
जगातील ‘द ग्रेट रेसिग्नेशन’ची लाट...
05 डिसेंबर 2021 च्या मोहोरसाठी चिंतन
जगातील ‘द ग्रेट रेसिग्नेशन’ची लाट...
कोरोनाच्या काळात व त्यानंतर जग पूर्णपणे बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरु नये. प्रत्येक देशात कोरोना पश्चात जग व अर्थकारण सुरु होत असताना हे बदल होत आहेत. आपल्याकडे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा लाभली नसली तरीही श्रमाची किंमत कोरोनामुळे सर्वांना समजली. यात लोकांची मानसिकता बदलत जाण्याचा कल सर्वात प्रथम लक्षात घेतला पाहिजे. हा बदल अमेरका व युरोपातील विकसीत देशात झाला आहे किंवा होत आहे. गेल्या काही महिन्यात प्रामुख्याने पहिले लॉकडाऊन संपल्यावर अमेरिका, युरोपातील देशात नोकरी सोडून काही तरी दुसरा कामधंदा करण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. सर्वात गंमतीची बाब म्हणजे एखादी नोकरी असताना दुसरी नोकरीची ऑफर आल्यास ती नोकरी सोडणे समजू शकते. परंतु कोणतीच अन्य नोकरी हातात नसतानाही नोकरी सोडण्याकडे अमेरिकेत अनेकांचा कल वाढत आहे. अशा प्रकारे गेल्या सहा-आठ महिन्यात एक कोटीहून जास्त अमेरिकनांनी नोकऱ्यांना रामराम केले आहे. हा कल प्रामुख्याने आरोग्यसेवेतील कर्मचारी व आय.टी. उद्योगातील कर्मचाऱ्यांचा आहे. अन्य उद्योगात नोकरी सोडण्याचे प्रमाण असले तरी ते फार कमी आहे. आजवर द ग्रेट रिशेसन, द ग्रेट डिप्रेशन याच्या पाठोपाठ आता ग्रेट रेसिग्नेशनची मोहीम जग अनुभवते आहे. अनेपेक्षीत असा हा कल आहे. परंतु कोरोनातून धडा घेऊन जास्त पैसा कमविण्याच्या मागे लागू नये असे अनेकांना वाटू लागले आहे. लोकांमध्ये उगाचच नैराश्य आले आहे व त्यातून हे सत्र सुरु झाल्याचे म्हटले जाते. नैराश्य म्हमण्यापेक्षा आपल्य़ा जीवनाची खात्री नसताना उगाचच पैशाच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही असे पटल्याने लोक नोकऱ्या सोडत आहेत. त्यातूनच हे राजीनीमे देऊन नोकरी सोडण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. आपण नोकरी करुन त्यातून पैसा कमवितो. त्यातून प्रमोशन मिळविण्यासाठी अधिक जास्त काम करतो, अनेकदा जास्त पैसाही कमवितो, परंतु या पैशाचे काय करायचे शेवटी पैसा कितीही असला तरी माणूस जगू शकत नाही. कोरोनाने अनेकांना हे दाखवून दिले आहे. त्यातूनच अनेकांना केवळ पैशाच्या मागे धावणे व्यर्थ आहे, हे पटू लागले आहे. ठराविक काळापर्यंत पैसा गरजेचा ठरतो. परंतु सर्व गरजा संपल्या की पैशाच्या मागे धावणे हा मुर्खपणा ठरतो असे अनेकांना कोरोनाने शिकविले. त्यापेक्षा पैशाच्या मागे न धावता, एक चांगले आयुष्य आपण जगू शकतो. सतत पैशाच्या मागे धावण्यापेक्षा काही वेळ कुटुंबासाठी घालविल्यास माणूस चांगले आयुष्य घालवू शकतो. मात्र त्यासाठी गरजा मर्यादीत ठेवल्या तर अधिक सुखाने जगता येईल असे अनेकांना वाटू लागल्याने नोकरी करणे नको रे बाबा असे वाटू लागल्याने राजीनामा देऊन नोकरी सोडण्याकडे अमेरिकेत कल वाढला आहे. अमेरिका, युरोपातील मध्यमवर्ग हा सुखानीस आयुष्य जगत होता. त्याच्या सुखासिन आयुष्यात मौजमजेला स्थान होते. त्यातच विकसीत जगात राहत असल्याने आयुष्य सुरक्षित होते. अशा या सुरक्षित आयुष्यात कोरोनाने त्यांना असुरक्षित केले. आपले नातेवाईक, मित्रमंडळी अचानक हे जग सोडून गेल्याचे त्यांना पाहिल्यावर काय करायचा हा पैसा, हा पैसा काही माणसाचा जीव वाचवू शकत नाही, हे त्यांनी अनुभवले. तरीही जास्त पैसे कमविण्यासाठी आपण जे आयुष्य घालवितो त्यात काही अर्थ नाही, असे तेथील मध्यमवर्गीयाला वाटू लागले आहे. रोज सकाळी उठून नोकरीला जाणे व तेथे जाऊन बॉसचे एकणे अनेकांना नकोसे वाटू लागले आहे. हे करण्यापेक्षा गरजेपुरते कमवू व आपलेच आपण बॉस राहू अशी अनेकांची मानसिकता झाल्याने नोकऱ्या सोडण्याचे झपाट्याने प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारे नोकऱ्या सोडण्याच्या मानसिकतेमुळे अनेक अमेरिकन व युरोपियन कंपन्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. हा जर कल वाढत गेला तर येत्या वर्षात नवीन कर्मचारी वर्ग आणायचा कुठून असा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका पाहणीनुसार सध्याच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांनी येत्या वर्षात नोकरी सोडण्याचा निश्चय केला आहे. अमेझॉनच्या ४० टक्के कर्मचाऱ्यांनी येत्या वर्षात नोकरी सोडण्याचा संकल्प सोडला आहे. हे जर सत्यात उतरले तर अमेरिकेत फार कठीण परिस्थिती येऊ शकते. आपल्यासारख्या विकसनशील देशात मात्र अशी स्थिती सध्या तरी नाही. कोरोना काळात आपल्याकडे लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे पगार कमी झाले. लॉकडाऊन उठल्यावर मालकांना आपल्याकडे काम करणाऱ्यांना पुन्हा कामावर घेताना बरेच कष्ट करावे लागले. अनेकांना गावी गेलेल्या मजुरांना पुन्हा कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी खास त्यांच्या गावी माणसे पाठवावी लागली. अनेकांनी कामगारांना पुन्हा आणण्यासाठी गाड्या पाठविल्या. त्यातून मालकवर्गाला आपल्याकडे कामावर असलेल्या कष्टकऱ्यांच्या श्रमाची किंमत समजली. कोरोनापूर्वी त्यांना याची अजिबात जाणीवही नव्हती. कोरोनाच्या काळात गावाला गेलेले मजूर आजही शंभर टक्के परतलेले नाहीत. ज्यांना गावात किंवा आजूबाजूला रोजगार (मग तो कमी पैशाचा असो) सापडला त्यांनी गावाकडेच राहणे पसंत केले आहे. घरकाम करणाऱ्या बायकांच्या श्रमाची किंमतही पहिल्या लॉकडाऊनमध्ये मध्यमवर्गीयांना समजली. सध्या विकसीत जगात जे राजीनामा सत्र सुरु आहे त्याची लाट आपल्याकडे येऊ शकत नाही. कारण आपल्याकडची स्थिती वेगळी आहे. आपल्याकडे रोजगार मागणाऱ्यांची संख्या म्हणजे बेकारांची संख्या आजही मोठी आहे. उलट गेल्या दोन वर्षात आपली नोकरी टिकविण्यासाठी कर्मचारी, कामगारांना बरीच कसरत करावी लागली. आपल्याकडे कोरोनामुळे गरीबांच्या संख्येत वाढ झाली व त्याचबरोबर श्रीमंतांच्या मालमत्तेतही मोठी वाढ झाली हे सर्वात धोकादायक असे चित्र आहे. त्यामुळे आपल्याकडे विकसित जगातील राजीनामा सत्राची लाट आपल्याकडे येऊ शकत नाही. उलट विकसित जगातील काही कामे जी ऑनलाईन होऊ शकतात ती आपल्याकडे आऊटसोर्स होऊ शकतील. त्यातून आपल्याकडील मध्यमवर्गीयांना लाभ होऊ शकतो. कोरोना अजून संपलेला नाही, परंतु कोरोनाचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. यातील काही परिणाम दिर्घकालीन व अल्पकालीन आहेत. द ग्रेट रेसिग्नेशन हे त्याचेच पडसाद उमटले आहेत.
0 Response to "जगातील ‘द ग्रेट रेसिग्नेशन’ची लाट..."
टिप्पणी पोस्ट करा