-->
संपादकीय पान गुरुवार दि. २ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शायनिंग सायना!
बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर भरारी घेणार्‍या सायना नेहवालने तिच्या कारकीर्दीत प्रथमच भारतातील बॅडमिंटन सुपर सिरीजचे जेतेपदही  पटकावले. पस्तीस वर्षांपूर्वी जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याचा बहुमान भारतीय खेळाडूंमध्ये सर्वप्रथम प्रकाश पदुकोणला मिळाला होता. याच पदुकोण यांच्या अकादमीची पायरी सायना नेहवाल अलीकडेच चढली आणि तिने मोठे यश मिळवले. हरियाणातील ढिंडार या छोट्याशा गावात १७ मार्च १९९० ला जन्मलेली सायना लहानपणीची काही वर्षे तेथे बागडून हैदराबादला गेली. सायनाच्या नसानसातून खेळ वाहतोय. बॅडमिंटन तर तिला वारसाहक्काने मिळाले आहे. तिचे आईवडील दोघेही बॅडमिंटनपटू आहेत. आई उषा नेहवाल यांनी तर राज्य पातळीवरील स्पर्धा गाजवल्या आहेत. बॅडमिंटनचे असे बाळकडू मिळाल्यानेच सायना नेहवालने सध्या महिला बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेत भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केले आहे. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. वयाच्या आठव्या वर्षी रॅकेट हाती घेतलेल्या सायनाने कसून सराव केला. यासाठी तिला दररोज ५० किलोमीटर प्रवास करावा लागत असे.  २००३ मध्ये तिने झेकोस्लोव्हिया कनिष्ठ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. २००४ मध्ये राष्ट्रीय कनिष्ठ अजिंक्यपद पटकावले. २००५ मध्ये पुन्हा या पदकावर नाव कोरले. २००६ व २००७ मध्ये राष्ट्रीय वरिष्ठ अजिंक्यपद जिंकले. अशा प्रकारे २००३ पासून २०११ पर्यंत सायनाने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. १८ सुवर्ण, १ रजत, २ कांस्यपदके पटकावली. २०११ या वर्षभरात जगभरातील महिला बॅडमिंटनपटूंच्या तुलनेत पारितोषिकांच्या माध्यमातून सर्वाधिक रक्कम मिळवणार्‍या क्रमवारीत सायना तिसर्‍या क्रमांकावर होती. ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी ती देशातील पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे. अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व पद्मश्री पुरस्काराने गौरवलेल्या सायनाने ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकावर लक्ष्य केंद्रित केले आहे. लहान वयातच क्रीडाक्षेत्रात कमावलेले नाव हे सायनाने कसून केलेल्या सरावाचे फळ आहेच; पण या प्रवासात आगेकूच करण्यात तिला मदत करणाजया प्रायोजकांचा विचार केला तर याबाबतीत सायनाच्या नशिबानेही तिला चांगली साथ दिली आहे. २००४ मध्ये भारत पेट्रोलियमने तिला उपव्यवस्थापक म्हणून आपल्या समूहात सामावून घेत तिला प्रायोजक म्हणून सहकार्य केले. २००५ मध्ये मित्तल चॅम्पियन्स ट्रस्टने तिचे प्रायोजकपद स्वीकारून कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्याचे तिला स्वातंत्र्य दिले. सौंदर्य व प्रतिभा यांचा सुरेख संगम असलेली सायना जाहिरातक्षेत्रातही चमकते आहे. आज देशातील तसेच परदेशातील अनेक नामांकित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या सायनाला आपली राजदूत म्हणून नेमण्यासाठी उत्सुक आहेत. सध्याच्या क्रिकेटच्या चमचमत्या दुनियेत बॅडमिंटनपटू म्हणून आपले नाव केवळ देशातच नव्हे तर जगात कोरणे हे मोठे काम तिने केले. सध्या ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली असली तरीही अनेकवेळा दर्जेदार खेळाडूंना पराभूत केल्यानंतर नंतरच्या फेरीत पराभूत होण्याचे धक्कादायक निकाल सायनाच्या वाट्याला खूप यायचे. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पदक हमखास मिळवणार, असे वाटत असताना त्या उंबरठ्यावरून सायना माघारी परतली. त्यानंतरही अनेक नेत्रदीपक विजय मिळवूनही सायनाच्या कामगिरीत सातत्य नव्हते. त्यामुळे बालपणापासून ज्या गोपीचंद अकॅडमीत प्रशिक्षण घेतले त्यापासून काही काळ फारकत घेण्याचा निर्णय सायनाने घेतला. याआधीही सायनाने तसा निर्णय घेतला होता. मात्र, वर्षभरातच प्रशिक्षक विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाचा फारसा लाभ न झाल्याचे लक्षात येताच सायना पुन्हा गोपीचंद यांच्याकडे परतली होती. या पुनरागमनानंतर परत एकदा सायना-गोपीचंद जोडीचे सूर जुळले आणि लंडन ऑलिम्पिकचे कांस्यपदक भारताच्या वाट्याला आले. मात्र, हा बदल दीर्घकाळ टिकणारा नव्हता. सातत्यपूर्ण कामगिरी न होणे ही सायनासाठी डोकेदुखी ठरली होती. त्यामुळे तिने शेवटी प्रशिक्षणाच्या तंत्रात, मानसिक प्रशिक्षण तयारीच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षक विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा नव्या पर्वाची सुरुवात सायनाने केली. या वेळी मात्र त्या निर्णयाला चांगली फळे लागली. प्रकाश पदुकोण यांचे मार्गदर्शन आणि बदललेली प्रशिक्षण पद्धती याचा फायदा झाला. चायना ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावताना सायनाने चक्क चीनच्या तीन अग्रेसर खेळाडूंना हरवले. बॅडमिंटन हाच श्वास मानणारी सायना सरावावर प्रचंड मेहनत घ्यायची. कधी-कधी त्या मेहनतीचा अतिरेक व्हायचा. हा फरक पदुकोण आणि विमलकुमार यांच्या लक्षात आला. त्यांनी सायनाला अतिसरावावर नियंत्रण आणण्यास सांगितले. सायनाशी सतत संवाद साधल्यामुळे प्रकाश पदुकोण यांना तिच्या समस्या कळायला लागल्या. आशिया खंडातील वर्चस्वाची ओळख निश्चित करणारी थॉमस कप, उबेर कप या स्पर्धेतील भारतीय महिला खेळाडूंनी मिळवलेले पहिले कांस्यपदक हादेखील नव्या बदलाचा परिणाम होता. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसाठी मार्गदर्शनाचा एखादा मुद्दादेखील परिणामकारक ठरू शकतो. परदेशातील स्पर्धांच्या वेळी सरावासाठी योग्य जोडीदार असणेही महत्त्वाचे असते. गोपीचंद यांच्याकडील खेळाडूंची संख्या आणि उपलब्ध प्रशिक्षक यांचे प्रमाण पाहिले तर सायनाला ती मदत कमी पडत होती, असे लक्षात आले होते. सरावासाठी विमलकुमार किंवा अन्य खेळाडू मिळाल्यानंतर सायनाच्या कामगिरीत चांगले बदल झाले. भारतात २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा अपवाद वगळता सायनाला भारतात झालेल्या चारपैकी एकाही सुपर सिरीज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपुढे मजल मारता आली नव्हती. नवी दिल्लीत झालेल्या सुपर सिरीजमध्ये यंदा सायनाने चक्क विजेतेपद पटकावले. या विजेतेपदाबरोबरच बॅडमिंटन क्रमवारीतील तिच्या अव्वल क्रमांकाला काही काळापुरते तरी स्थैर्य मिळेल. मात्र, नंबर वनपेक्षाही कामगिरीतील सातत्याला प्राधान्य देणे सायनाला महत्त्वाचे वाटते. चीन, मलेशिया, इंडोनेशिया आणि युरोप खंडातील अव्वल खेळाडूंचा समावेश असलेल्या बॅडमिंटन या खेळात अव्वल स्थानावर कायम राहणे सोपे नाही. सर्वच देशांचे खेळाडू सायनाला मागे टाकण्यासाठी आता जिवापाड प्रयत्न करतील हे उघडच आहे. या तीव्र स्पर्धेत अव्वलस्थानी टिकून राहण्याचा प्रयत्न करतानाच बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भारताला सतत यश मिळवून देणे हेच आता सायनापुढील मुख्य ध्येय असणार आहे!
---------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel