-->
संपादकीय पान गुरुवार दि. २ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
कौटुंबिक शेतीचे वर्ष
-----------------------
संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष हे जागतिक पातळीवरील कौटुंबिक शेती वर्ष म्हणून जाहीर केले आहे. आपल्या देशात असो किंवा जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात शेतकर्‍याची कुटुंबे शेतात काबाडकष्ट करीत असतात. नैर्सगिक संकट असो वा मनुष्य निर्मित संकटे यावर मात करीत शेतकर्‍याची ही कुटुंबे शेतात कष्ट करुन उत्पादन काढतात. त्यातून त्यांचे पोट तर भरतेच. मात्र त्याबरोबरीन जगाचेही पोट ते भरीत असतात. अशा या शेतकर्‍यांच्या कुटुंबांप्रति आदर तसेच आभार व्यक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने या वर्षाचे आयोजन केले आहे. अशा प्रकारे शेतकरी कुटुंबांचे वर्ष साजरे करण्याची ही पहिल्यांदाच वेळ आहे. यातून जगाची अन्नसुरक्षा करणे व गरीबी, दारिद्—य हटविणे ही उद्दिष्टे यातून साध्य केली जाणार आहेत. जगातील वाढती अन्नची मागणी, कुपोषण हटविणे, रोजगारसंधी वाढविणे यात शेती तसेच शेतकरी कुटुंब मोठी कामगिरी करु शकते. जगात एकूण ५० कोटी शेतकरी कुंटुंबे आहेत. बहुतांशी शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आपल्या शेतातील बहुतांश कामे ही शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ शेतात काम करुन केली जातात. विकसनशील देशांमध्ये ८० टक्के कौटुंबिक शेती ही केली जाते. या शेतकरी कुटुंबांना अधिक प्रगत तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रशिक्षण दिल्यास त्याचा उत्पादन वाढीसाठी उपयोग होऊ शकतो. यातून सर्वांचेच हित साध्य होईल. आपल्या देशाचा विचार करता आपली अर्थव्यवस्था ही ७० टक्के शेतीवर अवलंबून आहे. अजूनही आपल्याकडे शेती ही पारंपारिक पध्दतीने केली जाते. अनेकदा शेतीचे नुकसान हे अस्मानी किंवा सुलतानी अशाच पध्दतीने होते. यातील अस्मानी आपण एकवेळ बाजुला ठेवू परंतु सुल्तानी म्हणजे मनुष्य निर्मित होणारे नुकसान कमी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्राचा विचार करता आपल्या सुमारे ११ कोटी लोकसंख्येपैकी पाच कोटीहून जास्त लोक ग्रामीण भागात राहातात. यातील बहुतांशी लोक हे शेतीशी किंवा शेतीशी निगडीत व्यवसायावर अवलंबून आहेत. राज्यातील केवळ १८ टक्के क्षेत्रफळ हे सिंचनाखाली आले आहे. त्यावरुन आपल्याला अजून किती मोठी मजल मारावयाची आहे ते स्पष्ट दिसते. उर्वरित जिरायती शेती ही पावसावर अवलंबून आहे. राज्यात दुष्काळग्रस्त जमीन ५२ टक्के आहे आणि त्यातील ४२ टक्के जमीन ही हलकी व भरड प्रकारतली आहे. यावर मात करीत शेतकरी आज ठामपणे उभा आहे. एक समाधानाची बाब म्हणजे काही वर्षापूर्वी शेती म्हणजे तोट्यातच चालायची. यातून जेमतेम नफा मिळायचा किंवा तोटाच होणार असे आजवर शेतकर्‍यांचे मत होते. मात्र आता तरुण पिढीचे मत आता बदलत चालले आहे. त्यामुळे आधुनिक शेती करण्यासाठी म्हणून तरुण शेतकरी पिढी पुढे येत आहे. शेततीही नवीन प्रयोग करण्यास शेतकर्‍यांनी सुरुवात केली आहे. यात नवीन तंत्रज्ञान व कमीत कमी नुकसानीत शेती करण्यासाठी प्र.त्न सुरु करण्यात आले आहेत. यात शेतकर्‍यांच्या तरुण मुलांनी सुरुवात केली आहे. राज्यात जे शेतकरी आहेत त्यांच्यात १६ ते ३५ वयोगटातील शेतकर्‍यांची संख्या मोठी असल्याचे अलीकडे झालेल्या एका पहाणीत आढळले आहे. आर्श्‍चयाची बाब म्हणजे उत्तरप्रदेशातील सर्वात जास्त तरुण शेतीत आहेत. तर त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यात सर्वाधिक युवक शेती व शेतीसंलग्न व्यवसायात कार्यरत आहेत. ही एक सकारात्मक बाब ठरावी. गेल्या पाच वर्षात मोबाईलचा वापर खेडे पातळीवर पोहोचल्याने मोबाईल क्रांती शेतकर्‍यापर्यंत पोहोचली. सोशल नेटवर्किंग व व्हॉटस् ऍपसारखे अनेक ऍपचा वापर तरुण शेतकरी करु लागला आहे. याचा वापर करुन आपल्या शेतीत कसे नवनवीन प्रयोग करता येतील ते हे तरुण शेतकरी पाहत आहेत. मोबाईलचा वापर करुन कीड रोगाची परिस्थिती, सल्ला याबाबत मार्गदर्शन शेतकरी मिळवू लागला आहे. त्यामुळे शेती आता हायटेक होऊ लागली आहे. परंतु हे लोण सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्याकडे गेल्या पाच वर्षात शेतकर्‍यांच्या झालेल्या आत्महत्येमुळे राज्यावर मोठा बट्टा लागला होता. आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील शेतकरी प्रामुख्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत असल्याने त्याचे पडसाद देशात उमटत होते. आंध्रप्रदेशाने या समस्येवर मात केली. मात्र महाराष्ट्राच्या नशीबी आत्महत्येचा हा सिलसिला चालूच राहिला आहे. परंतु यंदाची ताजी आकडेवारी पाहता आत्महत्येच्या प्रकरणात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. २००६ साली आत्मह्त्या झालेल्यांची संख्या सर्वोच्च गेली होती. मात्र आता ही संख्या उतरमीला लागली आणि गेल्या वर्षी केवळ ७५२ आत्महत्या झाल्या. परंतु ही संख्या शून्यावर आली पाहिजे. शेती हा व्यवसाय म्हणून केला पाहिजे. त्यात नवे तंत्रज्ञान आले पाहिजे. शासकीय पातळीवर याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. नवीन शेतीची कंत्राटी पध्दत स्वीकारण्यापेक्षा सामुहिक शेतीचा प्रयोग हे त्यावरील उत्तर ठरु शकते. यंदाच्या कौटुंबिक शेती वर्षाच्या निमित्ताने हे प्रश्‍न मार्गी लागल्यास बळीराजाला मोठा दिलासा मिळेल.
-----------------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel