-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ३ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ऐतिहासिक साहित्यमेळा!
पंबाज येथे आजपासून घुमानला होणारे ८८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी स्वत: पुढाकार घेऊन हे संमेलन यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्व आखणी केली आहे. महाराष्ट्राने पंजाबला सातशे वर्षांपूर्वी संत नामदेवांसारखे पूजनीय व्यक्तिमत्त्व दिले, ज्याच्यासमोर नतमस्तक व्हावे असा संतपुरुष दिला. आता त्यांच्या नावाने होत असलेल्या संमेलनाची जबाबदारी स्वीकारून काही अंशी तरी या ऋणातून उतराई होण्याची संधी आम्हास द्यावी, असे मत त्यांनी मांडले. महामंडळ आणि संयोजन समितीने अत्यंत नम्रतेने त्यास नकार दिल्यानंतर बादल यांनी संमेलनाला उपस्थित राहणार्‍या सर्वांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, पुणे हे प्रमुख शैक्षणिक केंद्र तसेच एकूणच महाराष्ट्र हे कला आणि संस्कृतीचे माहेरघर असल्याचा जो लौकिक बाहेर सर्वत्र आहे, त्यामुळे देशभरातील विविध राज्यांमधून लोक महाराष्ट्रात आले आणि स्थायिक होऊन इथलेच झाले. या पार्श्वभूमीवर मराठी माणूस क्वचितच बाहेर जातो. अशा परिस्थितीत या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने बाहेर पडत असलेल्या मराठीजनांचे स्वागत कसे होईल असे काहीजणांना वाटत होते. पण पंजाब करत असलेले आदरातिथ्य आणि तिथल्या सरकारपासून नागरिकांपर्यंत सर्व स्तरांवरचा एकूण उत्साह पाहता मराठी माणूस भारावून गेल्याचे चित्र दिसते आहे. पंजाबमध्येही या संमेलनाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या मराठी पाहुण्यांच्या उत्तम स्वागत आणि सरबराईकरता घुमान गावचे लोक एकजुटीने कामाला लागले आहेत. प्रशासनाने मुख्यमंत्र्यांचे आदेश शिरसावंद्य मानून, रस्ते, पिण्याचे पाणी, अन्य सोयी अशी कामे अत्यंत वेगाने हाती घेतली आहेत. तिथली नोकरशाही संयोजन समितीच्या सतत संपर्कात आहे. स्वातंत्र्यलढ्यामध्ये देशाचे नेतृत्त्व करणार्‍या लाल-बाल-पाल या अनुक्रमे पंजाब, महाराष्ट्र व बंगालच्या सुपुत्रांच्या वारसदारांना या संमेलनाच्या मंचावर एकत्र आणण्याचा संयोजन समितीचा प्रयत्न आहे, तसाच भगतसिंग - राजगुरू - सुखदेव या क्रांतिकारक त्रयीच्या वारसांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व जुळून आल्यास ही निःसंशय एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे. देशाच्या इतिहासातील दोन सोनेरी पानांना यामुळे पुन्हा उजाळा मिळणार आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांदरम्यान आणि दोन्ही राज्यांच्या जनतेदरम्यान पूर्वापार सौहार्दपूर्ण संबंध चालत आले आहेत. ऐतिहासिक आणि देशाच्या सद्य परिस्थितीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असलेले हे संबंध या संमेलनाच्या निमित्ताने अधिक दृढ होणार आहेत हे नक्की. पंजाबमध्ये साहित्य संमेलनाचं आयोजन प्रस्तावित झाल्यावर मुख्य विरोध होता तो प्रकाशकांचा. दर वर्षी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. पुस्तक बाजारातील वर्षभरातील ही सर्वात मोठी उलाढाल प्रकाशकांना चांगलं उत्पन्न देऊन जाते. घुमानमध्ये साहित्य संमेलन आयोजित होत असल्यानं पुस्तकं कोण खरेदी करणार या प्रश्‍नापासून प्रकाशकांच्या विरोधाला सुरुवात झाली. भाषेची सेवा हा विषय महत्त्वाचा ठरतो. या निमित्तानं नामदेवांच्या स्मृतीला उजाळा मिळणार आहे. महाराष्ट्रातून संमेलनाला उपस्थित राहणार्‍यांची संख्या जवळपास तीन हजाराच्या घरात पोहोचली आहे. पंजाबला जाणार्‍या दोन्ही ट्रेन ङ्गुल आहेत. व्हिसाचा प्रश्‍न वेळीच मार्गी लागल्यास कराचीत स्थायिक झालेली मराठी मंडळी आवर्जून संमेलनाला उपस्थित राहतील कारण ती महाराष्ट्रात येऊन या समारंभाचा आनंद लुटू शकत नाही. त्याचप्रमाणे दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरात स्थायिक झालेल्या मराठीजनांनाही घुमानला येणं सोयिस्कर आहे. पंजाब हे भारताचे सीमावर्ती राज्य आहे. त्यामुळे त्या राज्यामध्ये या संमेलनामुळे निर्माण होत असलेले एकंदरीतच सकारात्मक वातावरण देशाच्या हिताचे आहे. प्रख्यात शायर ङ्गैज अहमद ङ्गैज यांच्या कन्या सलिमा हाश्मी यांनी या संमेलनाचे आमंत्रण स्वीकारले आहे. त्या पाकिस्तानहून येणार आहेत. त्याचबरोबर संमेलनाला तीन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची हजर असणार आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक गुरूदयाल सिंग, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते काश्मीरी लेखक रहेमान राही या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. भाषेच्या प्रेमापोटीची त्यांनी निमंत्रण स्वीकारलं आहे. महाराष्ट्रामध्ये हे सहजासहजी घडलं नसतं. म्हणजेच या निमित्तानं संस्कृतींची सुरेख सरमिसळ पहायला मिळेल. संमेलनाच्या निमित्तानं मराठी आणि पंजाबी साहित्यासाठी एकत्र व्यासपीठ उभं राहणं ही सर्वात समाधानाची बाब आहे. आतापर्यंत अमृता प्रीतम अथवा साहिर लुधियानवीचं साहित्य मराठीत अनुवादीत झाल्याचं आपण पाहिलं. पण या निमित्तानं उलटी प्रक्रियाही होऊ शकते. कदाचित पुढल्या काळात बा.भ. बोरकरांच्या कविता पंजाबीमध्ये, हिंदीमध्ये अनुवादित झालेल्या दिसतील. पंजाबी साहित्यिकांचं अनुभवविश्व वेगळं आहे. तिथल्या जाणिवा, संवेदना वेगळ्या आहेत. वैयक्तिक चर्चेदरम्यान यांचं आदानप्रदान होऊ शकेल.  या आयोजनामुळे नवी पिढी मराठी साहित्याकडे आकर्षित होईल. नजीकच्या काळात काही पंजाबी साहित्यिक मराठीतील साहित्याचा अनुवाद करू इच्छितील. तेव्हा तो प्रकाशकांचाच ङ्गायदा असेल. या वेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. सर्वश्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे मान्यवर या संमेलनाला उपस्थित रहात आहेत. एकूण काय तर, घुमान साहित्य संमेलन न भूतो न भविष्यति असा एक इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. अशा प्रकारे साहित्य व संस्कृती आपल्या सीमांच्या रेषा कधी पार करतात व मनुष्याला कसे जवळ आणणात ते समजत नाही, घुमान हाच मोठा संदेश या निमित्ताने देणार आहे.

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel