मला वाटते. आपल्या देशात विविधेतली एकता आहे आणि ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र होतात. रमजान, ईस्टर, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, हनुमान जयंती सगळं एकत्ररित्या सुरू आहे. सोशल मीडिया आल्याने पत्रकारांनाही कष्ट उपसावे लागले आहेत. निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा खूप चांगला अनुभव होता, असे नरेंद्र मोदींनी यात गुर्‍हाळ लावले. पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषद घेतली आणि ती सर्वार्थाने फ्लॉप ठरली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा स्तर अतिशय खालच्या पातळीला गेला असे आरोप होत असताना पत्रकारांनी त्यावर प्रश्‍न विचारला. त्यास उत्तर देताना, अमित शहा यांनी ते विरोधकांचे काम आहे. ते अशा स्वरुपाचे आरोप करत आहेत. परंतु, भ्रष्टाचार झाला असे सांगण्यात काहीच गैर नाही असे शहा म्हणाले. त्यातही सर्वात महत्वाचे म्हणजे, या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचार आणि महागाई हे विरोधकांचे मुद्दे नव्हते असा दावा शहा यांनी केला. पश्‍चिम बंगालमध्ये जो हिंसाचार झाला त्यास तेथील भाजपाचे कार्यकर्ते जबाबदार आहेत, हे सर्च जण सांगतात. परंतु शह मात्र सज्जनाचा पुतळा असल्यासारखे विधान करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेत सर्वच प्रश्‍नांची उत्तरे केवळ शहांनीचट दिली. यावर आक्षेप घेऊन पत्रकारांनी मोदींनाही उत्तरे देण्याची विनंती केली. त्यावर बोलताना, पार्टीचे अध्यक्षच आमच्यासाठी सर्वस्व आहेत असे म्हणत मोदींनी उत्तरे देण्यास नकार दिला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानांवरही प्रश्‍न विचारण्यात आले. भाजपची सत्ता आल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांच्यावर काही कारवाई करणार का? किंवा भाजप त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार का? असा प्रश्‍न करण्यात आला. त्यावर कुठल्याही स्वरुपाचे स्पष्ट उत्तर देण्यास शहांनी नकार दिला. यासंदर्भातील निर्णय पक्षात चर्चेनंतरच घेतला जाईल असे संकेत त्यांनी दिले. मात्र दुसरीकडे एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साध्वी प्रज्ञावर बोलताना, त्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले आहे. गांधीजी किंवा नथुराम यांच्यावर अशा स्वरुपाची विधाने करणे अतिशय वाइट आणि समाजासाठी चुकीची आहेत. त्यांनी याबद्दल माफी मागितली ही गोष्ट वेगळी. परंतु, मी त्यांना कधीच पूर्णपणे माफ करू शकणार नाही. असे मोदींनी स्पष्ट केले. असे असले तरी त्यांच्याच पक्षाने त्यांना निवडणुकीत तिकिट दिले आहे. मग सध्याचे हे मोदींचे आश्रु म्हणजे नक्राशू आहेत, असेच म्हणावे लागते.
------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "जो गरजते है... वो बरसते नही!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel