-->
यश-अपयश

यश-अपयश

शनिवार दि. 25 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
यश-अपयश
निवडणुकांचे निकाल काय लागतील हे शेवटपर्यंत सांगणे अशक्य असते. अगदी काल लागलेल्या मोदी लाटेच्या निकालाचे तंतोतंत भविष्य वर्तविणे कुणालाच शक्य नव्हते. अगदी एक्झिट पोलने देखील दिलेल्या जागांपेक्षा जास्त जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातील 48 पैकी 41 जागा पटकावणार्‍या भाजप- शिवसेना युतीने या यशाची 2019 च्या निवडणुकीतही अनपेक्षीतरित्या पुनरावृत्ती केली. त्यात भाजपला 23, तर शिवसेनेने 18 जागा कायम राखल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस केवळ एका जागेवर मर्यादित राहिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही गेल्या वेळेप्रमाणे 4 जागा कायम राखल्या. वंचित आघाडीने यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीची दमछाक करत औरंगाबादेतून एक जागा निवडून आणली. वंचित आघाडी नसती तर विरोधकांच्या किमान दहा जागा वाढल्या असत्या. वंचित आघाडीने तब्बल राज्यात सात टक्के मते पटकाविली आहेत. 17व्या लोकसभेत महाराष्ट्रातून 19 नवीन चेहरे जात आहेत.शिवसेना- भाजपला पूर्वीचे यश कायम राखता आले, याचे महत्वाचे कारम म्हणजे युतीवर झालेले शिक्कामोर्तब. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकही उमेदवार न उतरवता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आव्हान देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या झंझावाताचा युतीच्या घोडदौडीवर किंचितही परिणाम झाला नाही. राज ठाकरे यांची बाषणे एैकायला लोक मोठ्या संख्येने येतात, परंतु त्यांचे विचार काही मनाला लावून घेत नाहीत हे आजवर अनेकदा सिध्द झाले आहे, त्याची पुनरावृत्ती यावेळीही झाली. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर धूळधाण झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही पराभव पत्करावा लागला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आठ सभा घेऊन मोदींविरोधात वातावरण ढवळून काढले, मात्र यापैकी एकाही मतदारसंघात उमेदवार निवडून आणणे शक्य झाले नाही. त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावून बहुतांश मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आणले. महाराष्ट्रातून प्रथमच एखादा धर्मगुरू लोकसभेत पाठवण्याचा इतिहासही या निवडणुकीने सोलापूरातून घडवला गेला. कॉँग्रेसला यावेळी देशात 52 जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता कमीच आहे. कॉँग्रेस पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत जाण्याची शक्यता आहे. यासंबंधी आता कॉँग्रेसने भाजपाकडून धडे गिरविण्याची आवश्यकता आहे. भाजपाने दोन सदस्यांवरुन भरारी घेत एक हाती सत्ता कमावली आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत लक्षणीयच म्हटली पाहिजे. कॉँग्रेस पक्ष 60 वर्षे सत्तेत राहून सध्या सदस्यांची हाफ सेंच्युरी गाठत आहे. भाजपाच्या तुलनेत त्यांची सध्या उतरती भाजणी आहे. मात्र ही चढती भाजणी शक्य करुन दाखविण्यासाठी त्यांना भाजपासारखे धोरण आखावे लागेल. इंदिरा गांधीं, नेहरु यांनी ज्याप्रकारे जनमानसात आपली प्रतिमा निर्माण करुन पक्षावर पकड निर्माण केली होती, आज जी प्रतिमा मोदींनी निर्माण केली आहे, तसे नेतृत्व कॉँग्रेसला घडवावे लागणार आहे. कार्यकर्त्याला निराशेची भावना झटकावी लागेल. इंदिरा गांधींनी गरिबी हटाओ ही घोषणा देत अन्न, निवारा आणि रोजगाराच्या अपेक्षेने पाहणार्‍या जनसमुदायाच्या काळजात हात घातला. आता देखील जनभावनेची नस ओळखणा़र्‍या मोदींनी मोदी हटाओला भ्रष्टाचार हटाआ असे जबरदस्त उत्तर दिले. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर  पाकिस्तानमधील बालाकोटवरील प्रतिहल्ला या दोन घटना मोदी लाटेच्या केंद्रस्थानी राहिल्या. पाकिस्तान ही भारतीय जनतेची ठसठसती जखम आहे. तिथे कुणी स्पर्श केला तर भारतीय मन कळवळते, हा इतिहास आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा हल्लयाचा बदला मोदींनी ज्या संतापाने व तडफेने घेतला त्याचवेळी भारतीय जनतेने आपल्या मताचे दान त्यांच्या पारडयात टाकले होते. देशाला या कठीण प्रसंगी सुरक्षित ठेवणारा मोदींच्या उंचीचा पोलादी नेता विरोधकांकडे नाही, हे पटवून देण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. राष्ट्रवाद आणि विकास यांचा सुरेख मेळ घालत मोदींनी विरोधकांना अक्षरशः पाणी पाजले. नेतृत्व, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक विकास आदी मुद्दे मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले. भाजपाला अजूनही दक्षिणेत आपले बस्तान बसविण्यात यश आलेले नाही. पश्‍चिम बंगालमधील भाजपची मुसंडी ममता यांना अंतर्मुख करणारी आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दलाला पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहे. युतीने महाराष्ट्रातून काँग्रेसला अक्षरशः उखडून टाकले. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने तिसरी आघाडी केली असती तर चित्र वेगळे दिसले असते. उत्तरप्रदेशात मायावती-सपा एकत्र आल्याने फारसा फटका भाजपाला बसला नाही. भाजपचा देशातील विविध प्रादेशिक पक्षांशी आघाड्या करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. त्याासाठी सर्व श्रेय अमित शहांच्या राजकीय व्यवस्थापनाला जाते. मोदींच्या विजयाच्या वारूने अखेर भारताच्या चारही दिशा पादाक्रांत केल्या. अशा त़र्‍हेने मोदींचा सत्तासंपादनाचा अश्‍वमेध पूर्ण झाला. विरोधक मात्र राजकीय रणनिती, निवडणूक व्यवस्थापन तसेच सोशल मिडिया या सर्वच बाबतीत फेल ठरलेे, हे वास्तव आहे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "यश-अपयश"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel