-->
संपादकीय पान मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
एक पुरोगामी पाऊल
---------------------------------------
ज्या महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती पाडण्यासाठी समाजसुधारकांनी आपले आयुष्य वेचले त्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात प्रतिगामी शक्ती डोके वर काढू लागल्या होत्या. महाराष्ट्राने जे पुरोगामीमत्व जपले त्याला सुरुंग लागतो की कीय अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थितीत होती. मात्र त्या सर्वाला छेद देणारी घटना महाराष्ट्रात घडली आहे व ती म्हणजे महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात सर्व जातीच्या पुजार्‍यांना तसेच महिलांना पुजा करण्यासाठी दरवाजे खुले करण्यात आले. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. या देवस्थानाबाबत होणार्‍या कोणत्याही निर्णयाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त होणे साहजिकच आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गेली काही शतके बडवे, उत्पात, सेवाधारी यांच्याकडूनच विठुरायाची पूजाअर्चा सेवा करण्याची प्रथा चालत आलेली होती. त्या मंदिरात पुजारी म्हणून ब्राह्मण समाजातील व्यक्तीलाच नेमण्यात येत असे. ही व्यवस्था ज्यांच्या हातात होती, त्या बडवे-उत्पातांनी विठ्ठलाच्या भक्तांना नानाविध मार्गांनी नाडायला सुरुवात केली होती. विठ्ठल व त्याच्या भक्तांमध्ये बडवे-उत्पात, सेवाधार्‍यांची लुडबुड नको म्हणून गेल्या काही दशकांपासून वारकरी संघटनांनी पुढाकार घेऊन आंदोलनेही केली होती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जातीय व्यवस्थेनेही विळखा घातला होता. या मंदिरामध्ये एकेकाळी दलितांना प्रवेश करण्यास बंदी होती. साने गुरुजींनी दलितांना मुक्तप्रवेश असावा म्हणून पंढरपुरात केलेल्या उपोषणाला मोठा सामाजिक अर्थ होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना मुक्त प्रवेश मिळून सामाजिक समानतेच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल पुढे पडले. कालांतराने या मंदिराचा कारभार सरकारी समितीकडे जाऊनही बडवे-उत्पातांचे महत्व व प्रभूत्व काही कमी होत नव्हते. शेवटी बडवे, उत्पात, सेवाधारी यांचे विठ्ठल मंदिरातील सर्व अधिकार संपुष्टात आणण्याचा निर्णय न्यायालयाने घेतल्यानंतरच हे नष्टचर्य कायमचे संपले आणि एक क्रांतीकारक पाऊल पडण्यास सुरुवात झाली. न्यायालयाचा हा निर्णय एक मैलाचा दगड ठरवा असाच होता. विशिष्ट जातीच्या पुजार्‍यानेच पूजा केली म्हणजे ती देवापर्यंत पोहोचते हा सनातनी खुळा आग्रह न्यायालयीन निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या कारभार समितीला बासनात गुंडाळून ठेवणे भाग पडले आहे. या मंदिराच्या समितीने सर्व जाती-जमातींच्या दहा पुजार्‍यांची नव्याने नियुक्ती केली आणि त्यात दोन महिला पुजार्‍यांचाही समावेश करण्यात आला आहे. १ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता या नवनियुक्त पुजार्‍यांकडून विठ्ठलाची पूजा होऊन या पुरोगामी महाराष्ट्रात एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. प्रबोधनपुरुष न्या. रानडे, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यापासून समाजप्रबोधनाचा वारसा असलेल्या नेत्यांपासून ते जातिपातींचा अंत करण्याचा आग्रह धरणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यत अनेक क्रांतिकारी विचारवंतांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्यांनी गेल्या शतकात केलेल्या आंदोलनांमुळेच महाराष्ट्र हे राज्य देशातील इतर राज्यांपेक्षा सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अग्रेसर आहे. याचा एक सार्थ अभिमान बाळगला जातो. पण अनेकदा या पुरोगामी व क्रांतीकारी विचारवंतांचा पराभव त्यांचेच अनुयायी करत असतात असा अनुभव आहे. त्यातून महाराष्ट्राला वेगळे काढायचे काही कारण नाही. देशामध्ये दलित, महिला यांच्यावर अत्याचारांचे प्रमाण ज्या राज्यांत सर्वाधिक, त्यात महाराष्ट्राचा अग्रक्रम लागतो, हे भीषण वास्तव आपण त्याबरोबर विसरु शकत नाही. शहरे असो वा ग्रामीण भाग, महाराष्ट्रातील सामाजिक व्यवहारातील जातिप्रथेचे विष अजूनही कायम आहे. खैरलांजीपासून अलिकडे घडलेल्या अनेक प्रकरणात हे सातत्याने जाणवत असते.  सामाजिक समानतेच्या दृष्टीने महाराष्ट्राला मोठा पल्ला अजूनही गाठायचा आहे. कोणताही सामाजिक बदल हा काहीशा धीम्या गतीनेच होत असतो. हे बदल घडायला पिढ्यानपिढ्यिा जाव्या लागतात. कोणत्याही प्रकारचे सामाजिक बदल होऊ नयेत यासाठी आग्रही असलेले व बदल व्हावा यासाठी संघर्ष करणारे या दोघांनीही टोकाच्या भूूमिका घेणे टाळायला हवे. विठुरायाची भक्ती करताना गेल्या काही शतकांत विविध संतांनी जे अभंग, ओव्या रचल्या, त्यामध्ये सामाजिक सुधारणांची बीजे पेरलेली होती. उच्चवर्णीय लोकांच्या जाचाला कंटाळून यातील काही संतांनी काहीशी कडक भूमिकाही मांडली असेल; पण त्यांचा बदल घडवून आणण्याचा मार्ग अंतिमत: शांततामय होता, हे लक्षात घेतले पाहिजे. अंधश्रद्धेच्या वाटेवर चालू नका असा उपदेश केला की काही समाजगट आमच्या श्रद्धा-भावना दुखावल्या म्हणून बेभान होतात. बत्तीसशिराळा येथे यंदाच्या वर्षी जिवंत नागाऐवजी नागमूर्तीची पूजा करण्यात आली. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याच्या निमित्ताने नागाची पूजा करण्याच्या निमित्ताने कसे हाल केले जातात यावर गेली अनेक वर्षे सर्पमित्र लोकजागृती करत होते. त्या प्रयत्नांना यश येऊन बत्तीसशिराळ्यात यंदा अनुकूल परिवर्तन घडले. सामाजिक सुधारणांसाठी जनमानस तयार करणे खूप मोठे कार्य आहे. त्यामुळे आपल्या राज्यात क्रांतीकारी विचारांची जाज्वल्य परंपरा आहे, तसे अनेत नेते या भूमित जन्मले. असे असूनही आपण अनेक घटनातून दोन पावले मागे जात असतो. परंतु न्यायालयाच्या बडग्याने अनेकदा सामाजिक सुधारणांना गती येते व त्या सुधारणांचा मार्ग सुकर होते. पंढरपूरात झालेले बदल, पुरोगामित्वाच्या दिशेने पडलेले हे पुढचे पाऊल ठरणार आहे हे नक्की. यातून आता पुन्हा मागे फिरावयाचे नाही. हा महाराष्ट्र पुरोगामी होता आणि पुरोगामी विचारांचाच राहाणार आहे हे पुन्हा एकदा या घटनेने अधोरेखीत झाले आहे.
--------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel