-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ३ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
राजकारणाची नवी पहाट?
-----------------------
सध्या राजकारण हे फक्त पैसेवाल्यांचे काम आहे आणि राजकारणात पैसा हा दोन नंबरच्या कामातून कमविणारेच टाकू शकतात अशी एक सर्वसामान्य लोकांची ठाम समजूत आहे. अशी समजूत तयार होण्यामागे कॉँग्रेस व भाजपाच्या तसेच देशातील विविध पक्षांनी आज भांडवली विचारसारणीला पकडून जे राजकारण केले त्याचा परिणाम आहे. या समजुतीला नेहमीच डाव्या पक्षांच्या नेत्यांनी छेद दिला आहे. परंतु आता अरविद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षा(आप)ने दिल्लीतील निवडणुक लोकांकडून निधी जमवून लढविली. त्यावरुन निवडणुका या केवळ पैशाच्या जोरावरच जिंकता येतात हे समीकरणच चुकीचे ठरविले. आम आदमी पक्षाला जरुर दिल्लीत आपल्या बळावर बहुमत मिळविता आले नाही. परंतु दुसर्‍या क्रमांकाची मते त्यांनी पारंपारिक पक्षांना टक्कर देत मिळविली हे महत्वाचे आहे. दिल्लीत सत्तेवर असलेल्या कॉँग्रेस पक्षाला व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचारासाठी तुफान पैसा भांडवलदारांकडून घेऊन तो निवडणुकीत ओतणार्‍या भाजपाशी आम आदमी पक्षाने जोरदार टक्कर दिली. आम आदमीकडे ना पैसा होता ना फारसे मनुष्यबळ. मात्र लोकांचा पाठिंबा होता. लोकांना या देशातून भ्रष्टाचार निपटला जावा असे मनापासून वाटत होते. अर्थात सर्वच पारंपारिक पक्ष जेवताना जसे तोंडी लोणचे लावले जाते तसे भ्रष्टाचार विरोधी गप्पा करीत असतात. पंरतु भ्रष्टाचार करणारे हे लोकच भ्रष्टाचार कसा निपटणार हे लोकांनाही पटत होते. परंतु दिल्लीतील जनतेला यात योग्य पर्याय दिसत नव्हता. आम आदमी पक्षाने हा पर्याय त्यांना उपलब्ध केला. भ्रष्टाचाराबाबत कॉँग्रेस व भाजपा हे एकाच माळेचे मणी आहेत. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसवर भ्रष्टाचाराचे कितीही आरोप केले तरीही भाजपा हा पक्ष भ्रष्टाचारापासून दूर नाही. कर्नाटकात तर त्यांची सत्ता याच मुद्द्यावरुन गेली आणि आता त्याच माजी मुख्यमंत्र्याला पुन्हा भाजपात प्रवेश दिला जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा देशभर सुरु आहेत, दिल्लीतही त्यांच्या सभा झाल्या. मात्र लोकांनी त्यांच्यावर विश्‍वास टाकला नाही आणि आपच्या बाजूने कौल दिला आहे. आज देशात मध्यमवर्गीयांची संख्या २५ कोटीहून जास्त झाली आहे. या सर्व सुशिक्षित वर्गाला देशात सुशासन हवे आहे. त्यासाठी देश भ्रष्टाचारापासून मुक्त असणे आवश्यक वाटत होते. आजवर हा वर्ग राजकारणापासून अलिप्त राहिला. परंतु आम आदमी पक्ष त्यांना सर्वच बाबतीत भोवला. तसेच आम आदमी पक्षाची पाटी कोरी असल्याने त्यांच्या सांगण्यावर विश्‍वास टाकून पाहू असे त्यांना मनोमन वाटले. यातूनच दिल्लीत त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले. अर्थातच हे मतदान म्हणजे दिल्लतील मतदारांनी पारंपारिक पक्षांवर दाखविलेला अविश्‍वास होता. राजकारण हे केवळ भ्रष्ट लोकच करु शकतात हे समिकरण त्यांनी तोडून दाखविले. यातूनच आता सर्वच पक्षांची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु झालेली असताना आपने स्वच्छ प्रतिमा असलेल्या विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांनी राजकारणात उतरावे असे आवाहन केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपच्या आवाहनाला फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री हे आपली ऍपलमधील करोडो रुपेय पगाराची अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात येऊन आपमध्ये दाखल होत आहेत. इन्फोसिस या नामवंत आय.टी. कंपनीतून निवृत्ती घेतल्यावर व्ही. बालकृष्णन हे आपमध्ये सामिल होत आहेत. अशा प्रकारे अनेक नामवंत लोक आपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. यांना राजकारणात येऊन काही पैसा कमवायचा नाही. तर ते आर्थिकदृष्ट्या समृध्द आहेत मात्र त्यांना समाजसेवेची आवड आहे, परंतु सध्याच्या राजकारणात ते प्रवेश करण्यास इच्छुक नसल्याने ते आपच्या दिंडीत सामिल होत आहेत. अशा प्रकारे आपने एक नवा वर्ग राजकारणाच्या प्रवाहात आणला. इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी देखील आप संबंधी चांगले मत व्यक्त केले आहे. एच.डी.एफ.सी. समूहाचे अध्यक्ष दिपक पारेख यांनी देखील आपच्या निमित्ताने भारतीय राजकारणात एक नवा प्रवाह सुरु होत आहे. अशा प्रकारे नारायण मूर्ती व दीपक पारेख या उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांनी अशा प्रकारे आपची स्तुती केल्याने आपच्या स्वच्छ राजकारणाच्या नव्या मिशनला एक प्रकारे बळच मिळाले आहे. आपमध्ये येण्यास मीरा सन्याल या बँकर, समाजवादी पक्षाचे नेते कमल फारुखी, कॉँग्रेसमधील अलका लाम्बा हे येण्याच्या तयारीत आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनातून केजरीवाल हे सक्रीय समाजसेवेत उतरले. या आंदोलनाच्या दरम्यान केजरीवाल यांनी लोकांतील असंतोष नेमका हेरला आणि राजकीय पक्ष काढल्यास आपल्याला उत्तम पाठिंबा मिळू शकतो याचा बरोबर अंदाज बांधला. त्यांच ाहा होरा योग्यच ठरला आणि दिल्लीत आम आदमीला भरघोस प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारे राजकारणात उतरु पाहाणार्‍या एका वर्गाला केजरीवाल यांनी आपच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ तयार करुन दिले आहे. यातून आपल्याकडे राजकारणाला एक नवी दिशा मिळू शकते. राजकारणाची ही नवी पहाट ठरेल का ते काळच ठरविणार आहे.
----------------------------------------          

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel