
कोरोना संपलेला नाही...
18 जुलैच्या मोहोरसाठी चिंतन
कोरोना संपलेला नाही...
गेल्या काही दिवसांपासून कोरोना कमी होऊ लागल्यावर निर्बंध उठविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी निर्बंध उठविण्याची तयारी दाखविलेली नाही, हे चांगले झाले. कारण जनतेसह विरोधकांनी संयंम बालगण्याची आवश्यकता आहे. राज्यातील बहुतांशी भागात जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र लॉकडाऊनसारखे कडक निर्बंधही नाहीत. अनेक भागात कागदावर निर्बंध असले तरीही त्यात बऱ्यापैकी शिथीलता आलेली आहे. ज्या भागात कोरोनाचे प्रमाण जास्त आहे तिकडे देखील लॉकडाऊन कडकपणे पाळले जात नाही. परंतु संपूर्ण राज्याचा विटचार करता, कोरोना आता कमी झाल्याने लोकांनाही शिथीलता पाहिजे आहे. परंतु त्यातूनच तिसऱ्या लाटेची बिजे रोवली जाणार आहेत. अजून कोरोना संपलेला नाही हे लक्षात ठेऊन आपल्याला अजून पुढील वर्ष काढायचे आहे. हे विसरता कामा नये. पहिली लाट संपत आल्यावर सरकारने आपलीच पाठ थोपटून घेतली. पाच राज्यात निवडणुका घेतल्या, लाखोंच्या संख्येने लोक सभांना उपस्थित होते. त्यानंतर कुंभमेळा झाला त्यात १५ लाखाहून जास्त हिंदू भक्त सहभागी झाले होते. याचा परिणाम म्हणून कोरोना झपाट्याने वाढला व परिस्थिती एवढी भयानक झाली की, मृतांची शव जाळायला जागा नव्हती. शेवटी लोकांना आपल्या आप्तांची शव गंगेत टाकण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही. असी भयानक अवस्था देशात होती. कोरोनामुळे अनेकांचे हाल होत आहेत हे नाकारता येत नाही. मुंबईसारख्या महानगरात लोकल सेवा नसल्यामुळे लोकांचे जीवन कष्टमय झाले आहे. हे वास्तव कुणी नाकारु शकणार नाही. पहिली लाट ओसरु लागल्यावर लोकल बहुतांशी लोकांसाठी खुली झाली आणि त्यातील गर्दीतूनच दुसरी लाट आली. यातून आपल्याला धडा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे यावेळी अनेक निर्बंध सैल केलेले नाहीत त्यामागे सरकारचा काही दुष्ट हेतू नाही तर तज्ज्ञांच्या समितीनेही त्यासंबंधी सल्ला दिला आहे. लोकांना आता कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांचा कंटाळा आला आहे, हे खरे असले तरीही सध्याच्या स्थितीत आपल्याला मुक्तपणे वावरण्यास मुभा देणे म्हणजे कोरोनाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखेच आहे. गेल्या दीड वर्षात लोक कंटाळले आहेत. अनेकांना घरात बसून काम करावे लागत आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ज्यांचे वय निवृत्तीच्या जवळ आहे त्यांना पुन्हा नोकरी मिळणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत लोकांना घरातून बाहेर पडावयाचे आहे, कामासाठी बाहेर पडावयाचे आहे किंवा चेंज म्हणून बाहेर जायचे आहे. मुंबईतील उच्च मध्यमवर्गीय आता शनिवार-रविवारी रिसॉर्टमध्ये जात आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळी गर्दी वाढते आहे. परंतु गर्दी वाढली की कोरोनाचा धोका वाढला हे नक्की. त्यातच आता गणपती पुढील महिन्यात येणार आहेत. एकूणच आपल्याकडे सण-उत्सव आले की लोकांचा उत्साह वाढतो. परंतु सध्या गर्दी करण्याचे दिवस नाहीत, त्यामुळे गणपती उत्सव गेल्या वर्षी प्रमाणे मर्यादीत करावा लागणार आहे. सरकारने निर्बंध लादल्याने विरोधी पक्षांसह जनता टीका करु लागली आहे. मात्र सरकार हे काही जाणूनबुजून करीत नाही, उलट निर्बंध ठेवल्याने सरकारचेही आर्थिक नुकसान होत आहे. महामारीचा आजवरचा दोन शतकांचा इतिहास पाहता सरासरी महामारी संपायला दोन ते तीन वर्षे लागतात. गेल्या १९१९-२० सालच्या स्पॅनिश फ्ल्यूच्या महामारीत तब्बल तीन वर्षे जीवन ठप्प होते व त्यात पाच कोटी लोकांचे जीव गेले होते. त्यात आपल्या देशातील दीड कोटी लोक मरण पावले होते. त्यापेक्षा यावेळच्या महामारीत लस केवळ एका वर्षात बाजारात आल्याने कोरोनाची लढाई सोपी झाली आहे. महामारीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळविता येते, याचे उत्तर सरळ आहे. एक तर कोरोनाचे विविध म्युटंटस तयार होऊन त्याची क्षमता कमी होते असा अनुभव आहे. त्यातून ही महामारी संपू शकते. परंतु यावेळी कोरोनाचे विषाणू वाढत चालले असताना ते अधिक धोकादायक होत चालले आहेत. दुसरे म्हणजे, लोकांना कोरोना होऊन त्यातून जनतेच्या शरीरात अँन्टीबॉडीज तयार होतात. त्यातून ही महामारी संपू शकते. परंतु अजूनही सर्व जनतेत अँन्टीबॉडीज तयार व्हायला प्रदीर्घ काळ लागेल. ७० टक्के जनतेला कोरोना झाल्यावर ही परिस्थिती निर्माण होईल व त्यातून कोरोनाचा प्रभाव कमी होईल. तिसरी महत्वाची बाब म्हणजे, कोरोनावरील लस दिल्यास सर्वांच्या शरीरात अँन्टिबॉडिज तयार होतील व त्यातून ही महामारी संपेल. सध्या ज्या देशांमध्ये ६० टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे त्यांनी लॉकडाऊन उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर ज्यांना कोरोना होतो त्यातील फारच अल्प प्रमाण हे लस घेतलेल्यांचे आहे. त्यामुळे सध्याच्या काळात लसीकरण करणे हाच एक प्रभावी उपाय ठरणार आहे. आपल्याकडे सध्या केवळ सहा टक्के जनतेचे पूर्ण लसीकरण झाले आहे व एक डोस २० टक्क्यांना दिला आहे. ही आकडेवारी पाहता लसीकरण झपाट्याने होण्याची गरज आहे. आपल्याकडे लोकसंख्या जास्त असल्याने लसीकरण मंदावले आहे असा युक्तीवाद केला आहे. मात्र आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या चीनने जवळजवळ एक अब्ज लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. आपल्याकडे लसीकरण जेवढे लांबेल तेवढी तिसरी लाट येण्याची शक्यता वाढणार आहे. परंतु आपल्याकडे सरकारने लसीकरणात जो घोळ घातला आहे त्यातून तिसऱ्या लाटेची बिजे रोवली जात आहेत. असा स्थितीत आपल्याला निर्बंधांसह जगावे लागणार आहे. अजून कोरोना संपलेला नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
0 Response to "कोरोना संपलेला नाही..."
टिप्पणी पोस्ट करा