-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ८ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
संस्थापुरुष !
--------------------------------------
देशातील सर्वात मोठी व अव्वल दर्जाची सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ केशव ठाकूर यांचे निधन झाल्याने एका बँकरला, उत्कृष्ट संसदपटू, यशस्वी उद्योजक, कॅन्सरसारख्या दुर्दध रोगाशी तब्बल चार दशके लढा देणारे व विविध संस्थांचे आधारस्तंभ असलेल्या एका मोठ्या व्यक्तीला महाराष्ट्राने गमावले आहे. शून्यातून विश्‍व तयार करणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याएवढे असतात. त्यात ठाकूर यांचा समावेश होता. वेंगुर्ल्यातील म्हापण गावात जन्मलेल्या ठाकूर यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे मोठ्या बहिणीकडे राहून त्यांनी कुडाळ येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दुकानात गडी म्हणऊन काम सुरु केले. पुढे चालून हा मुलगा संसद गाजवेल व एक सहकारी बँक उत्कृष्टरित्या चालवेल असे कुणालाही स्वप्नातही वाटले नसेल. परंतु हिंमतीच्या व कष्टाच्या बळावर एकनाथ ठाकूर यांनी जग जिंकले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय स्तरावरील प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून बँकेत १९६६ साली थेट अधिकारी पदावर भारतातील सर्वात मोठ्या बँकेत ते नियुक्त झाले. अगदी जन्मापासून ते स्टेट बँक ऑफ इंडिया ही मानाची नोकरी मिळेपर्यंतचा कालखंड त्यांच्या जीवनातील संघर्षमय काळ होता. स्टेट बँकेत कार्यरत असताना जून १९६९मध्ये झालेल्या स्टेट बँक अधिकार्‍यांच्या सोळा दिवसांच्या अखिल भारतीय संपात त्यांनी प्रभावी संघटनात्मक कार्य केल्यामुळे, अगदी भर तारुण्यात ते अखिल भारतीय अधिकार्‍यांचे उमदे व प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे आले. कार्यकर्ते जोडणे, जपणे, प्रथम संस्था, नंतर कर्मचारी ही विचारधारा मनापासून जोपासणे, संस्थेचा कसलाही तोटा न करता, संस्थेच्या प्रत्येक कर्मचार्‍याला त्याच्या हक्काचा न्याय्य वाटा मिळवून देण्याची मनोधारणा असल्यामुळे त्यांना संस्थाचालक अणि कर्मचारी ह्या दोन्ही बाजूंकडून भरपूर सहकार्य आणि मानसन्मान मिळाला आणि म्हणूनच ते एक यशस्वी संघटना नेता होऊ शकले. ठाकूरांवर पहिली मोठी शस्त्रक्रिया झाली १९७० साली. तेव्हापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. या काळात त्यांच्यावर नऊ शस्त्रक्रिया झाल्या. मात्र यामुळे ते कधीही मनाने खचले नाहीत. ऐवढ्या दुर्दर रोगावर मात करुनही ते दररोज शेवटपर्यंत किमान १२ ते १४ काम करीत असत. ठाकूर हे कै. नाथ पै, एस. एम. जोशी, बाबा आमटे यांचे निस्सिम अनुयायी. राष्ट्रीय आणिबाणीच्या काळात सर्व स्तरांवर होत असलेल्या अन्यायांनी ते व्यथित झाले आणि राष्ट्रीय आणिबाणीच्या निषेधात त्यांनी स्टेट बँकेतील प्रतिष्ठेच्या अधिकारी पदाचा राजीनामा दिला. आणिबाणीच्या काळात सरकारी आस्थापनेतून आणिबाणीच्या निषेधार्थ राजीनामा देणारे ते पहिले राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी नेते होते, परंतु नियतीला त्यांचे स्टेट बँकेतून बाहेर जाणे मान्य नव्हते, त्यामुळेच की काय राजीनाम्यानंतर पंचवीस वर्षांनी त्याच महाकाय बँकेचे केंद्रीय संचालक म्हणून त्यांच्या विद्वतेची पोचपावती म्हणून केंद्र सरकारने त्यांची नेमणूक केली. ही बँकिंग विश्वातील अद्वितीय घटना होय. बँकेव्यतिरिक्त सामाजिक व राजकीय वर्तुळातही श्री. ठाकूरांनी आदर संपादित केला होता. स्वत:च्या नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग या संस्थेची स्थापना केली. राष्ट्रीयकृत बँका, विमा कंपन्या, केंद्र व राज्य सरकारी आस्थापना इत्यादी मधून ८० हजाराहून अधिक तरूण तरुणींना त्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकर्‍या मिळवून