-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ८ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
राष्ट्रकूल स्पर्धेतील पदकांच्या घसरणीची कारणे
---------------------------------------
चार वर्षापूर्वी नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धा गाजली होती ती कलमाडींच्या भ्रष्टाचारामुळे. मात्र त्यावेळी भारताने पदकांची सेंच्युरी मारली होती. आता चार वर्षानंतर ग्लासगोमध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत आपली कामगिरी तुलनात्मकदृष्टया निराशाजनकच झाली आहे. त्यामुळे आपण गेल्या चार वर्षात प्रगती करण्याऐवजी अधोगतीकडे वाटचाल करीत आहोत. नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन अजून काही क्रीडा क्षेत्रात आलेले नाहीत असेच म्हणावे लागेल. कारण ग्लासगो येथील नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आपण पहिल्या पाचात स्थान कायम राखण्यात धन्यता मानली. यापूर्वीच्या क्रिडा स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या काळ्या कृत्याचा फटका पदाधिकार्‍यांपेक्षा खेळाडूंना अधिक बसला. खेळाडूंच्या प्रशिक्षणावरच्या खर्चाला कात्री लागली. देशातील प्रमुख क्रीडा प्रशिक्षण केंद्रांपैकी पतियाळा आणि बंगळुरू येथील कॅम्पची अवस्था अतिशय वाईट आहे. अशा परिस्थितीतही खेळाडूंनी ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलेली १५ सुवर्णपदके, ३० रौप्यपदके व १९ कांस्यपदके अशी एकूण ६४ पदकांची कामगिरी उत्कृष्टच म्हणावी लागेल. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत भारतीय ऑलिम्पिक संघटनाच अस्तित्वात नव्हती. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनवरील बंदी अजूनही आहे. मुष्टियोद्ध्यांना प्रशिक्षक देण्यासही मज्जाव करण्यात आला होता. परदेशी स्पर्धांमधील सहभागच बंद झाल्यामुळे अनुभवही नाही. २०१०च्या ७ पदकांच्या तुलनेत २०१४च्या स्पर्धांमधील ५ पदके ही मुष्टियोद्ध्यांची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. त्यापैकी चार मुष्टियोद्धे अंतिम फेरीत पराभूत झाले. गत स्पर्धेच्या तुलनेत नेमबाजी स्पर्धेतील काही क्रीडा प्रकार या वेळी रद्द करण्यात आले होते. तरीही भारतीय नेमबाजांनी या वेळी १७ पदके पटकावली. मल्लांनी ५ सुवर्णपदकांसह १३ पदकांवर हक्क प्रस्थापित केला. वेटलिफ्टर्सनी अपेक्षेप्रमाणे हात दिला व ३ सुवर्णपदकांसह १२ पदके मिळवली. ज्युडो या क्रीडा प्रकारात याआधी भारताच्या हाती फारसे काही लागायचे नाही. या वेळी भारतीयांनी ज्युडोत चक्क २ रौप्य व २ कांस्यपदके पटकावली. हॉकीत भारताने आपले रौप्यपदक राखले असले तरीही बलाढ्य ऑस्ट्रेलियापुढे आपला निभाव लागत नाही. पी. कश्यपने सय्यद मोदीनंतर तब्बल ३२ वर्षांनी भारताला राष्ट्रकुल बॅडमिंटनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवून दिले. बॅडमिंटन या खेळातील महिला विभागाचा आलेख मात्र उंचावण्याऐवजी खाली घसरला. उगवती तारका पी. व्ही. सिंधू  उपांत्य फेरीत गारद झाली, तर ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना महिला दुहेरीचा मुकुट स्वत:कडे ठेवण्यात अपयश आले. दीपा कर्मकारने जिम्नॅस्टिक्समध्ये कांस्यपदक पटकावून सर्वांना धक्का दिला असला तरीही दिल्लीत पदक पटकावणार्‍या आशिषकुमारने मात्र निराशा केली. दीपिका पल्लिकल व ज्योत्स्ना चिनप्पा यांनी स्क्वॅश महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावून नवा मानाचा तुरा देशाच्या क्रीडा इतिहासात खोवला. विकास गौडाने थाळीफेकीचे सुवर्णपदक पटकावून ऍथलेटिक्स स्पर्धेच्या एकूण ३ पदकांच्या कामगिरीत आपले नाव गाजवले. गतवेळच्या पाच पदकांच्या तुलनेत टेबल टेनिसच्या वाट्याला या वेळी मात्र एकच पदक आले. कुस्ती रेफरी वीरेंद्र मलिक यांच्याविरुद्धच्या विनयभंगाच्या तक्रारीमुळे आणि आयओए सचिव राजीव मेहता यांच्यावरील मद्यधुंद अवस्थेतील मोटार चालवण्याच्या आरोपामुळे भारताची अप्रतिष्ठा झाली. आपल्याकडे क्रिकेटचे जे स्तोम माजले आहे ते कमी करुन अन्य खेळांकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल. आपली सर्व शक्ती क्रिकेटच्या प्रचार व प्रसारासाठीच खर्च करतो, त्यामुळे अन्य खेळांकडे आपण लक्ष देतो. याचा परिणाम आपल्याला आपल्या खेळांवर होतो. यासाठी आपल्याला देशातील खेळ विकसीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. गेल्या दोन ऑलिंम्पिकमध्ये आपण सुवर्णपदकांपर्यंत मजल मारली आहे. अर्थात अशी सुवर्णपदके मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आपल्याकडे आज दमदार खेळाडू आहेत परंतु त्यांना योग्य प्रशिक्षण नाही. देशातील काही निवडक खेळाडू निवडून त्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यास आपण पदके मिळविण्यात बाजी मारु शकतो. पण हे करण्याची सरकारची इच्छा नाही. नव्याने स्थापन झालेले मोदी सरकार हे करील का हा प्रश्‍न आहे.  
--------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel