
एक पाऊल पुढे?
27 जूनच्या मोहोरसाठी चिंतन
एक पाऊल पुढे?
केंद्रातील भाजपा सरकरविरोधात 2024 च्या मध्यवधी निवडणुका लक्षात घेता मोर्चेबांधणी आतापासून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत झालेल्या बैठकीतून सुरु झाली आहे असे म्हणण्यास बऱ्यापैकी वाव आहे. गेले काही महिने शरद पवार याची चाचपणी करीतच होते. परंतु त्यांना नेमके आपल्याबरोबर कोण येतील याचा अंदाज येत नसावा. कारण यावेळीही त्यांनी बोलाविलेल्या १६ पक्षांपैकी सातच पक्ष उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या मंचाचे व्यासपीठ पुढे केले आहे. यासाठी त्यांनी एकेकाळचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य व भाजपाचे बुजुर्ग नेते लालकृष्ण अडवाणी यांचे सल्लागार सुधींद्र कुलकर्णी यांची मदत घेतली आहे. त्याच्या जोडीला पडद्यामागून पवारांच्या जोडीला निवडणूक आखणी करण्यात माहिर असलेले व २०१४ सालच्या मोदींच्या विजयातील शिल्पकार प्रशांत किशोर हे देखील आहेत. अर्थात याचा अर्थ मोदी सरकारच्या विरोधात जे ठाम आहेत तेच सध्या बैठकीला आले होते. पुढील काळात ही संख्या वाढत जाईल असे दिसते. देशातील सर्वात जास्त काळ सत्तेवर असलेला व सध्या मरगळीला आलेला कॉँग्रेस पक्ष अजूनही, असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशा भूमिकेत वावरत आहे. २०१४ पासून पराभवाचे सातत्याने रपाटे खाल्यावरही त्यातून उभारी घेण्याची कॉँग्रेस पक्षाची अजून मानसिकता तयार होत नाही याची सर्वात मोठी खंत मोदी विरोधकांना आहे आणि मोदी समर्थकांसाठी ही एक मोठी जमेची बाजू आहे. त्यातच पवारांच्या बैठकीला कॉँग्रेसला व शिवसेनेलाही आमंत्रण नव्हते. कॉँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, हे पवारांनी स्पष्ट केले हे बरेच झाले. कारण आजच्या घडीला भाजपाला समर्थ पर्याय उभा करावय़ाचा असेल तर भाजपा व विरोधी पक्षांची एकास एक लढत होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास व जर भाजपा, कॉँग्रेस व तिसरी आघाडी अशी तिरंगी लढत झाल्यास त्याचा फायदा भाजपालाच होणार हे नक्की आहे. अशा प्रकारच्या तोडफोडीचा फायदा भाजपाला नेहमीच होतो आहे. यापूर्वी अशा प्रकारे फायदा कॉँग्रेसला होत असे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गुजरातमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपले उमेदवार उभे केल्याने कॉँग्रेसला दहाहून जास्त जागांवर फटका बसला होता. एवढेच कशाला प्रकाश आंबेडकरांच्या स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या पवित्र्यामुळे गेल्या लोकसभेला भाजपाला राज्यातून डझनभर जागांचा लाभ झाला होता. ही सर्व गणिते लक्षात घेता भाजपा विरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणुका लढविणे आवश्यक आहे. त्यामुळे शरद पवारांनी जरी कॉँग्रेसला बैठकीला आमंत्रण दिले नसले तरी त्यांना कॉँग्रेसला विसरुन चालणार नाही व त्यांनी तसे सुतोवाचही केले आहे. सध्या पवारांनी मोदी विरोधात कोण येऊ शकतात त्याची चाचपणी केली असली तरी मोदी विरोधातील आघाडीचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यात त्यांची पंतप्रधानपदाची असलेली सुप्त इच्छाही लपलेली नाही. यासाठी बरेच उमेदवार इच्छुक आहेत, हे जरी खरे असले तरीही पवारांकडे सर्व पक्षांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य आहे. शरद पवारांचे नेतृत्व कॉँग्रसेला मान्य होईल का असा देखील सवाल आहे. सध्या कॉँग्रेस शरद पवारांच्या सोबत असली तरीही पवारांच्या संदर्भात अनेक मतेमतांतरे कॉँग्रेसमध्ये आहेत. परंतु सध्याच्या काळात कॉँग्रेसला मागे राहून जरी भाजपाला विरोध करता आला तरी ते मोठे आहे. त्यापूर्वी कॉँग्रेसमधील नेतृत्वाचा तिढा मिटण्याची गरज आहे. सध्या कॉँग्रेस पक्ष नेतृत्व नसल्याने भरकटलेल्या अवस्थेत आहे. राहूल गांधी यांनी नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारली पाहिजे, असे अनेकांना वाटत असले तरीही ते का स्वीकारत नाहीत हे अनेकांना पडलेले कोडे आहे. बरे आपल्या नेतृत्व करावयाचे नाही, पक्षाने अन्य कोणाला तरी अध्यक्ष करावे असे राहूल गांधी स्पष्ट बोलून मागेही होत नाहीत. त्यामुळे त्यांना अध्यक्ष व्हायचे आहे हे स्पष्ट आहे. परंतु त्यांच्या या वागण्यामुळे कॉँग्रेस पक्षाला मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. आज जी हालचाल शरद पवार करीत आहेत, ते प्रयत्न खरे तर कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून झाले पाहिजे होते. आज विरोधी पक्षांमध्ये नेतृत्वाची एक जी मोठी स्पेस निर्माण झाली आहे ती शरद पवार भरुन काढणार का असा सवाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय नाही असे सांगितले जाते, यामागचे कारण म्हणजे विरोधात नेता नाही. परंतु वाजपेयींनी २०१४ साली निवडणूक जाहीर केल्यावर अशीच स्थिती होती. परंतु कॉँग्रसने त्यावेळी पर्याय दिला व डाव्यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यामुळे सध्याच्या सरकारलाही कधी कोण पर्याय निर्माण होणारच नाही, हे सांगता येत नाही. सध्या नाही तरी कोरोनाच्या प्रश्नावरुन मोदी व भाजपाविरोधी सुप्त नाराजी आहेच. परंतु त्याचे पडसाद मतदानाच्या वेळी किती उमटतील ते काही सांगता येत नाही. असे असले तरीही कॉँग्रेससारखे ढिले राहूनही चालणार नाही. हे शरद पवारांनी बरोबर ओळखले आहे आणि त्यादृष्टीनेच नुकतीच झालेली बैठक आयोजित करण्याता आली होती.
0 Response to "एक पाऊल पुढे?"
टिप्पणी पोस्ट करा