-->
पुन्हा भाजपाच!

पुन्हा भाजपाच!

शुक्रवार दि. 24 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पुन्हा भाजपाच!
देशातील लोकसभेच्या झालेल्या निवडणुकात जनतेने पुन्हा एकदा भाजपा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या बाजुने कौल दिला आहे. विरोधकांसाठी काहीसे अनपेक्षीत असे निकाल असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणुकीच्या नियोजनाचे हे फलित आहे असे म्हणावे लागेल. जातिय, धार्मिक तेढ निर्माण झाली तरी चालेल परंतु आपल्यालाच सत्ता मिळाली पाहिजे, हे त्यांचे सुत्र यशस्वी झाले आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमध्ये जी तेढ भाजपाने तयार केली ते पाहता मतांचे केंद्रीकरण करण्यात भाजपा यशस्वी होणार हे दिसतच होते. या विजयांचे श्रेय सर्वस्वी मोदी व शहा या दोघांकडेच जाते. गेल्या डिसेंबर महिन्यात कॉँग्रेसने तीन राज्यातील सत्ता काबीज केल्यावर भाजपाला लोकसभा कठीण जाणार हे अंदाज त्यांनी खोटे ठरविले आहेत. आपल्या पक्षाला पराभवातून सावरुन पुन्हा विजयश्रीकडे कसे न्यावयाचे हे मोदी-शहांनी दाखवून दिले आहे. 2014 सालच्या पराभवानंतर कॉँग्रेस म्हणावी तशी या धक्यातून सावरली नाही, अगदी तीन राज्यात विजय मिळूनही कॉँग्रेसची मानसिकता ही पराभूताचीच होती, हे देखील विरोधकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. मोदींच्या हुकूमशाही व लोकशाही विरोधी प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी हरतर्‍हेने प्रयत्न केले परंतु त्यांना त्यात शंभर टक्के यश आले नाही. आपण केवळ सत्ताकारणासाठीच देशात जन्माला आलो आहोत, या कॉँग्रेसच्या गोड गैरसमजुतीलाही मोदींनी छेद दिला आहे. भाजपाच्या विजयाचे विश्‍लेषण अजून व्हायला काही काळ लागेल, परंतु त्यांनी बाजी मारली आहे हेच निकालावरुन दिसते. गेल्या वेळी त्यांना देशात 31 टक्के मते पडली होती. मात्र आता ही टक्केवारी कमी झाली की जास्त त्यावर भाजपाची लोकप्रियता नेमकी कुठे आहे हे समजेल. एक बाब महत्वाची आहे की, पंडित जवाहरलाल नेहरु व इंदिरा गांधी यांच्या नंतर बिगर कॉँग्रेसी सरकार दुसर्‍यांचा निवडून येण्याची ही पहिल्यांचा वेळ आहे. नेहरुंनी 1952, 1957 आणि 1962 ची निवडणूक जिंकली होती. तर इंदिरा गांधींनी 1967 आणि 1971 मध्ये बहुमत मिळवले होते. आता त्यानंतर दोनवेळा जिंकून नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींच्या विक्रमाची बरोबरी आता केली आहे. हे निकाल पाहता, जनतेच्या मनात अजूनही भाजपा व मोदींविषयी आशा, आकांक्षा व नेतृत्वाविषयी कणव आहे असेच दिसते. गेल्या वेळची निवडणूक मोदींनी भ्रष्टाचार, काळा पैसा, रोजगार या विषयावर लढवून कॉँग्रेसला सत्ताभ्रष्ट केले होते. आता मात्र या आकांक्षेची पूर्तता न करताही जनतेने भाजपाला पुन्हा एकदा संधी देऊ केली आहे. मोदींचे वकृत्व, शहांचे निवडणुका जिंकण्याचे कौशल्य त्यांना सत्तेपर्यंत पुन्हा घेऊन गेले आहे असे म्हटल्यास वावागे ठरणार नाही. गेल्या पाच वर्षात काही कामे झाली नसली तरीही मोदी काहींतरी पुढे करतील असे लोकांना वाटते. मोदींनी आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचे तसेच आपण एकटेच राहाणारे बैरागी आहोत अशी प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कामे न करताही भाजपला यश लाभले आहे. काळ्या पैशाच्या विरोधात सरकारने काही ठोस पावले उचलली नाहीत. रोजगार निर्मितीही फारशी झालेली नाही. त्याचबरोबर भ्रष्टाचार संपला आहे असे तर अजिबात नाही. असे असतानाही भाजपाने ही निवडणूक पुन्हा जिंकली आहे. सोशल मिडियावर आक्रमकपणे प्रचार करुन भाजपाने आपली बाजू मांडली, हे जेवढे खरे आहे तेवढेच देशातील 35 कोटी एवढ्या मोठ्या संख्यने असलेला मध्यमवर्गही भाजपाच्या मागे जोरदारपणे उभा राहिला आहे. आपल्या देशातील ही शहरी मध्यमवर्गीयांची संख्या काही लहान नाही. त्यांच्या जीवावर मोठ्या संख्येने खासदार विजयी होऊ शकतात. मुंबईतील सहाच्या सहा जागा भाजपा-शिवसेनेने जिंकल्या आहेत. कॉँग्रेससह विरोधकांनी आपली एकजूट उभारण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाच्या प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झाला असता तर काहीचे चित्र वेगळे असते. परंतु तसे झाले नाही. उत्तरप्रदेशात मायावती-समाजवादी पार्टी एकत्र येऊन त्याचा फायदा झाला नाही. आजवर विरोधकांच्या फुटीचा फायदा त्याकाळी सत्तेवर असलेल्या कॉँग्रेसला होत असे. आता विरोधकांच्या फुटीचा फायदा भाजपाला होत आहे. एकीकडे भाजपा देशात विजयी घोडदौड करीत असताना रायगडमध्ये शिवसेनेला लगाम लावण्यात यश प्राप्त झाले आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री व सहा वेळा खासदार असलेले अनंत गीते यांना पराभव पत्करावा लागला आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी-कॉँग्रेस-शेकापच्या महाआघाडीच्या वतीने सुनिल तटकरे विजयी झाले. रायगडच्या जनतेला आता हक्काचा खासदार तटकरेंच्या रुपाने मिळाला आहे. जातील हा सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव आता संपला आहे. आता पक्षीय मतभेद विसरुन सत्ताधार्‍यांचे अभिनंदन करीत सर्वांनी देशाच्या विकासाच्या दृष्टीने पावले टाकली पाहिजेत. तरच या लोकशाही उत्सवाची सांगता खर्‍या अर्थाने होईल.
-----------------------------------------------------------

0 Response to "पुन्हा भाजपाच!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel