-->
संपादकीय पान सोमवार दि. १४ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
लोकसंख्येत दिल्ली क्रमांक दोनवर!
------------------------------------------
आपल्या देशात झपाट्याने शहरांचे नागरीकरण होत चालले आहे. आजपर्यंत आपल्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के जनता ही लहान-मोठ्या व निमशहरात राहाते तर ७० टक्के जनता ग्रामीण भागात. गेल्या दोन दशकात आपल्याकडे शहरीकरण झपाट्याने वाढले. आता तर दिल्ली हे महानगर जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या शहरात क्रमांक दोनवर आले आहे. जपानची राजधानी टोकिओनंतर यंदा दिल्ली हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर झाले आहे. दिल्लीची लोकसंख्या १९९५ नंतर दुपटीहून अधिकने वाढून २.५ कोटींपर्यंत पोहोचली आहे. चालू वर्षाच्या जागतिक शहरीकरण भवितव्य अहवालात भारतातील शहरी लोकसंख्या सर्वाधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये भारत चीनलाही मागे टाकेल असे दिसते. संयुक्त राष्ट्राच्या या अहवालानुसार, जपानची राजधानी टोकिओ ३.८० कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. मात्र, टोकिओच्या लोकसंख्येत घट होण्याचे संकेत आहेत; मात्र तरीही पुढील दोन वर्षे हे जगातील सर्वात मोठे शहर म्हणून कायम राहिल. मात्र त्यांची ही लोकसंख्या कमी होऊन ३.७ कोटी एवढी होईल. जागतिक आरोग्य दिनानिमित्त गेल्या शुक्रवारी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत सध्या मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. २०३० र्पयत मुंबईची लोकसंख्या २.८० कोटी होईल आणि देशाची आर्थिक राजधानी जगातील चौथ्या क्रमांकाचे शहर बनेल. सध्या मुंबईची लोकसंख्या २.१ कोटी एवढी आहे. टोकिओ आणि नवी दिल्लीनंतर शांघायचे स्थान असून याची लोकसंख्या २.३ कोटी इतकी आहे. मेक्सिको सिटी, मुंबई आणि साओ पाउलोची लोकसंख्या २०१४ मध्ये जवळपास २१ कोटी एवढी होती. या अहवालानुसार, २०१४ ते २०५० यादरम्यान शहरी लोकसंख्येत सर्वाधिक वाढ भारत, चीन आणि नायजेरिया या देशांत होईल. जागतिक शहरी लोकसंख्येत होणार्‍या अंदाजित वृद्धीत या देशांचा वाटा ३७ टक्के एवढा राहील. आफ्रिका-आशिया खंडात सर्वाधिक शहरी लोकसंख्या वाढेल. भारतात सध्या ४१ कोटी एवढी शहरी लोकसंख्या आहे. २०२० मध्ये यात वाढ होऊन ती ८१.४ कोटींवर जाईल. सध्या प्रथम क्रमांकावर असलेल्या चीनची शहरी लोकसंख्या ७५.८ कोटी एवढी आहे. जगाच्या शहरी लोकसंख्येत भारत आणि चीन यांचा वाटा ३० टक्के इतका आहे. अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया, जपान आणि रशिया यांच्यासह या दोन देशांत जगातील अर्ध्याहून अधिक शहरी लोकसंख्या राहते. सध्या जगातील ५४ टक्के म्हणजेच ३.९ अब्ज लोकसंख्या शहरी भागात राहते. २०५० र्पयत हे प्रमाण वाढून ६६ टक्के म्हणजे ६.३ अब्जांवर जाईल. भारतात २०५० पर्यंत शहरी लोकसंख्येत ४०.४ कोटींची वाढ होईल. चीनच्या लोकसंख्येत २९.२ कोटी तुलनेत हा आकडा खूपच अधिक आहे. नायजेरियाच्या शहरी लोकसंख्येत २१.२ कोटींची वाढ होईल.
१९५० पासून ग्रामीण भागातील लोकसंख्या विस्तार खूप मंद गतीने झाला आहे. २०२० नंतर जगाची ग्रामीण लोकसंख्या घटू लागेल आणि २०५० र्पयत ही ३.२ अब्जावर पोहोचेल, असा अंदाज आहे. भारतात सध्या सर्वाधिक ८५.७ कोटी लोक ग्रामीण भागात राहतात. यानंतर ६३.५ कोटी लोकसंख्येसह चीन दुसर्‍या क्रमांकावर आहे. आपल्याकडे देशातील शहरी लोकसंख्या वाढत असताना आपण शहरातील लोकांच्या सुविधा पुरविण्यासाठी सज्ज आहोत का, याचा विचार केला पाहिजे. त्यादृष्टीने आपल्याकडे नियोजन करण्यात आलेले नाही. दिल्ली हे शहर आता गेल्या दोन वर्षात मेट्रोसारख्या नागरी वाहतूक सुविधांनी सज्ज झाले. आपण देशाची आर्थिक राजधानी ज्या मोठ्या गौरवाने म्हणतो त्या मुंबईची नागरी सुविधांच्या बाबतीत किती दारुण अवस्था आहे ते आपण पाहतोच आहे. मात्र भविष्यात शहरांच्या बाबतीत योग्य नियोजन झाले तरच आपण या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेऊ शकू.
----------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel