-->
कोरोना संपलेला नाही

कोरोना संपलेला नाही

20 जूनच्या मोहोरसाठी चिंतन
कोरोना संपलेला नाही कोरोनाचे रुग्ण आता राज्यातच नव्हे तर देशपातळीवर कमी होऊ लागले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वात मोठा दिलासा आता मिळू लागला आहे. रुग्ण कमी होऊ लागल्याने थकलेले प्रशासन, पोलीस व त्याच्या जोडीने जनता आता निर्धास्त होऊ लागली आहे. यातच सर्वात जास्त धोका तिसऱ्या लाटेची बिजे रोवण्यात होऊ शकतो. त्यासंबंधीचा इशारा राज्यातील डॉक्टरांच्या टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिला आहे. सर्वांनीच याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. दोन महिन्यांपूर्वी देशातील रुग्णसंख्या दररोज चार लाखांच्या घरात येत होती. परंतु आता त्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली आहे. सर्वात सकारात्मक बदल म्हणजे दररोज बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट नसली तरीही मृत्यू देखील कमी होत आहेत. गेल्या महिन्यात रुग्णांची संख्या, बऱ्या होणाऱ्यांची संख्या मृत्यूचे प्रमाण याच उच्चांक गाठला गेला होता. आता हा उच्चांक गाठल्यावर घसरण सुरु झाली आहे. परंतु लगेचच लोकांमध्ये त्यामुळे शिथीलता येऊ लागली आहे. सध्या कोरोना कमी होतो आहे म्हणजे संपूर्ण गेलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. गेल्या काही दिवसात आपल्याकडे विविध ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. प्रामुख्याने बाजारपेठा गर्दीचे फुलू लागल्या आहेत. आवश्यकता असले तरच घरातून बाहरे पडणे, गर्दी टाळणे या बाबी प्रत्येकाने जाणीवपूर्वक पाळणे गरजेचे आहे. नोकरी, कामधंदे करु नका अस कोण सांगणार नाही, परंतु गर्दी करु नकात हे पथ्य तरी आपण पाळू शकतो. अशा परिस्थीतीत बंधने न पाळल्यास कोरोना पुन्हा वाढू शकतो व त्यातून तिसऱ्या लाटेची बिजे रोवली जाऊ शकतात. कोरोनाची ही धोक्याची टांगती तलवार आपल्याच सर्वांच्या सहकार्यातून दूर होणार आहे. यासाठी गर्दी टाळली पाहिजे व लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. यातील गर्दी टाळणे हे जनतेच्या हातात आहे व लसीकरणाचा वेग वाढविण्याचे काम सरकारचे आहे. आपल्याकडे लसीकरणात सरकारने एवढा घोळ घातला आहे की, असा गोंधळ जगात कुठल्याच देशात झाला नसेल. एक तर लसीकरणाचे महत्व पटायला आपल्याकडे मार्च महिना उजाडला. जानेवारी अखेरपासून आपल्याकडे लसीकरण सुरु झाले खरे परंतु त्याला काही वेग आला नाही. कारण सरकारने ज्यावेळी लसींचे संशोधन अंतिम टप्प्यात आले त्यावेळी लस उत्पादकांकडे आगावू मागणी नोंदविणे गरजेचे होते परंतु तसे केले नाही. आपल्या पंतप्रधानांनी फक्त लसींच्या उत्पादक कंपन्यांचा दौरा केला. त्याचवेळी जर त्यांच्याशी बोलून लसींच्या बुकींगची आगावू रक्कम दिली असती तर सध्याची लस तुटवड्याची परिस्थिती आली नसती. परंतु आपल्या देशात तसे झाले नाही. त्यातच सुरुवातीला केंद्राने लस घेण्याचे ठरविले, त्यानंतर काही काळ राज्यांकडे लस खरेदी सोपविली. त्यानंतर पुन्हा आता आपल्याकडे केंद्राने हे अधिकार घेतले. अशा प्रकारच्या धरसोड वृत्तीमुळे लस धोरणाचे पुरते दिवाळे वाजले. राज्यांनी जागतिक पातळीवर लसींच्या निविदा मागविल्या परंतु लसींची आगावू मागणी अन्य देशांनी नोंदविलेली असल्याने लस कंपन्या निविदा भरतीलच कशाला? त्यामुळे लस नोंदविण्याचे काम यापूर्वीच व्हायला पाहिजे होते. त्यातच एका वयोगटातील लसीकरण होण्यापूर्वीच नवीन गटाला लस देण्याचे दिलेले आमंत्रण हे केंद्राच्या तोंडघशीच आले. त्यामुळेच सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आपल्याकडे लसीकरणाचा पुरता बोऱ्या वाजला आहे. परिणामी आपल्याकडे एकूण लोकसंख्येच्या चार टक्केच लसीकरण झाले आहे. सध्या २५ कोटी लोकांना एकच डोस दिला आहे. तर दोन्ही डोस दिलेले ४.७५ कोटीच नागरिक आहेत. तर आपल्या तुलनेत चीनने ९२ कोटी जनतेला एक डोस व २२ कोटी लोकांना दोन डोस दिले आहेत. आपली लोकसंख्या जास्त असल्याने लसीकरणास विलंब होत आहे असे सांगणाऱ्यांनी चीनचे उदाहरण लक्षात घ्यावे. आपल्याकडे सध्याच्या लसीकरणाच्या गतीचा विचार न करता सरकार न्यायालयात छातीठोकपणे सांगते आहे की, डिसेंबर पर्यंत लसीकरण पूर्ण करु. देशातील १३० कोटी लोकसंख्या लक्षात घेता आपल्याला एकूण २६० कोटी डोस लागणार आहेत. देशात हर्ड इम्युनिटी येण्यासाठी ७० टक्के लोकसंख्येला लसीकरण गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला किमान २०० कोटी डोस हवेत. त्यापैकी जेमतेम ३० कोटीच डोस आत्तापर्यंत दिले गेले आहेत. म्हणजे आपल्याकडे १७० कोटी डोस डिंसेंबरपर्यंत उपलब्ध झाले तरच सरकार आपले आश्वासन अंशत: पूर्ण करु शकते. कारण सर्व जनतेला म्हणजे १३० कोटी लोकांचे डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करु असे सरकारने न्यायालयात सांगितले आहे. सध्या आपल्याकडे कोव्हिशिल्डचे उत्पादन पुढील महिन्यापासून वाढवून महिना दहा कोटी कुप्यांवर नेले जाणार आहे. अन्य लसी स्पुटनिक, कोव्हॅक्सिन, फायझर जर भारतात वाढीव उत्पादन घेऊन उतरले तरी डिसेंबर पर्यंत त्यांना १७० कोटी डोस देणे काही शक्य होईल असे वाटत नाही. लसीकरण मर्यादीत होत असल्याने आता तिसरी लाट आपल्याला टाळता येणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. मध्यंतरी सरकारने डोस नसल्याने दोन डोस मधील अंतर वाढविले. यासाठी तज्ज्ञांनी साक्ष वापरली गेली. परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच होती. कोणत्याच शास्त्रज्ञाने अशी शिफारस केली नव्हती हे आता उघड झाले आहे. त्यामुळे मोदी सरकार किती खोटे बोलते याचा प्रत्यय आला. आता तर ही माहिती उघड केल्यास देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षीततेला धोका आसल्याचे अजब विधान करुन यासंबंधीची वस्तुस्थिती माहितीच्या अधिकारात देण्यास सरकारने नकार दिला आहे. अशा प्रकारची माहिती ही देशाच्या संरक्षण खात्याशी संबंधीत नाही, त्यामुळे यातून कोणता धोका देशाच्या सुरक्षिततेला आहे ते समजणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या खोट्या व अपारदर्शक सरकारकडून फार काही अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. उद्या तिसरी लाट येणार हे नक्की असताना जनतेनी आपली बचाव करण्यासाठी आपणच स्वत:हून पुढे येऊन पावले उचलली पाहिजेत. त्यामुळे कोरोना संपलेला नाही, आपण खबरदारी न घेतल्यास तो पुन्हा उसळी मारु शकतो, हे लक्षात ठेऊन पुढील पावले टाका.

0 Response to "कोरोना संपलेला नाही"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel