-->
24*365

24*365

शुक्रवार दि. 22 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
24*365
राज्यातली दुकाने, रेस्तराँ, मॉल आता आठवड्यातील सातही दिवस 24 तास सुरू ठेवता येणार आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 हा अधिनियम 19 डिसेंबरपासून राज्यात लागू केला आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात याबाबतचे विधेयक मंजूर झाले होते. मात्र अधिसूचना निघाली नव्हती. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले आहे. 30 लाखांपेक्षा जास्त आस्थापनांना याचा फायदा होणार आहे. सर्व दुकाने, आस्थापना, रेस्तराँ, मॉल आदींना वर्षातील 365 दिवस व दिवसातील तीन शिफ्टमध्ये म्हणजेच 24 तास उघडे ठेवता येतील. त्यांना दुकान उघडणे व बंद करण्याच्या वेळाही स्वत:च ठरवता येतील. मद्यविक्री दुकाने, वाइन शॉप, बार, पब, हुक्का पार्लर, ऑर्केस्ट्रा, थिएटर्स यांनाही वर्षातील 365 दिवस व्यवसाय चालू ठेवण्याची संमती मिळाली आहे. राज्यात यापूर्वी दुकाने व आस्थापना यांना आठवड्यातून एक दिवस आपला व्यवसाय बंद ठेवावा लागत असे. दुकाने बंद करण्याच्या वेळा लवकर होत्या. दहा पेक्षा कमी कामगार असणार्‍या लघु व मध्यम आस्थापनांना सरकार किंवा मनपाकडे नोंदणीची गरज नाही. आता त्यांना फक्त विहित कागदपत्रांसह व्यवसाय सुरू केल्याची ऑनलाइन सूचना सरकारला द्यावी लागेल. त्याची पोेच पावतीही ऑनलाइनच मिळेल. दहापेक्षा अधिक कामगार ठेवणार्‍या स्थापना नोंदणी करण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. नव्या अधिनियमानुसार महिलांना आता पूर्ण वेळ रात्रपाळी म्हणजे रात्री 9.30 ते सकाळी 7 वाजेपर्यंतची ड्युटी करता येईल. मात्र त्यांच्या सुरक्षेची तसेच घरापर्यंत ने-आण करण्याची वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी संबंधित अस्थापनांवर असेल. दुकाने सातही दिवस खुली असणार असली तरी कामगारांना आठवड्याची सुट्टी देण्याचे या कायद्यान्वये बंधनकारक केले आहे. दुकाने अथवा अन्य जनतेच्या गरजेच्या वस्तू विकणार्‍या आस्थापने 24 तास खुली ठेवण्याच्या निर्णयाचा मुंबई, पुण्यासारख्या महानगरांना मोठा फायदा होणार आहे. कारण मुंबईसारखी महानगरे ही कधीच झोपत नाहीत. त्यामुळे येथील काही भागात दुकाने प्रामुख्याने हॉटेल्स उघडी ठेवल्यास जनतेला त्याचा लाभ घेता येईल. मात्र यात कामगार कायद्यांचे कुठे उल्लांघन होणार नाही हे तपासले पाहिजे. प्रामुख्याने महिला कर्मचार्‍यांना सुरक्षितता पुरविली गेली पाहिजे. मुंबईतील रात्रपळीत काम करणार्‍या कामगारांपासून ते कॉलसेंटरच्या लोकांसाठी, बाहेरगावातून मध्यरात्रीनंतर शहरात उतरणार्‍यांसाठी याचा उपयोग होईल.
----------------------------------------------------------------- 

0 Response to "24*365"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel