
कोपलेला सूर्यदेव...
15 मे 2022च्या मोहोरसाठी चिंतन
कोपलेला सूर्यदेव...
या वर्षीचा उन्हाळा कधी नव्हे एवढा तीव्रपणाने जाणवू लागला आहे. मुंबईसह अनेक भागात कधी नव्हे तो पारा चाळीस अंशांच्या पुढे गेला आहे. तर जिकडे यापूर्वी ४० अंश तापमान होते ते आता ५० अंशांच्या घरात गेले आहे. कधी एकदा पाऊस पडून गारवा येतो असे सर्वांना वाटू लागले आहे. पूर्वी उष्णतेमुळे मृत्यू पावल्याच्या बातम्या उत्तर भारतातून यायच्या, परंतु आता अशा बातम्या महाराष्ट्रातूनही येऊ लागल्या आहेत. गेल्या दोन वर्षात आपल्याकडे उन्हाळा वाढत असल्याची चिन्हे दिसत होती, मात्र आता यंदा मात्र या उन्हाळ्याने उकाड्याचे एक नवे टोक गाठल्याचे दिसते आहे. देशात ११२ वर्षातली उष्णतेची उच्चांकी लाट सध्या आलेली आहे, असा हवामानखात्याचे म्हणणे आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडच तापल्यासारखा भासत आहे. जसा उन्हाळा टोक गाठत आहे तशी थंडी देखील गेल्या वर्षी वाढली होती व पाऊस देखील तुफान कोसळला. यंदा नियमीत पाऊस पडला मात्र तो एकदाच जोरदार पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पावसाचे चक्रही विस्कटले आहे. जी थंड हवेची ठिकाणे म्हणून आपल्याकडे ओळखली जायची ती देखील आता उन्हाळ्यात थंड राहीलेली नाहीत. अगदी सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात हिमाचल प्रदेशात थंडी असायची, मात्र आता तेथे देखील उन्हाचा जबरदस्त तडाखा पहावयास मिळतो. एकंदरीतच आजवरचे जे निसर्गचक्र होते ते पार विस्कळीत झालेले दिसते. पर्यावरणाद्यांनी याची आपल्याला जाणीव यापूर्वीच करुन दिली होती, परंतु आपण त्याकडे काणाडोळा करीत आलो होतो. २१ वे शतक संपेपर्यंत पृथ्वीच्या तापमानात १.५ डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे जर झालेच तर आपल्याल्या सध्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळा सहन करावा लागणार आहे. पृथ्वीचे चक्र प्रत्येक ठिकाणी बदलत चालले आहे. आजवर उन्हाळ्याच्या दिवसात पश्चिमेकडून अरबी समुद्राच्या दिशेने वारे वाहात त्यामुळे काहीसा दिलासा उन्हाळ्यात मिळत असे. आता मात्र पश्चिमेकडून येणारे वारे हे अफगाणिस्थान, इराण या भागापर्यंतच आले आहेत, त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडील तापमानात वाढ झाली आहे. त्यातच भर म्हणजे आपल्याकडे झपाट्याने होणारे कॉँक्रिटीकरण व शहरीकरणामुळे आपल्याला हे सर्व परिणाम भोगावे लागत आहेत. औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण वाढत चालले आहे, जंगलांचा होत असलेला ऱ्हास, शहरातील कॉँक्रिटचे जंगल व त्याच जोडीला ग्रामीण भागातही विकासाच्या नावाखाली कॉँक्रिटचा वापर सर्रास वाढत चालला आहे. याचेच परिणाम आपल्याला आता भोगावे लागत आहेत. कॉँक्रिटचा पृष्ठभाग वाढल्याने उष्णतेत थेट वाढ होत आहे, दिवसभर होणारा होणारा उष्मा कॉँक्रिट दिवसा शोषून ठेवते व रात्री अतिरिक्त उष्णता बाहेर टाकते. याचा परिणाम म्हणून रात्रीचे वातावरण थंड होतच नाही व उष्मा वाढू लागतो. औद्योगिकीकरणातून निर्माण होणारा धूर, तेथे वापरली जाणारी विविध प्रकारची रसायने यातून वातावरण अधिकच दुषित होते. २१ वे शतक संपेपर्यंत पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सियसने वाढल्या आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. कोरनाच्या काळात आपले बरेच उद्योगधंदे बंद होते अनेकांचे जीवनच ठप्प झाले होते अशा काळात प्रदूषणाचे प्रमाणही घसरले होते. मात्र हा दिलासा हा फार काळ काही टिकला नाही. कोरोना संपल्यावर पुन्हा जनजीवन सुरु होताच प्रदूषणाने उसळी खाल्ली आहे. आता तरी झालेल्या चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत. कॉँक्रिंटची जंगले उभारण्यावर मर्यादा घातल्या पाहिजेत. कार्बनउत्सर्जन मोठ्या प्रमाणावर जसे विकसीत जगाने केले तसेच आपल्या सारख्या विकसनशील देशांनीही करण्यास सुरुवात केली आणि त्यात निसर्गाला ओरबाडायला सुरुवात झाली. कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी आत्तापासून उपाय करण्याची गरज आहे. आपल्याकडे सध्या जे उपाय सुरु आहेत ते वरवरचे आहेत. सध्या इलेक्ट्रीकवर वाहने चालविण्यासाठी चढाओढ सुरु आहे परंतु या वाहानांसाठी वापरली जाणारी वीज ही कोळशावर तयार केली जाते. कोळशावरील वीज ही सर्वात प्रदूषणकारी आहे, म्हणजे एकीकडे कोळसा जाळून वीज तयार करायची आणि दुसरीकडे त्याच विजेवर इलेक्ट्रीकवर वाहने चालवायची असा विरोधाभास आपल्याकडे सध्या केला जात आहे. त्यमुले खऱ्या अर्थाने पर्यावरणप्रिय वीज निर्मीती करुन त्यावर वाहने चालविल्यास निसर्गाचा समतोल बिघडणार नाही. परंतु हे लक्षात घेतले जात नाही. निसर्गाचा मानवानेच विकासाच्या नावाखाली ऱ्हास करुन घेतला आणि त्याचीच फळे आपण भोगत आहोत. यासंबधी जनतेत जागृती करण्याची आवश्यकता आहे. वृत्तपत्रे, चॅनेल्स, समाज माध्यमे याविषयी लोकांमध्ये फारशी जनजागृती करताना दिसत नाहीत. आपण घेतलेली चुकीची धोरणेच आता आपल्या पायावर घाव घालीत आहेत. यातून बोध घेऊन आपल्याला आजवर झालेल्या चुका सुधारल्या पाहिजेत. अन्यथा दरवर्षी असाच सूर्यदेव कोपत राहिल व त्याचा अजून अतिरेक झाला तर या पृथ्वीवरील जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकेल.
0 Response to "कोपलेला सूर्यदेव..."
टिप्पणी पोस्ट करा