-->
मोदींनी पिसलेले पत्ते

मोदींनी पिसलेले पत्ते

11 जुलैच्या मोहोरसाठी चिंतन मोदींनी पिसलेले पत्ते कोरोनातून झालेली बदनामी व लोकांचा सरकारवर निर्माण झालेला रोष यातून बाहेर येऊन आपली प्रतिमा पुन्हा सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्ते पिसले असून मंत्रीमंडळात सर्वात मोठे बदल केवळ दोन वर्षाच्या अंतराने केले आहेत. यात झालेल्या बदलानुसार ३६ नवीन मंत्री दाखल केले आहेत तर सात जणांना बढती दिली आहे. बारा जणांना डच्चू देण्यात आला आहे. नवीन दाखल केलेल्या मंत्र्यांमध्ये पक्षात नव्याने आलेल्यांचा भर जास्त आहे, त्यामुळे भाजपामध्ये पूर्वीपासून असलेल्यांच्या हाती पुन्हा एकदा टाळ्या वाजविण्याचीच पाळी आली आहे. पक्ष वाढीसाठी हे आवश्यक आहे असे कितीही भाजपाने सांगितले तरी त्यातून भविष्यात नाराजीच दिसून येणार आहे. मंत्रिमंडळातून गच्छंती केलेल्या मंत्र्यात रवीशंकर प्रसाद, जावडेकर, हर्षवर्धन यांचा समावेश आहे. रवीशंकर यांचा उध्दटपणा वेळोवेळी प्रकर्षाने दिसत होता त्यामुळे त्यांना घरी बसविले हे बरेच झाले. जावडेकरांचे काम फारसे कुठेच दिसले नव्हते. तर हर्षवर्धन यांना वाढता कोरोनाचा प्रसार भोवलेला दिसतो. अर्थात हर्षवर्धन हे केवळ बळीचा बकरा ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची कार्यपध्दतीच अशी आहे की ते प्रत्येक मंत्रालयात थेट हस्तक्षेप करतात, परिणामी मंत्र्यांला आपल्या इच्छेनुसार काम करता येत नाही. मोदींनी कोरोनाचे अपयश मोठ्या शिताफीने हर्षवर्धन यांच्यावर टाकून त्यांना मंत्रीमंडळातून हाकलले आहे. परंतु मोदी प्रत्येकवेळी हे महत्वाचा निर्णय घेताना जनतेपुढे येत होते. त्यामुळे अपयशाचेही त्यांनाच धनी व्हावे लागणार आहे. या खातेबदलाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. यातून शिवसेनेच्या राजकारणाची दिशाही नक्की होण्यास मदत होईल. शिवसेनेचे गेले काही दिवस भाजपासोबत गुफ्तगु सुरु होते अशी चर्चा होती. परंतु ही चर्चा फिसकटली असावी व त्यातून राणेंना मोठे करण्याचा, त्यांना मंत्रीपद बहाल करण्याचा निर्णय मोदींनी घेतला असावा. गेले काही वर्षे राणे शिवसेनेच्या व उध्दव ठाकरेंच्या विरोधात काही ना काही बरगळत आहेत, भाजपाला राणेंचा वापर सेनेच्या विरोधात करुन घ्यायचा होता व आहे त्यामुळेच राणेना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. राणेंनी जी गरळ गेल्या काही वर्षात सेनेच्या विरोधात ओकली त्याचे अखेर त्यांना फळ मंत्रीपदाच्या रुपाने मिळाले आहे. आता या नवीन सुत्रानुसार शिवसेना व भाजपा यांचे पुन्हा सूत जुळण्याची शक्यता मावळली आहे. त्यातून काकणभर का होईना महाविकास आघाडीचे सरकार स्थिरावेल असे दिसते. त्यातून राणेंना मंत्री केल्याने शिवसेना व भाजपाचा संघर्ष निदान कोकणात तरी वाढण्याची शक्यता जास्त आहे. राणेंमुळे आपल्याकडे मराठा मते खेचली जातील असा जर भाजपाच्या नेतृत्वाचा अंदाज असेल तर निश्चितच फोल ठरेल. कारण राणे हे मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून ओळखले जात नाहीत व मराठा समाजातही त्यांना फारसे स्थान नाही. त्याचबरोबर राणे यांच्या कामात हस्तक्षेप मोदी-शहांनी केल्यास ते कसे सहन करतात हे देखील पहावे लागेल. राणेंना दिल्लीला घेतल्याने फडणवीसही सुखावले असतील. कारण त्यांना परत मुख्यमंत्रीपदी बसायचेच असल्याने त्यात राणे हे मोठा अडसर ठरु शकतात. कपील पाटील यांना केंद्राने मंत्रीपद दिल्याने आगरी समाजाला मंत्रीमंडळात सर्वात प्रथम स्थान मिळाले आहे, हे स्वागतार्ह आहे. केंद्राने आता सहकार हे नवीन खाते सुरु केले असून ते खाते अमित शहा पाहणार आहेत. आजवर सहकार हे खाते प्रामुख्याने राज्याचा विषय होता निदान घटनेत तरी तशी तरतूद आहे. आता केंद्रानेही त्यात उडी घेऊन राज्यातील या कारभारात हस्तक्षेप करण्याचे ठरविले आहे. सहकारातील अनेक भ्रष्ट धुरीणींना आपल्याकडे नमते करण्यासाठी तर हे खाते सुरु केले असावे, याची शक्यता जास्त वाटते. एकीकडे केंद्र सरकार खासगीकरणाचा सपाटा लावीत असताना दुसरीकडे सहकार खाते सुरु करुन केंद्राला नेमके काय करायचे आहे ते समजलेले नाही. सहकार क्षेत्रात जर खरोखरीच सरकारला काही चांगले करावयाचे असेल तर ती स्वागतार्ह बाब ठरावी परंतु सध्या तरी त्यांचा उद्देश तसा दिसत नाही. तसे असते तर गृहमंत्र्यांनी आपल्याकडे ते खाते न राखता सहकारातील एखाद्या तज्ज्ञांची वर्णी लावली असती. आगामी काळात उत्तरप्रदेशातील निवडणुका येऊ घातल्याने तेथील सरकारला बळ देण्याचे काम या फेरबदलात करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशातील आता केंद्रात १५ मंत्री असतील. कर्नाटकातही येडूयेरप्पा यांना बळ देण्याचे काम करण्यात आल्याने राज्यात नेतृत्व बदलाची शक्यता आता संपली आहे. पश्चिम बंगालमधूनही चार नवीन मंत्री नियुक्त करण्यात आल्याने तेथील राज्य सरकार दुबळे करण्याचा व भाजपाची संघटना मजबूत करण्याचा इरादा व्यक्त झाला आहे. बिहारमध्येही भाजपाचा सहकारी पक्ष लोकशक्ती असलेल्या चिराग पासवान यांना बाजूला सारुन पशुपती पारस यांना मंत्रीपद बहाल केले आहे. तसेच जेडीयुच्या एकाचाही मंत्री म्हणून समावेश केला आहे. या फेरबदलामुळे मंत्रीमंडळात काही नवीन तरुण चेहरे दाखल करण्यात आले आहेत. याचा महत्वाचा फायदा म्हणजे मंत्रीमडळातील सरासरी वय आता ६०च्या खाली गेले आहे. आणखी एक नोंद करण्यासारखी बाब म्हणजे, वाजपेयी सरकारमधील केवळ दोन मंत्री आता या सरकारमध्ये आहेत. त्यामुळे आता पूर्वीच्या भाजपाने मुखवटा बदलून आता पूर्णपणे नव्याने वाटचाल करण्याचे ठरविले आहे. या विस्तारानंतर एकूण मंत्री सदस्यांपैकी ४१ जण हे व्यवसायिक आहेत. त्यात १३ कायदेतज्ज्ञ, ६ डॉक्टर, ५ अभियंते, ७ नोकरशहा, ७ पी.एच.डी.धारक, ३ एम.बी.ए. असे उच्चशिक्षित आहेत. भाजपाने ओ.बी.सी.चा आपला पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने १९ राज्यातील २७ जण ओ.बी.सी. मंत्री निवडले आहेत. ८ मंत्री मागासवर्गीय आहेत. तर महिला मंत्र्यांची संख्या आता ११ वर नेली आहे. मोदींनी अशा प्रकारे रंगसफेदी केली आहे. आपली कोरोनाच्या काळात जी प्रतिमा मलीन झाली आहे तिला सावरण्याचा व सर्व समाजघटकांना समाविष्ट करण्याचा केलेला हा एक प्रयत्न आहे. या पिसलेल्या पत्यांचा फारसा फायदा सरकारला होईल असे सध्या तरी दिसत नाही.

Related Posts

0 Response to "मोदींनी पिसलेले पत्ते"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel