-->
संपादकीय पान गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
तळकोकणातील दरडी कोसळणे कधी थांबणार?
-------------------------------------
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव माळीण गावातील नैसर्गिक दुर्घटना पाहील्यास तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी अनेक संभाव्य नैसर्गिक दुर्घटना स्थळे आहेत त्याबाबत काही तरी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. निर्सग संपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगर दर्‍या भरपूर असल्याने चारही बाजूंनी नैसर्गिक धोक्याची भीती आहे. मात्र या सर्व बाबींचा विचार करुन आपत्कालीन यंत्रणा त्याची योग्य ती नोंद घेण्यात कमी पडत आहे. येथून जाणारा कोकण रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, खाडया, नद्या व बेसुमार वृक्षतोड अशा सर्व पातळीवर बारकाईने अभ्यास केल्यास निसर्ग कोपला तर धोकेच जास्त दिसून येतात.
कोकण रेल्वेमार्गावर दरवर्षीच दरडी कोरळत असतात. पावसाळ्यात तर दरडी कोसळल्याने रेल्वे मार्ग बंद होण्याचे प्रकार बरेच वेळा घडतात. आंबोली, रामघाट, फोंडाघाट, करूळ घाटमार्गावर दरडी कोसळण्याच्या भीतीने लोक त्रस्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आंबोली घाट हा पावसाळ्यात सर्वात धोकादायक ठरला आहे. येथे दरवर्षी तात्तपुरती मलमपट्टी करुन उपाययोजना केल्या जातात. मात्र त्याने हा प्रश्‍न सुटणारा नाही. राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात वाहतुकीचा खेळखंडोबा उडतो. भंगसाळ, पीठढवळ, बेल नदीला महापुराने वेढले तर महामार्ग बंद पडतो, तर खारेपाटण येथेही पुराच्या धोक्याची भीती असते. या मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात वाहतूक रोखली जाते, पण वाहनधारकांनी दक्षता घेण्याचे प्राधान्य दिल्याने धोके टळले आहेत. या महामार्गावरील नद्यांना सह्याद्रीच्या पर्वत रांगात कोसळणार्‍या पावसामुळे महापूर येतो. त्यामुळे महापुराचा धोका सर्वत्र जाणवूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन पुलांची उंची वाढविण्यात पुढाकार घेत नाहीत. हे नित्याचेच बनले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगात बेसुमार वृक्षतोड सुरूच असते. केरळातून येऊन तळकोकणात शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी कृषी विकासासाठी लाखो झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे डोंगरदर्‍यातून माती नदीपात्रात येते. नदीनाल्याची पात्रे गाळाने भरून जाऊन नद्यांचे प्रवाह बदलतात. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहाणार्‍या येथील नागरिकांच्या जीवाला पावलोपावली धोका जाणवतो. नद्यांच्या महापुराच्या विळख्यात जिल्ह्यातील काही मानवी वस्त्या सापडतात. मानवी वस्ती डोंगराच्या पायथ्याशी, नद्यांच्या शेजारी आहे, त्यामुळे महापुराचा धोका जाणवत असल्याने प्रशासन नाममात्र  स्थलांतराच्या नोटिसा देत प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करते. सागरी आक्रमण हा येथील एक स्वतंत्र विषय आहे. खाडीपात्रे रुंदावत आहेत, खारे पाणी सागरी किनार्‍याच्या जवळच्या वस्तीत घुसते. त्यातच डोंगर दर्‍याखोर्‍यात बेसुमार वृक्षतोडीसोबतच मायनिंग हे नवे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात खचलेल्या डोंगराचा किंवा खचलेल्या मातीमुळे धोका संभवला आहे. आपत्कालीन यंत्रणा हा नाममात्र उपाययोजना भाग म्हणून त्याकडे पाहिले जाते. जिल्ह्याचा सर्वागीण विकास होण्यासाठी नैसर्गिक आपत्तीचे धोके जाणून घेण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेने करायला हवा. माळीण गावात निर्माण झालेला धोका पाहता फक्त डोंगराच्या पायथ्याशीच राहणार्‍यांकडे पाहू नका, असे लोकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी बेसुमार वृक्षतोड झाल्याने हायवेच्या चौपदरी रस्त्याची भिंत पडून माती रस्त्यावर आली. हे एक साधे उदाहरण ध्यानात घेऊन जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीचे धोके टाळण्यासाठी जनतेच्या सहकार्याने यंत्रणेने आराखडा बनवून प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तळकोकणातील नैसर्गिक स्थिती पाहता तेथे दरडी पडण्याचे प्रकार जास्त आहेत. आजवर तेथे दरडी पडून फार मोठी मनुष्यहानी झालेली नसली तरीही भविष्यात तेथे माळीण होऊ नये यासाठी आत्तपासून सावधानगी बाळगण्याची आवश्यकता आहे.
------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel