-->
संपादकीय पान सोमवार दि. ४ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
नासाच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष का केले?
----------------------------------------------
माळीण येथील दुर्घटनेचा इशारा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने दिला होता आणि त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे आता नव्याने आलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे. अर्थात नासाने माळीणच्या ठराविक भागातच दरी कोसळणार असे म्हटले नसले तरीही भारतातील ज्या भागात धोका आहे तो भाग नमूद केला होता. परंतु आपल्याकडील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले हे देखील खरे. गेल्या काही दिवसांपासून होत असणार्‌या अतिवृष्टीमुळे काळ्या पाषाणातील भेगा रुंद होऊन खालच्या खडकांवर त्याचा दाब आलेला असावा व माळीण येथे दुर्घटना घडली असावी, असे आजच्या घडीला वाटते आहे. महाराष्ट्राचा ८५ टक्के  भूभाग हा दख्खनचे पठार म्हणूनच ओळखला जातो. महाराष्ट्रात प्रामुख्याने बेसॉल्ट हा खडक आढळतो. या बेसॉल्टचे असंख्य प्रकार असून त्या सगळ्यांचे गुणधर्म समान नाहीत. पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे दगड आढळतात. ते म्हणजे भरीतकुहरी आणि काळापाषाण. या खडकांचे वय साधारणपणे ६५ दशलक्ष वर्षे असून दख्खनचे पठार याच खडकांनी बनलेले आहे. हे दोन्ही खडक जरी अग्निजन्य असले तरी भरीतकुहरी बेसॉल्टमध्ये संधीच्या भेगा (कॉन्ट्रॅक्शन क्रॅक्स) नसतात. मात्र काळ्या पाषाणामध्ये त्या प्रकर्षाने असतात. अर्थात त्यातही त्यांचे प्रमाण आणि रचना वेगवेगळी असू शकते. या संधीच्या भेगा आणि अशा भेगांनी तयार झालेले खडक हे निसर्गत: उघड्या पडलेल्या कड्यात तुटलेल्या अवस्थेत दिसतात. या थरातील काही संधींच्या भेगा तिरक्या, कलत्या असल्यामुळे त्यातील संधींचे खंड  अस्थिर अवस्थेत असतात. काळ्या पाषाण खडकाच्या थरात पावसाचे पाणी मुरल्याने हे खडक कुजतात. मुसळधार पावसात कुजलेल्या खडकांचे तुकडे, मुरूम आणि माती खाली घसरून येऊन त्यांचा खच होतो. असा ढिगारा खचल्याने माळीण गावासारखी दुर्घटना घडून येते. वाढत्या शहरीकरणामुळे, जंगलतोडीमुळे तसेच प्रामुख्याने बांधकामांसाठी लागणार्‍या दगडांमुळे डोंगर उत्खननाचे धंदे देशभरात खूप वेगाने पसरले आहेत. सर्वात दुदैवाची बाब म्हणजे राज्यकर्त्यांची त्याला साथ आहे तर काही भागात त्यांचा यात प्रत्यक्ष सहभाग असतो. आपले डोंगर आधी बोडके केले जातात आणि नंतर ते बोडके असल्याचे कारण देत त्यांना सुरुंग लावून ते खणले जातात. देशाच्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, महानगरांच्या आसपासचे डोंगर पोखरण्याचे काम खूप जोरात सुरू असूनही त्याकडे सर्वच स्तरावरून होत असलेली डोळेझाक घातक ठरणारी आहे. यातून निसर्गाचे असंतुलन होत असते. माळीण हे गाव छोट्या नदीच्या तीरावर वसलेले आहे. त्याजवळच डिंभे धरणाचा फुगवटा आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असणार्‍या अतिवृष्टीमुळे काळ्या पाषाणातील भेगा रुंद होऊन खालच्या खडकांवर त्याचा दाब येऊन माळीणची घटना घडली असावी, असा एक अंदाज आहे. भूशास्त्रीयदृष्ट्‌या या प्रदेशाचे सखोल निरीक्षण होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सर्वदूर ठिकाणी जिथे तीव्र डोंगर उतार आहेत, तेथे कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यात अशा भागात वृक्षलागवड आणि ड्रेन या साध्या उपाययोजनेने दुर्घटनेचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे वाटते. या ड्रेन्सच्या खाली आणि लगत दोन्ही बाजूने वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केल्यास जमिनीची धूप कमी होऊ शकते. कोकण रेल्वे ज्या भागातून जाते त्या भागातही मोठ्या प्रमाणात डोंगर आहेत. तेथील पावसाचे प्रमाणदेखील खूप मोठे असल्याने धूप होण्याचे तसेच बोगद्यांमुळे दरडीप्रवण क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळेच कोकण रेल्वेच्या लोहमार्गानजीक असलेल्या डोंगरांना जशा जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, तशा जाळ्या अशा दरडीप्रवण क्षेत्रात बसवण्याची गरज आहे. तसे झाल्यास दरडी कोसळण्यास आणि ढिगार्‍याास अटकाव होऊन जीवित आणि वित्तहानी काही प्रमाणात तरी टळू शकते. अन्यथा असे माळीण होतच राहातील.
------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel