-->
निकालानंतरची समीकरणे...

निकालानंतरची समीकरणे...

रविवार दि. 19 मे 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
निकालानंतरची समीकरणे...
-----------------------------------------
आज सातव्या टप्प्याचे मतदान संपल्यावर विविध चॅनल्सचे मतदार पाहणी अहवाल संध्याकाळी प्रसिध्द होतील. हे निकाल कोणाच्याही बाजुने लागले तरी ते खरोखरीच निकाल लागल्यासारखी चर्चा चॅनेल्सवर झडेल. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे गुरुवारी 23 मे रोजी प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होऊन त्याचे निकाल लागतील. यावेळी कोण सत्तेत येणार? हा मतदारांचा कौल जनतेपुढे येईल. निकालाबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुन्हा भाजपा येणार की विरोधी पक्ष सत्तेत येणार? यावेळच्या संसदेत एकाच पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल की त्रिशंकू स्थिती असेल? असे अनेक प्रश्‍न सर्वांसमोर पडलेले आहेत. देशातील जनता नेमका कोणता कौल देणार? या प्रश्‍नाचे उत्तर मिळायला आता केवळ चारच दिवस थांबावे लागेल. परंतु हा निकाल लागेपर्यंत आपण जनमनाचा कानोसा काय असेल त्याचा एक अंदाज घेेऊ शकतो. यावेळी निवडणूक प्रचार हा अत्यंत खालच्या पातळीवर गेला. आपल्या लोकशाहीचा पाया कसा ढासळत चालला आहे त्याचेच ते द्योतक म्हणावे लागेल. प्रचारात खरे तर जनतेच्या प्रश्‍नांची दखल घेतली जावी अशी अपेक्षा व संकेत असतात. परंतु सत्तधारी भाजपाने जनतेचे प्रश्‍न कसे न मांडले जातील व जनतेच्या प्रश्‍नाबाबत कसे दुर्लक्ष होईल हे जाणीवपूर्वक पाहिले. त्यासाठी त्यांनी राजीव गांधी कुटुंबियांचा विराट युद्दनौकेवरील प्रवासापासून ते नेहरुंमुळे कुंभमेळ्यात ठार झालेले लोक असे अनेक निवडणुकीच्या मूळ प्रश्‍नांशी विषयांतर करणावे विषय काढण्यात आले. त्याचा भाजपाला फायदा खरोखरीच होणार किंवा नाही, हे आता 23ला स्पष्ट होईल. यावेळच्या निवडणुकीची कधी नव्हे एवढी उत्सुकता ताणली गेली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. यावेळी मोदींचे समर्थक व त्यांचे विरोधक अशी ही लढाई खेळली गेली आहे. हिंदुत्ववाद विरुध्द सर्वधर्मसभाव असेही या लढाईचे स्वरुप आहे. गेल्या वेळची निवडणूक मोदींनी भ्रष्टाचार, काळा पैसा, रोजगार या प्रश्‍नावर रान उठवून जिंकली होती. जी आश्‍वासने मोदींनी दिली होती त्याची पूर्तता ते काही करु शकलेले नाहीत. त्यामुळे यावेळी मोदींनी हिंदुत्वाच्या भावनिक प्रश्‍नावर ही निवडणूक लढविण्याचा चंग बांधला. काही करुन मोदीच जिंकणार असे त्यांचे समर्थक म्हणतात तर देशात लोकशाही टिकावी अशा लोकांना, पक्षांना मोदींची गच्छंती व्हावी असे मनापासून वाटते. यातील कोणत्या शक्तींचा विजय होणार? हा सवाल आहे.
यावेळी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल अशी परिस्थिती नाही. निदान सध्या तरी तसे वातावरण दिसत नाही. त्यामुळे त्रिशंकू लोकसभा यावेळी अस्तित्वात असेल, हे नक्की आहे. अशा स्थितीत कोणते पर्याय असतील याचा आपण विचार करु-
पर्याय एक- नरेंद्र मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने 2014 च्या तुलनेत यावेळी शंभर जागा गमावल्या त्यांच्या जागा 170 ते 190 च्या दरम्यान आल्या, असे गृहीत धरले तर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल. त्यांचे सहकारी पक्ष शिवसेना, जनता दल संयुक्त, अकाली दल व एआयडीएमके या पक्षांना मिळून 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वखालील आघाडी संपूर्ण बहुमताच्या दिशेने सहजरित्या वाटचाल करेलअ से काही दिसत नाही. मग त्यांना साथ द्यायला तेलंगणातून के. चंद्रशेखर राव, आंध्रप्रदेशातून जगमोहन रेड्डी, ओरिसातून बिजू जनता दल व काही अपक्ष भाजपाच्या आघाडीला मदत करण्यास पुढे येऊ शकतात. अशा स्थितीत मोदी बहुमताच्या दिशेने म्हणजे 280 जागा मिळविण्यासाठी पूर्ण बाजी लावून वाटचाल करु शकतात.
पर्याय दुसरा- जर भाजपाने 150 ते 170 जागा जिंकल्या व दुसरीकडे कॉँग्रेसने 100 चा आकडा पार केल्यास स्थानिक पक्षांची मदत मिळवून घेऊन सरकार स्थापन सहजरित्या करणे भाजपाला शक्य होणार नाही. असा स्थितीत मोदी-शहा हे समाजवादी पक्ष व बहुजन समाज पार्टीच्या आघाडीला तडा देण्याचे काम करतील व मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला साम-दाम-दंड दाखवून आपल्याकडे केचण्याचा प्रयत्न करतील. यात मायावती भाजपाच्या दिशेने झुकू शकतात. नाही तरी त्यांनी यापूर्वी भाजपाच्या केंद्रातील व उत्तरप्रदेशातील सरकारला पाठिंबा दिलेलाच होता.
पर्याय तिसरा- भाजपाला मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणे शक्य होत नसेल तर म्हणजेच ही जोडगोळी अन्य पक्षांचा पाठिंबा मिळविण्यास असमर्थ ठरली तर पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी, राजनाथ सिंग, नितिश कुमार किंवा नवीन पटनाईक यांची नावे पुढे येऊ शकतात. भाजपामधूनच जर पंतप्रधान करावयाचा झाल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाच्या पदरात आपले माप घालतो ते पहावे लागेल. खरे तर मोदी या दोघांनाही आपली पसंती देणार नाहीत. संघाला देखील मोदी-शहा डोईजड वाटू लागल्याने नकोसे झाले आहेत अशी काणकूण असताना संग आपल्या विश्‍वासातील नेत्याची वर्णी लावेल. त्याच गडकरींचे नाव आघाडीवर असेल. किंवा भाजपा आघाडीतील अन्य सहकारी पक्षातील नेता म्हणजे नितीश कुमार, नवीन पटनाईक यांना पंतप्रधान करण्यासंबंधी विचार केला जाऊ शकतो.
पर्याय चौथा- भाजपा जर 160च्या आकड्याच्या आसपास घुटमळला व कॉँग्रेसने 100 सदस्य पार केले तर विरोधकांच्या आघाड्यांना जोर येईल, यात काही शंका नाही. कारण भाजपाला सरकार स्थापण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे व कॉँग्रेसलाही बिगर भाजपा सरकार स्थापण्यासाठी नैतिक बळ लाभेल. अशा स्थितीत चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, मुलायमसिंग यादव, मायावती, शरद पवार यांच्यांतून नावे निवडावी लागतील. अशा स्थितीत काँग्रेस कोणाच्या पारड्यात आपले माप टाकेल तो पंतप्रधान होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर सेक्युलर पक्षांची निवडणूक निकालानंतर एक नवी आघाडीही जन्माला येऊ शकते. अशा वेळी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद असलेले तसेच देशातील उद्योगपतींना सर्वमान्य होईल असे नाव शरद पवारांचेच असू शकते. कॉँग्रेस जर सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून 100च्या वर पोहोचला तर कर्नाटकातील कुमारस्वामींचा फॉर्म्युला ते ंमलात आणण्याचा प्रयत्न करतील. असा स्थितीत कदाचित कॉँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी न होता, बाहेरुन पाठिंबा देऊ शकतो. किंवा 135 च्या वर जागा कॉँग्रेसच्या गेल्यास सत्तेतही सहभागी होईल. 2004 साली कॉँग्रेसला 145 जागा होत्या आणि त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात अल्पमतातील सरकार स्थापन केले होते. हे सरकार किमान समान कार्यक्रम आखून उत्तमरित्या चालले आणि पाच वर्षानंतर कॉँग्रसने आपले खासदार तब्बल 206 वर नेले होते. मात्र त्यानंतर मोदी लाटेत हीच संख्या 2014 साली 44 वर खाली आली. वाजपेयींच्या सरकारने शायनिंग इंडियाचा गाजावाजा करुनही त्यांना 2009 साली सत्ता काबीज करता आली नव्हती. तर 1977 साली कॉँग्रेसचा जनता पार्टीने दारुण पराभव केल्यावर केवळ तीनच वर्षांनी 1980 साली कॉँग्रेस पुन्हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेत येईल असे वाटलेही नव्हेत. त्यामुळे राजकारण हे सेच धक्का देणारे असते. जनतेची नाडी ओळखता येमे कठीण असते. आता देखील चार दिवसांनी नेमके काय होईल हे आत्ता सांगणे कठीण आहे. फक्त आपण तर्क लढवू शकतो...
------------------------------------------------------ 

0 Response to "निकालानंतरची समीकरणे..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel