-->
वरुणराजा कोपला

वरुणराजा कोपला

25 जुलैच्या मोहोरसाठी चिंतन वरुणराजा कोपला रत्नागिरी, रायगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने महाड, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूरमध्ये महापूर आल्याने हाहा:कार उडाला आहे. संपूर्ण कोकणातील बहुताशी भागात पूराने हाहाकार माजविला आहे. मुंबई-गोवा महामार्ग व कोकण रेल्वे बंद पडल्याने कोकणाचा जगाशी संपर्क तुटला आहे. महाड, चिपळूण पाण्याखाली गेले असताना हजारो लोक आपल्या घरात अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी पुण्यावरून चिपळूणकडे जाणार्‍या एनडीआरएफच्या टीम कोयनेत अडकल्या आहेत. अनेक ठिकाणी दरड आणि झाड पडल्याने टीम अडकून पडली आहे. चिपळूण शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन बळी गेले आहेत. दुर्दैवानी मृतांची संख्या वाढम्याची शक्यता आहे. एक महिला पाण्यात बुडाली असुन दुसरी वाहून गेली असे सांगण्यात येते. एकविरा मंदिर भागात राहणार्‍या एका कुटुंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना वृध्द महिलेचा बुडून मृत्यू झाला. तर, रत्नागिरी जवळील टेंबे बौध्द वाडी येथे निघालेली आशा प्रदिप पवार या महिलेचा पर्‍याच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर महिला कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात जात होत्या. मात्र, यावेळी पुराचे पाणी आल्याने पयर्‍या ओलांडताना ही घटना घडली आहे. चिपळूणमध्ये पुराची भीषण परिस्थिती ओढवली असून संपूर्ण चिपळूण शहर खेर्डी, कळंबस्ते, परिसर पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. वशिष्टी व शिवनदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण जलमय झाले आहे. अंतर्गत रस्त्यांवर तब्बल आठ फुट पाणी भरलेले असल्याने बंद झालेले आहेत. बाजारापेठा व शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक सुध्दा ठप्प झाली आहे. रस्त्यावरील बहाद्दुर शेख पूल वहातुकीसाठी बंद झाला आहे. अनेक घरांच्या छप्परांपर्यंत पाणी आल्याने शेकडो घरांची परस्थिती बिकट बनली आहे. हजारो लोक मदतीच्या प्रतीक्षेत असून अजूनही त्यांच्यापर्यंत मदत यंत्रणा पोहोचलेली नाही. शहरातील जुना बाजारपूल,बाजारपेठ, जुने बसस्टॅड, चिंचनाका, मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड,एसटी स्टँड, भोगाळे व परशुराम नगर जलमय झाले असुन घरे पाण्याखाली गेली आहेत. साप व मगरींच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संगमेश्वर बाजारपेठेत, आठवडा बाजार, राम पेठ रोड, गणपती मंदिराजवळ, गदेवखार, भीडे वखार आदी भागात शास्त्री नदीमुळे पुरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या घरातून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. अतिवृष्टी, भरती आणि कोयनेचे पाणी सोडल्यामुळे वशिष्टी नदीला पूर आला, असे आता चिपळूणकरांचे म्हणणे आहे. वशिष्ठी नदीवरील रेल्वेच्या पुलाला पाणी लागले होते. पुराचा धोका लक्षात येताच कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे विविध स्थानकांवर रेल्वे थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. कोकणाप्रमाणे खडकवासला धरण तुडूंबं भरल्याने अवघ्या ७ तासांत धरणातील पाण्याचा विसर्ग २४०० क्युसेकवरून २५०३६ पर्यंत वाढवत न्यावा लागलाय. रात्रीतून खडकवासला धरणाचा विसर्ग तब्बल २५ हजार क्यूसेकपर्यंत वाढल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ऑगष्ट महिन्यात खडकवासला धरण १०० टक्के भरलं होतं यंदा मात्र तेच धरण २२ जुलैला १०० टक्के भरलं आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत २० दिवस आधीच धरणातून पाणी सोडावं लागलंय. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गुंजाळी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. हे अख्खंच्या अख्खं गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले आहेत. सातारा जिल्ह्यातील गुंजाळीमध्ये अचानक जमीन खचल्याचं दिसून आलं. सुरुवातीला नेमकं काय घडतंय हे कुणालाच कळलं नाही. मात्र जेव्हा जमीन खचू लागली, तेव्हा गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. गावातले लोक सैरावैरा पळू लागले आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. चिपळूणमध्ये कुणी स्वयंपाकघरात ओट्यावर दिवसभर उभे आहे, कुणी तासनतास पोटमाळ्याचा आधार घेतला आहे, अगदीच नाईलाज झाल्याने कुणी कौलावर चढून मुसळधार पावसात उभे आहे. जगण्यासाठीची ही धडपड आहे चिपळुणातील पूरग्रस्तांची. समुद्राची भरती सुरू झाली आणि पावसाचा जोर कायम आहे. भरीस भर कोळकेवाडी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने तेथून पाण्याचा विसर्ग सुरु झाला. तब्बल २४ तास पुराचे पाणी कायम असल्याने आणि दिवसभरात लोकांपर्यंत मदत पोहोचलीच नसल्याने पुरात अडकलेले शेकडो लोक मदतीसाठी संदेश पाठवत आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत मदत गेलेली नाही. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने फायबर बोटी त्यात टिकत नाहीत. त्यामुळे पूरग्स्तांना बाहेर काढण्याच्या कामाला गती आलेली नाही. स्थानिक स्वयंसेवी संस्था मदतीला गेल्या असल्या तरी तरी बोटी नसल्याने त्यांच्या मदतीला मर्यादा आल्या. हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली असली तरी दिवसभरात एकही हेलिकॉप्टर मदतीसाठी आले नाही. वीज नसल्याने सायंकाळनंतर सर्व भाग अंधारला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भयभीत झाले असून मदतीसाठी टाहो फोडत आहेत. रायगड,रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे तर दुसरीकडे कोकण रेल्वेही ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्टेशन्सवर सुमारे ६ हजार प्रवासी अडकले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतरच कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत होणार असून तोपर्यंत या प्रवाशांची रखडपट्टी होणार आहे. याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा दिला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांनी सतर्क राहून बचावकार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. गेल्या २४ तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत. कोकणात पूर येण्याचे प्रकार दरवर्षी होतात मात्र यंदाचा पूर हा महाभयानक विध्दंसक वाटत आहे. एवढे मोठे संकट येणार याचा इशारा हवामान खात्याचे देऊ नये याचे आश्चर्य वाटते. याची तुलना मुंबईत आलेल्या २००५ सालच्या महापूराशीच करता येईल. गेली दोन वर्षे कोकणाला चक्रीवादळाचाही फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता कोकणचे समुद्रकिनारे सुरक्षीत राहिलेले नाहीत. अशा वेळी सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत कोकणास या संकटाची आगावू सूचना कशी मिळेल याचा विचार केला पाहिजे. अन्यथा अशी संकटे येतच राहाणार. त्यावर विज्ञानाच्या सहाय्याने मात करता येते हे विसरुन चालणार नाही. ---------------------------------------------

0 Response to "वरुणराजा कोपला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel