
चीनी कम्युनिस्ट पक्षाची शताब्दी
04 जुलैच्या मोहोरसाठी चिंतन
चीनी कम्युनिस्ट पक्षाची शताब्दी
चीनच्या विकासात मोलाचा वाटा असलेल्या चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. अर्थात एखाद्या पक्षाच्या वाटचालीत शंभर वर्षे पूर्ण होणे ही काही नवीन बाब नाही, परंतु त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या वाटचालीचा आढावा घेणे योग्य ठरेल. जगाचा विचार करता अमेरिका व ब्रिटन या देशात वयाची शंभर गाठलेले अनेक पक्ष आपल्याला सापडतात. आशिया खंडातील राजकीय वाटचालींचा विचार करताना चीनच्या शंभरी गाठलेल्या कम्युनिस्ट पक्षापेक्षा जुना आपल्या देशातील कॉँग्रेस पक्ष आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेलाही येत्या चार वर्षांनी शंभर वर्षे पूर्ण होतील. देशातील कॉँग्रेस पक्षाला १३५ वर्षे पूर्ण झाली आहेत व त्यांच्या मागे स्वातंत्र्य चळवळीचा गौरवशाली इतिहास जोडलेला आहे. त्यातुलनेत सध्या सत्ताधारी असलेला भाजपा हा वयाने तरुण म्हणजे केवळ ३५ वर्षांचा आहे. मात्र त्यांच्या विचारांशी बांधलकी असलेल्या म्हणजे जनसंघाच्या रुपाने हिंदुत्ववादी पक्ष स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. आशिया खंडाचा विचार करता चीनी कम्युनिस्ट पक्ष हा डाव्या विचारांचा पक्ष तर देशातील कॉँग्रेस पक्ष हा डाव्या व उजव्या विचारांचा समतोल साधणारा व सर्वधर्मसमभाव पाळणारा पक्ष आहे, तर भाजपा हा पूर्णपणे उजव्या विचारसारणीचा आहे. मात्र भाजपाने ३५ वर्षापूर्वी स्थापनेच्या वेळी गांधीवादी समाजवादाची कास धरली होती. अर्थात ही संकल्पना नेमकी काय होती हे कोणीच सांगू शकणार नाही. परंतु तो काळच असा होता की, समाजवादाचा पुकार केल्य़ाशिवाय कुणीच जगू शकत नव्हता. कदाचित त्यामुळेच भाजपाने ही झूल पांघरली असावी. चीनी कम्युनिस्ट पक्षाने मात्र आपले एक वेगळे स्थान चीनमध्ये निर्माण केले आहे. चीनमध्ये एकच पक्ष अस्तित्वात आहे, त्यामुळे तेथे लोकशाही नाही, हे जरी खरे असले तरी त्यांनी ज्या गतीने गेल्या शंभर वर्षात विकास केला हे पाहता आपल्या लोकशाहीचे कौतुक करणे हास्यास्पद ठरेल. आपल्याकडील सत्ताधारी असलेला भाजपा सध्या सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवित असला तरी चीनी कम्युनिस्ट पक्षाची सर्वात मोठी यंत्रणा चीनभर उभी आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते वरपर्यंत पोहोचलेल्या नेत्यांशी त्यांचा संपर्क असतो. त्यातूनच पक्ष संघटना चांगल्या प्रकार बांधण्यात आली आहे. अर्थाच याचे श्रेय संस्थापक माओंना जाते. चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून प्रशासनावर अंकूश ठेवता येतो व विकास कामे झपाट्याने करता येतात. माओ यांनी यासंबंधी पाया रचला होता. चीनमधील ८० कोटी लोक गरीब होते. आज त्या सर्वांना गरीबीतून बाहेर काढण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्यने कोणत्याच देशाला गरीबी नष्ट करता आलेली नाही. आपल्याकडे उदारीकरणाचे वारे ९१ साली सुरु झाले, मात्र त्या अगोदर बारा वर्षे चीनने आपली अर्थव्यवस्था खुली करण्यास प्रारंभ केला होता. याचे सर्व श्रेय डेंग झिओपिंग यांना जाते. आपम आपली अर्थव्यवस्था खुली केली नाही तर आपल्याला रोजगाराच्या संधी नाहीत, तसेच देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली तरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील हे त्यांनी बरोबर जाणले व आपले बंदिस्थ दरवाजे खुले केले. असा प्रकारे अर्थव्यवस्था खुली करुन व बहुराष्ट्रीय कंपन्यांना आमंत्रण देत चीन आपल्या देशात भांडवलशाही आणत आहे, अशी जगातील कडव्या डाव्या विचारांच्या लोकांनी त्यावेळी चीनवर टीका केली होती. परंतु चीनच्या विचारांची दिशी पक्की होती, त्यांचा विचार बदलत्या काळाला अनुरुपच होता. त्यांनी कोणाच्याही टीकेला भीक घातली नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांना रेड कार्पेट घालून आमंत्रित केले, मात्र असे करीत असताना कामगारांचे हक्क डावलले जाणार नाहीत याची दखल घेतली. बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रकल्प उभारणीसाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा पुरविल्या. यातून मोठी रोजगार निर्मीती झाली व हा सर्व माल निर्यात कसा होईल ते पाहिले. त्यामुळे त्यांची निर्यातही वाढली. बहुराष्ट्रीय कंपन्यांना चीन हे त्यामुळेच गुंतवणुकीसाठी एक स्वर्ग असल्याचे पटले. चीनने या बहुराष्ट्रीय कंपन्यांना उत्कृष्ट पायाभूत सुविधा दिल्या व कामगारांना किती लाभ द्यायचा हे ठरवून दिले. त्यामुळे मालक-कामगार संघर्ष कधी होण्याची भीती नव्हती. यातून त्यांच्याकडे गुंतवणुकीचा ओघ जबरदस्त वाढला. एकीकडे औद्योगिक मार्गातून रोजगार निर्मीती करीत असताना कृषी क्षेत्रात मुलभूत सुधारणा केल्या. त्यामुळे शेतीतीलही रोजगार निर्मीती वाढली. हे सर्व करण्यात चीनी प्रशासनाबरोबरीने चीनी कम्युनिस्ट पक्षाचा मोलाचा वाटा आहे. हे सर्व करीत असताना त्यांच्यापुढे जबरदस्त आव्हाने उभी ठाकली, परंतु त्यांनी त्यावर मात केली. ८९ साली तरुणांचे लोकशाहीसाठी झालेले तितेमान चौकातील आंदोलन क्रुररित्या दडपून टाकण्यात आले. याचा सर्व जगाने निषेध केला परंतु त्याकडे चीनने ढूंकूनही पाहिले नाही. चीनमध्ये अशा लोकशाहीला चिरनिद्रा देणाऱ्या अनेक घटना घडल्या, त्याची अनेक पाश्चिमात्य पत्रकारांनी वर्णने प्रकाशित केली. परंतु चीनवर त्याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. चीनी कम्युनिस्ट पक्षाने काळाची पावले ओळखत आपल्यात बदल केले त्यामुळेच आज चीन भविष्यात एक महासत्ता होण्याच्या दिशेने आपली पावले टाकीत आहे. एकेकाळी सोव्हिएत युनियनमध्ये देखील आर्थिक, मुक्तपणा आणण्यासाठी पेरेस्ट्रॉईका व ग्लासनॉस्ट अवलंबिले होते. परंतु त्यात जी घिसडघाई करण्यात आली त्यातून त्यांची राजसत्ता कोसळली, देशाची शकले झाली. चीनने मात्र देशात सुधारणा करताना ज्या रशियाने चुका केल्या त्या केल्या नाहीत, त्यांची सर्वात जमेची बाजू. चीनने कुटुंबव्यवस्थेत देशाच्या गरजेनुसार बदल करायला लावले. त्यातील सुरुवातीच्या काळात लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी एक मुलाची सक्ती केली. त्यातून जे तोटे पाहिले त्यातून दोन मुलांची परवानगी दिली. अशा प्रकारे देशाच्या हितासाठी जनतेला न पटणारे निर्णय सक्तीने करायला लागले. त्यातूनच त्यांची राष्ट्रभक्तीच दिसली. आपल्यासारखी पोकळ राष्ट्रभक्ती चीनच्या सत्ताधाऱ्यांनी जोपासली नाही. चीनची आज जगात महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला क्रमांक पहिला पटकाविण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहे. संशोधन, अर्थकारण, निर्यात, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात चीनने आपले नाव कमविले आहे. यात सर्वात महत्वाची भूमिका ही चीनी कम्युनिस्ट पक्षाची आहे. कारण तेथे चिनी कम्युनिस्ट पक्षाची हुकूमशाही आहे. भांडवलशाही व कम्युनिझमचा अनोखा मेळ घालून विकासाची एक नवी रित जगाला चीनी कम्युनिस्ट पक्षाने घालून दिली आहे. पुढील दोन दशकात चीनचा असाच प्रवास सुरु राहिला तर अमेरिकेला मागे टाकून एक महासत्ता म्हणून जगात तिचा उदय होणार आहे. याचे सर्व श्रेय शतक पूर्ण करणाऱ्या चीनी कम्युनिस्ट पक्षाला जाते.
0 Response to "चीनी कम्युनिस्ट पक्षाची शताब्दी"
टिप्पणी पोस्ट करा