दिल्या. त्यातून हजारोंचे जीवनसेतु उभे करण्यात मदत केली. त्यांच्या ङ्गनॅशनल स्कूल ऑफ बँकिंगफच्या देशभरात शाखा निघाल्या. त्याचबरोबर स्थानीय लोकाधिकार समिती, मराठीमंडळ ह्यांच्या माध्यमातून मराठी माणसांसाठी त्यांनी संघटनात्मक महनीय कार्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेतर्फेे राज्यसभेत खासदार म्हणून पाठविले. ठाकूर यांचे अंतरंग निर्मळ होतेे, त्यांचे कोकणाच्या मातीशी घट्ट नातं आहे. ह्या मातीचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी सहजपणे पत्करली. कोकणातील आणि महाराष्ट्रातील अनेक नामांकित सामाजिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी होते व आहेत. ग्रंथालीच्या ज्ञानयज्ञाचे अध्यक्ष, कोकण भूमी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, भारत जोडो यात्रा संघटक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त, नाशिकच्या कवी कुलगुरु कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे विश्वस्त, मुंबईतील अतीविशाल इंडियन एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी व मानद सचिव, सानेगुरुजी कथामालेचे विश्वस्त, चि. त्र्यं. खानोलकर स्मारक समिती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष इ. विविध संस्थांतून ते कार्यरत झाले. अनेक नामांकित साहित्यिक, समाजसेवक, राजकारणी, उद्योगपती, अर्थशास्त्रज्ञ यांच्याशी त्यांनी मित्रत्वाचे संबंध जोडले. सिंधुदुर्गातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. आपण जे काही मिळविले त्यातील महत्वाचा हिस्सा समाजासाठी द्यावा या उदात्त हेतूने अनेक संस्थांना देणग्या देऊन कसलाही गाजावाजा न करता ते समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करीत. त्यांच्या कारकिर्दीत सहकारी क्षेत्रातील आघाडीच्या असलेल्या सारस्वत बँकेचा चेहरा बदलून आधूनिक तंत्रज्ञानाने परीपूर्ण अशी बँक म्हणून नावारुपाला आणली. आधूनिक सारस्वत बँकेचे श्री. ठाकूर हे निर्माते आहेत. बँकेच्या स्थापनेपासून म्हणजे १९१८ ते २००१ पर्यंत म्हणजे जवळ जवळ ८३ वर्षे बँकेचा एकूण व्यवसाय रु. ४,६०० कोटींचा होता. श्री. ठाकूर साहेबांच्या प्रगल्भ नेतृत्वामुळे २००१ पासून २०१३ पर्यंत फक्त तेरा वर्षात ह्या व्यवसायाचा रु. ३६,००० कोटींचा टप्पा बँकेला पार करता आला. सारस्वत बँकेच्या प्रगमनशील प्रवासाकरिता तिच्या शाखांचे जाळे विस्तारित व्हावे ह्यासाठी त्यांनी ङ्गअश्वमेधफ अभियान अंगिकारले. स्वत:ला नवनवीन कार्यात गुंतवून घेत आणि यशाची शिखरे गाठीत हे त्यांचे एक वैशिष्ट्यच. ज्या क्षेत्रात गेले तिथे ते यशस्वी झाले कारण जीवनाचा अर्थ त्यांना कळलेला असावा. जे काही करायचे ते सर्वस्व झोकून, पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने हे त्यांचे जीवनसूत्र होतेे. म्हणूनच एक कुशल प्रशासक व अधिकारी, उत्तम वक्ता, यशस्वी संस्थाचालक, उत्कृष्ठ सामाजिक आणि राजकीय भान असलेला संघटक, कसलीही अपेक्षा न बाळगता दातृत्व जपणारा दाता, अर्थशास्त्र आणि बँकिंग क्षेत्रातील मुरब्बी व्यक्तिमत्व असे अनेक कंगोरे असलेले त्यांचे जीवन बहुआयामी बनलेले आहे. समाजवादी विचारसरणीचा प्रभाव, बाबा आमटे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा लाभलेला अत्यंत जवळचा सहवास, पत्करलेल्या कार्यासाठी केलेला त्याग, निश्चित ध्येयपूर्ती, वंचिताबद्दलची कळकळ ह्या सर्व गोष्टी ठाकूर सरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या होत्या. त्यांच्या विचारांतून व्यक्त होणारा समंजसपणा, विचारांची परिपक्वता, सखोलता आणि सुसंस्कारीत वृत्ती यांचा ठसा त्यांच्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाच्या मनावर उमटत असे आणि हेच त्यांच्या नेतृत्वाचे आणि लोकप्रियतेचे कारण होते.
-----------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel