-->
संपादकीय पान गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
राणेंचे पांढरे निशाण
-----------------------------
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अस्वस्थ असलेल्या कॉँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी गेलय् ापंधरा दिवसापूर्वी बंडाचे निशाण रोवले खरे परंतु लगेचच आपल्या हातात पांढरे निशाण घेऊन ते बंड मागे घेतल्याचे जाहीर केले. यातून त्यांनी फार काही मिळविले याचा लेखाजोखा केल्यास त्यांच्या हातात फारसे काही शिल्लक राहिलेले नाही असेच दिसते. कॉंग्रेस सोडल्यास अन्य पर्याय कोणता? हा प्रश्‍न त्यांच्यापुढे होता. भाजपामध्ये जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न जरुर केला परंतु त्यांना तेथे थार मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते. स्वाभिमान संघटनेचे रुपांतर स्वतंत्र पक्षात करुन हाती काहीच लागण्याची शक्यता नसल्यानेे तसेच पुत्र नितेश यांना उमेदवारी देण्याची पक्षश्रेष्ठींकडून मिळालेली हमी, यामुळेच कॉंग्रेस नेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारणारे नारायण राणे यांनी सपशेल माघार घेतली आणि मंत्रिपदी कायम राहिले आहेत. भविष्यातील पराभवाचे वाटेकरी व्हायचे नाही, असे सांगत राणे यांनी दोन आठवडयांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा राणे कॉंग्रेसला रामराम करणार अशीच चिन्हे होती. राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. भाजप नेतृत्वाने मात्र राणे यांना तेवढा प्रतिसाद दिला नाही. शिवसेनेची दारे कायमची बंदच आहेतच. राष्ट्रवादीमध्ये राणे टिकणे शक्यच नव्हते. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून राजकारण करणे तेवढे सोपे नाही, याचाही अंदाज राणे यांना आला. स्वाभिमान आणि मनसे एकत्र येऊन शिवसेनेची कोंडी करतील, अशीही चर्चा होती. पण राज ठाकरे आणि राणे यांचा स्वभाव लक्षात घेता दोघांचे पटणे कठीणच होते. अन्य कोणताही पर्यायच शिल्लक नसल्याने शेवटी राणे यांनी कॉंग्रेसमध्येच राहण्यावर भर दिला असावा असे दिसते.
कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न सहसा सहन केला जात नाही आणि तसे कुणी केल्यास त्याचा पक्षात निभाव लागत नाही. पण नारायण राणे हे याबाबत एकदा नव्हे तर दुसर्‍यांदा यात यशस्वी ठरले आहेत. राणे यांच्यासाठी कॉंग्रेसची एवढी अपरिहार्यता निर्माण का झाली, असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो. राणे यांना फार काही महत्त्व देऊ नये, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीदरबारी मांडले होते. पण राणे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला थोपवून पक्षाने मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा दिला आहे. लोकसभेतील दारुण पराभवाच्या पाश्वभूमीवर राणे यांच्यासारखा आक्रमक नेता गमाविणे पक्षासाठी हितकारक नाही, असा कॉँग्रेसच्या दिल्ली नेतृत्वात एक मतप्रवाह होता. त्यातूनच राणे यांना राहुल गांधी यांची भेट मिळाली. सोनियांची भेट मिळत नसल्याने राणे अस्वस्थ होते. नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्‍या भजनलाल आणि जगनमोहन रेड्डी यांना पक्षाने त्यांची जागा दाखवून दिली. पण राणे यांना रोखून पक्षाने वेगळा संदेश दिला आहे. गेली नऊ वर्षे कॉंग्रेसने राणे यांना पक्षात महत्त्व दिले नाही. त्यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण केली नाही. कॉंग्रेस संस्कृतीत ते पूर्णपणे रमले नाहीत. जेव्हा पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गोंजारले. राज्य कॉंग्रेसमध्ये प्रभावी नेत्यांचा अभाव असल्यानेच नेतृत्व राणेंबाबत मवाळ भूमिका घेत असावी, अशी शक्यता आहे. तसेच सध्याच्या स्थितीत कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक बरेच आहेत. मात्र पक्षात आक्रमक नेता नाही. आगामी निवडणुकीत कॉँग्रेस बॅकफुटवर असल्यासारखी किंवा पराभवाच्या छायेत असल्यासारखी आहे. अशा वेळी नारायण राणे कॉँग्रेसचे बळ वाढवू शकतील, असे केंद्रीय नेतृत्वास वाटते. सध्याचे राज्यातील नेते पाहिल्यास त्यात तथ्यही आहे असे म्हणावे लागेल. राजीनामा मागे घेताना तीन महिन्यांसाठी प्रदेशाध्यपद मिळावे, अशी अपेक्षा नारायण राणे यांनी व्यक्त केली असली तरी प्रचार समितीच्या अध्यक्ष पदाशिवाय राणे यांच्या पदरी फार काही पडण्याची शक्यता फारच कमी आहे. राणे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि आमदार कृपाशंकर सिंग यांनी दिल्लीश्वरांच्या वतीने मध्यस्थी केली. या सार्‍यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोठेच नव्हते. त्यांना सार्‍या घडामोडींची माहिती दिली जात होती. पक्षाने त्यांच्याकडे प्रचार समितीचे अध्यक्षपद सोपविण्याची तयारी यापूर्वी दर्शविली होती. पक्षाच्या विजयासाठी आपण उद्यापासून उतरणार आहोत हे राणे यांचे विधान सूचक आहे. प्रचार समितीचे अध्यक्षपद घेऊन काही तरी हाती लागले हे दाखविण्याचा राणे प्रयत्न करतील. आगामी निवडणूक ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार असली तरी निवडणुकीत सामुदायिक नेतृत्व असेल, असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला. अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली तेव्हा डिसेंबर २००८ मध्ये राणे यांनी कॉंग्रेस नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविले होते. त्यावरून राणे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. पुढे राणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर पक्षाने त्यांचे निलंबन मागे घेतले होते. आता दुसरे बंड करण्याचा राणे यांचा प्रयत्नही फसला आहे. असे असले तरीही राणेंनी आपल्या चिंरजीवाचा पराभव होऊनही कॉंग्रेस पक्षातील आपले वजन या निमित्ताने वाढवून घेतले आहे. आता पुन्हा सत्ता आणण्यात राणे यशस्वी झाल्यास त्यांचा पहिला दावा मुख्यमंत्रीपदावर राहिल हे नक्की. अर्थात या जर तर च्या गप्पा झाल्या. नारायण राणेंना निवडणूक प्रचाराची सर्व सुत्रे बहाल करुन कॉँग्रेसने एक महत्वाची जबाबदारी टाकली आहे. सध्या कॉँग्रेसला वाईट दिवस आले असताना राणेंपुढे एक मोठे आव्हान आहे.
--------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel