-->
कोरोनात गेले आणखी एक वर्ष

कोरोनात गेले आणखी एक वर्ष

कोरोनात गेले आणखी एक वर्ष नवीन वर्षाच्या स्वागताला जग सज्ज झालेले असताना कोरोनाचे सावट व धोका आजही दोन वर्षानंतर कायम आहे. 2022 मध्ये तरी कोरोना आपली सर्वांची पाठ सोडेल का, अशी प्रत्येकाच्या मनात चिंता कायम करुन आहे. 2019 च्या वर्षात चीनमधून सुरु झालेला हा कोरोना 2020 मध्ये जागतिक पातळीवर पोहोचला होता. पहिली लाट संपली आणि दुसऱ्या लाटेने देशात धुमाकूळ घातला. आपल्याकडे दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा होता. स्मशानभूमीत प्रेते जाळण्यासाठी लागलेल्या रांगा पाहून कोरोना आपल्याला कुठे नेणार असे वाटले होते. पहिल्या लाटेतल्या लॉकडाऊनमध्ये कष्टकऱ्यापासून ते मध्यमवर्गींपर्यंत सर्वांचेचे हाल झाले होते. माञ पहिल्या लाटेनंतर जनजीवन पुर्ववत होत असतानाच दुसऱ्या लाटेचा तडाखा आला. दुसरी लाट ही सर्वात जास्त वेदनादायी होती. या लाटेल प्रत्येकाला आपले आप्त किंवा मिञमंडळीत कुणीतरी गमवावा लागला. केंद्र सरकारने अशा गंभीर प्रसंगात लोकांना वाचविण्याठी ज्या उपाययोजना करणे गरजेचे होते ते काही केल्या नाहीत, केवळ घोषणाबाजीच केली. सरकारच्या नकर्तेपणामुळेच अनेक डॉक्टरांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. अर्थात अशा कठीण प्रसंगी सामाजिक सेवा म्हणून झटणारे डॉक्टर्सही होते. आपल्याकडे दुसरी लाट सुरु असताना जगातील अनेक देशात तिसरी किंवा चौथी लाट होती. कोरोनावर मात करावयाची असेल तर त्यावर लसच उपयोगी ठरणार आहे, याची खूणगाठ त्यांनी बांधली होती. त्यादृष्टीने जागतिक पातळीवर सुरु झालेल्या प्रयत्नांना यश आले व 21 च्या प्रारंभी लसीकरणास प्रारंभ झाला. आता आपण शंभर कोटी लस देण्याचे उदिष्ट साध्य केले असले तरी अजून मोठा पल्ला पार करावयाचा आहे. शंभर कोटी लसीकरण ही 130 कोटी जनतेच्या लोकसंख्येत फार मोठी बाब नाही. जेवढ्या वेगाने लसीकरण होईल तेवढ्या समर्थपणाने आपल्याला आगामी काळात कोरोनाशी मुकाबला करता येणार आहे. आता 2021 सालाला निरोप देत असताना कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरियंटने जोरदार हल्ला सुरु केला आहे. आफ्रिकेत आढळलेल्या या व्हेरियंटने आता संपूर्ण जगात शिरकाव केला आहे. आपल्याकडेही ओमीक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने नवीन वर्षाचे स्वागत करताना ही टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहे. ओमीक्रॉनचा प्रसार झपाट्याने होतो आहे. माञ समाधानाची बाब म्हणजे, यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करावेच लागते असे नव्हे. तसेच या रुग्णांना लक्षणेही मामुली दिसतात व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. बहुतांशी रुग्णांना ऑक्सीजनचीही गरज भासत नाही. त्यामुळे ओमिक्रॉन हा झपाट्याने पसरेल व लोकांमध्ये यातून प्रतिकारशक्ती निर्माण होईल. शेवटी पँन्डेमिकचे रुपांतर काही काळाने एन्डेमिकमध्ये होईल असा तज्जांचा एक अंदाज आहे. हे खरे झाल्यास कोरनाचा अवतार 2022 मध्ये संपुष्टात येऊ शकतो. कोरोना पूर्णपणे संपणे अशक्य आहे, माञ अन्या साथीच्या रोगांप्रमाणे त्याचे अस्तित्व राहिल, असेही बोलले जाते. असे झाले तरी मोठा दिलासा जगाला मिळेल. आजवर दर शंभर वर्षाने येणाऱ्या महामारीचा अंत हा तीन वर्षात होतो असे इतिहास सांगतो. त्यानुसार पाहिल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या साथीनंतर यंदा 22 सालात कोरोना संपेल अशी अपेक्षा आपण ठेऊ शकतो. आगामी वर्षात कोरोनाचा कहर सौम्य असेल कारण आपल्याकडे त्याच्याशी लढण्यासाठी लस आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्याचे दिवस आता संपले आहेत. जर कोरोनाचा कहर वाढलाच तर कडक निर्बंध जारी केले जाऊ शकतात परंतु लॉकडाऊन लादणे हा त्यावरील प्रभावी उपाय नव्हे हे आता सर्वांनाच पटले आहे. त्यामुळे लॉकडाऊनची आता भीती बाळगणे चुकीचे आहे. आपण कोरोनाची भीती बाळगून अर्थव्यवस्था कुंठीत करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. आता पुन्हा लॉकडाऊन लादल्यास सरकार किंवा जनतेला परवडणारे नाही. आपल्याकडे आता हळूहळू जनजीवन पूर्ववत आले आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद करुन ऑफिस सुरु केली आहेत. जानेवारीपासून अनेक कंपन्यांची कार्यालये सुरु होत आहेत. गेल्या दोन वर्षात अर्थव्यवस्थेला जो फटका बसला आहे, त्यातून बाहेर येण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील असा अंदाज व्यक्त होत आहे. ओमीक्रॉनचा धोका गृहीत धरला तरीही पुन्हा लॉकडाऊनची पाळी येणार नाही हे नक्की. जनतेने यासंबंधी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. सरकार काहि करेल या भ्रमात न राहता आपल्याला काही गोष्टी स्वबळावरच केल्या पाहिजेत. कोरोनाने आपल्याला गेल्या दोन वर्षात बरेच धडे शिकविले आहेत. त्यातून बोध घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. देशाची रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था आता पुन्हा उभारी घेत आहे. कोरोनाच्या अगोदरच आपली अर्थव्यवस्था घसरायला सुरुवात झाली होती. कोरोना हे त्यात भर पडण्याचे निमित्त झाले. देशातील शेअर बाजार निर्देशांक 60 हजारांवर पोहोचला म्हणजे आपली अर्थव्यवस्था उत्तम आहे या भ्रमात कुणी राहू नये. नवीन वर्षात 22 साली आपल्याला कोरोना विषयी खबरदारी ही बाळगावी लागणारच आहे. आपल्या चेहऱ्यावरील मास्क 22 मध्येही ठेवावाच लागणार आहे. परंतु कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व जनतेचे लसीकरण व बुस्टर डोसही आवश्यक ठरणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रभावात गेली, आगामी वर्षात हा प्रभाव निश्चित कमी होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. सर्वांना नवीन वर्षाच्या तसेच कोरोना मुक्तीसाठी शुभेच्छा. ----—--------------------------

Related Posts

0 Response to "कोरोनात गेले आणखी एक वर्ष"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel