-->
भेटीमागचे गॉसिप व वास्तव

भेटीमागचे गॉसिप व वास्तव

13 जूनच्या मोहोरसाठी चिंतन
भेटीमागचे गॉसिप व वास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नुकतीच झालेली भेट ही त्यात झालेल्या चर्चेपेक्षा अन्य गॉसिपनेच जास्त गाजली. हे गॉसिप अर्थातच मराठी चॅनेल्सनी चांगलीच रंगविली आणि पूर्ण दिवसभर सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांना खाद्य पुरविले गेले. सर्वसामान्य जनतेला अशा भेटीत फारशी काही उत्सुकता असत नाही, जेवढी राजकारण्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना असते. परंतु चॅनल्स अशा भेटींना असा काही रंग देतात की, सर्वसामान्यांनही त्यात उत्सुकता वाटते आणि काही तास हा विषय चघळल्य़ावर ते चॅनल्स बघावेसे वाटत नाही. या भेटीत उभयतांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व अशोक चव्हाण असे दोन मंत्री होते. म्हणजे महाविकास आघाडीच्या सत्तेत भागिदारी असलेले तीनही पक्षांचे प्रतिनिधी होते. मात्र या दोघा मंत्र्यांना बाजूला सारुन मोदी व ठाकरे यांच्यात दहा मिनिटे वन टू वन चर्चा देखील झाली. अर्थात ही चर्चा काय झाली हे या दोघांच्या व्यतिरिक्त कोणीच सांगू शकत नाही. कारण तिकडे अन्य कोणीच नव्हते. मात्र अशी भेट खरोखरीच झाली की चॅनेल्सनी रंगविली हे देखील सत्य कोणी सांगू शकणार नाही. परंतु तरी देखील अशी चर्चा झाली असे आपण गृहीत धरु. सध्याचे सरकार सोडून पुन्हा बाहेर पडा व आपण म्हणजे भाजपाशी नव्याने संसार करु असा प्रस्ताव मोदी लगेचच देतील आणि ठाकरे त्याला मान हलवतील असे काही निश्चितच घडले नसणार. कारण जवळपास दीड वर्षात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून भाजपा आणि शिवसेना यांच्यात एवढे वितुष्ट निर्माण झाले की, ही दरी लगेचच सांधली जाऊ शकत नाही. याचा अर्थ महाविकास आघाडी फार मोठ्या भक्कम पायावर उभी आहे असे नव्हे तिचे खांब कधीही कोसळू शकतात. याची कल्पना सर्वांनाच म्हणजे तिनही पक्षांना आहे. परंतु राजकीय समीकरणे एवढ्या झपाट्याने काही बदलत नाहीत. आता जर पुन्हा शिवसेना-भाजपा एकत्र आले, नेते एकवेळ जुळवाजुळव करु शकतील परंतु सर्वसामान्य जनतेत वावरणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय, याचा कोणीच विचार करीत नाही. काल परवापर्यंत ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्या नकार्तेपणाबद्दल बोललो त्यांच्याशीच पुन्हा संसार मांडावयाचा हे गणित दिसते तेवढे काही सोपे नाही. शेवटी नेते देखील जनतेला बांधिल असतात. त्यांना देखील ठोस कारणे जनतेला सांगावी लागतात किंवा त्यासंबंधीचे नाटकही करावे लागते. शिवसेनेसोबत कॉँग्रेस जाणार (राष्ट्रवादीचा प्रश्न नाही) हे वास्तव पचवायला अनेकांना प्रदीर्घ काळ गेला आहे. अगदी कॉँग्रेसपासून ते शिवसेनेच्या नेत्यांनाही ते अवघड गेले आहे. हे सर्व लक्षात घेता मोदी व ठाकरे यांच्या भेटीमागे फारसे काही रहस्य असण्याची शक्यता नाही. ही भेट म्हणजे देशाच्या पंतप्रधानांची एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भेट असेच त्याचे वर्णन होऊ शकते. गेल्या दीड वर्षात ती होऊ शकली नाही कारण त्याचे मुख्य कारण कोरोना हेच होते. तसे पाहाता उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर एका कार्यक्रमासाठी मोदी एकदा पुण्याला आले होते त्यावेळी उध्दव ठाकरे विमानतळावर त्यांच्या स्वागतास हजर होते. ही त्यांची मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यावरची पहिली भेट. त्यानंतर त्यांची झालेली अलिकडची भेट. मध्यंतरीच्या काळात कोरनावरील प्रश्नासंबंधी चर्चा करण्यासाठी मोदींनी बोलाविलेल्या प्रत्येक ऑनलाईन बैठकीला ठाकरे आवर्जुन उपस्थित होते. त्याचबरोबर ठाकरे यांनी मोदींवर टीका करताना बराच संयम पाळला आहे. कारण उध्दव ठाकरेंचा स्वभाव तेवढा आक्रमक नाही. सध्याच्या कठीण काळात राज्याची कामे होणे महत्वाचे आहे, मोदींशी भांडण करणे हे प्राधान्य नाही असे गृहीत धरुन ठाकरेंचे वागणे दिसले आहे. भाजपा व मोदींच्या विरोधात बोलावयाला त्यांनी संजय राऊतांना नियुक्त केले आहे. सरकारमध्ये जबाबदारीचे पद सांभाळताना जो परिपक्वपणा दाखविला पाहिजे तो ठाकरेंनी पुरेसा गेल्या दीड वर्षात दखविला आहे. या काळात राज्यातील सरकार पाडण्यासबंधी अनेकदा भाजपाच्या नेत्यांनी वेळा दिल्या, परंतु ते काही शक्य झालेले नाही. कारण या सरकारमागे शरद पवार ठामपणाने उभे आहेत. अशा प्रकारे तीन पक्षांचा जुगाड शरद पवार करण्यात माहिर आहेत. यापूर्वी त्यांनी आपले राजकीय करिअर बहरत असताना पुलोदचा (यशस्वी) प्रयोग १९७७ साली केला होता, त्यात तर त्यांनी त्यावेळच्या संघापासून ते समाजवादी, पुरोगामी लोकांची मोट बांधली होती. आता दीड वर्षानंतर भाजपाला समजले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार पाडणे ही काही सोपी बाब नाही. त्यामुळेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तोरा आता कमी झालेला दिसतो आहे. या भोटीबाबत देखील त्यांनी खूपच सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांशी संवाद सुरु झाला हे उत्तम आहे, असे त्यांचे विधान सावधानगिरीतूनच आले आहे. कारण मोदी व ठाकरे यांच्या संवाद नव्हता असे कधीच नव्हते. सुसंवाद नव्हता, हे खरे असू शकते. सरकार गेल्यामुळे मोदींमध्ये कटुता असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सध्या तरी शिवसेना सध्याचा सत्तेचा संसार मोडून भाजपासोबत जाण्याची शक्यता दिसत नाही. पंतप्रधानांची भेट ही राज्यातील प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक लवकर करावी या हेतूने मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आहे. यात प्रामुख्याने आरक्षण, जी.एस.टी.ची थकबाकी या सारख्या केंद्राच्या अखत्यारीतील प्रश्नांची सोडवणूक लवकर केली जावी अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असावी. त्याचबरोबर अशा प्रकारे भेट घेऊन राष्ट्रवादी व कॉँग्रेसला गॅसवर ठेवण्याची संधीही या निमित्ताने ठाकरेंना मिळाली आहे. या भेटीला अनेक कंगोरे असू शकतात, परंतु सध्या तरी जी गॉसिप चर्चेत आली त्यात काहीच तथ्य नाही हे मात्र वास्तव आहे. सध्या तरी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल असेच दिसते.

0 Response to "भेटीमागचे गॉसिप व वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel