-->
निसर्गाची आपत्ती

निसर्गाची आपत्ती

05 June 2020 अग्रलेख निसर्गाची आपत्ती संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात असताना चक्रीवादळाचे संकट मोसमी पाऊस सुरु होण्याअगोदरच आपल्यावर येऊन कोसळेल असे कुणाला वाटलेही नव्हते. गेले तीन दिवस अगोदर हवामान खात्याने चक्रीवादळ येत असल्याची सुचना दिली होती. परंतु अनेकदा वादळे ही समुद्रात येतात व तेथेच विरुन जातात असा अनुभव आहे. त्यामुळे हे वादळ नेमके जमीनीवर येईलच का, अशीही शंका होती. परंतु अखेर हे वादळ मुंबईपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीला बुधवारी धडकलेच. मुंबई, ठाणे येथे त्याचा प्रभाव फारच कमी होता, कारण तेथे केवळ स्पर्श करुन ते पुढे सरकले. परंतु मोठ्या प्रमाणात शहरातील मालमत्तेचे नुकसान करुन हे वादळ अलिबाग, क्षीवर्धनच्या किनारपट्टीवर आदळले. मुंबईकरांनी जवळपास 139 वर्षांनी चक्रीवादळाचा थरार अनुभवला. परंतु मुंबईत हे चक्रीवादळ थेट न आदळल्याने येथील नुकसानही मर्यादीत होते. मात्र पावसाळी मोसम सुरु होण्याच्या अगोदरच पाऊस आल्याने मुंबईकर उन्हाळ्याच्या लाहीहून यंदा लवकर निसटल्याने तो अखेर सुखावला. निसर्गाचा सर्वाधिक फटका हा रायगड जिल्ह्याला बसला. प्रामुख्याने किनारपट्टीला धडका देऊन हे वादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने गेले. मात्र त्याचा नंतर प्रभाव कमी होत गेला व हळूहळू ते विरळ होत लुप्त झाले. रायगड जिल्ह्याला तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीला गेले दोन दिवस सावधानतेचा इशारा दिला गेल्यामुळे प्रशासनाला सावधानता बाळगता आली. किनारपट्टीवरील असुरक्षीत असलेल्या घरातील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. तसेच नेमके वादळ थडकणार त्यावेळी बहुतांश भागातील वीज तसेच नेट सेवाही बंद करण्याची खबरदारी घेण्यात आली होती. रायगड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी वीज पुरवठा हा ओव्हरहेड वायरमधून होत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी हे करण्यात आले. प्रशासनाने एवढी चांगली खबरदारी घेऊनही शेवटी अलिबाग तालुक्यात व श्रीवर्धन तालुक्यात प्रत्येकी एक मृत्यू झालाच. मात्र एवढे मोठे नैसर्गिक संकट येऊनही आपण फार मोठ्या प्रमाणात होऊ शकणारी मनुष्यहानी टाळू शकलो, हे एक मोठे यश म्हटले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने चांगलीच तयारी केली होती. हवामानखात्याने आगावू सूचना दिल्यामुळे समुद्रात गेलेल्या सर्व मच्छिमारांना त्याची सूचना देऊन माघारी बोलाविण्याचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात आले. त्यासाठी सीमा तटरक्ष दलाच्या जवानांनी खोल समुद्रात जाऊन जे मच्छिमारीसाठी गेले होते त्यांना शोधून काढून त्यांना परत माघारी पिटाळले. त्यामुळे सर्व मच्छिमार सुरक्षीत आपल्या घरी पोहचू शकले. त्यामुळे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्याअगोदर कोकणपट्टीतील सर्व मच्छिमार आपल्या घरी सुरक्षीत पोहोचले होते. आपत्ती व्यवस्थापनाचे खास दल रायगडच्या तसेच कोकणाच्या किनारपट्टीवर तैनात ठेवण्यात आले होते. निसर्गचे संकट आता पूर्णपणे संपले असून आपण त्यावर विज्ञानाच्या जोरावर मात केली आहे. निसर्गच्या चक्रीवादळाला आपण रोखू शकत नाही परंतु मानवाने केलेल्या संशोधनाच्या आधारे आपण त्यावर मात करुन कमीतकमी कशी मनुष्यहानी होऊ शकतो ते पाहू शकतो. यापूर्वीही देशात आपण अशा अनेक चक्रीवादळाचा यशस्वी सामना केला आहे. दोन वर्षापूर्वी ओरिसात आलेल्या चक्रीवादळाने तर असाच हाहाकार माजविला होता. मात्र त्यावेळी तेथील सरकारने तर तब्बल दहा लाख लोकांचे स्थलांतर करुन मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी टाळली होती. आता देखील आपण या चक्रीवादळाचा यशस्वी मुकाबला गेला आहे. आता वादळ संपल्यावर वादळपश्चात संकटाचा मुकाबला करावयाचा आहे. त्यात पुन्हा कोरोनाचे संकट हे आहेच. यात अनेकांच्या घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता त्याचे तातडीने पंचनामे सुरु करणे हे पहिले काम प्रशासनापुढे असेल. त्यानंतर जे वादळग्रस्त आहेत त्यांना त्यांची नुकसानभरपाई वेळेत देणे हे प्रशासनापुढील मोठे आव्हान असेल. त्यासाठी राज्य सरकारकडून जादा निधी मंजूर करुन घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असेल. त्यासाठी आवश्यकता भासल्यास कोकणातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी आपल्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊन जादा निधी कसा मिळेल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आगामी पावसाळी आधिवेशनातही हा विषय लावून धरावा लागेल. या वादळातील एकाही आपदग्रस्त हा नुकसानभरपाईशिवाय राहाता कामा नये, हे पाहिले गेले पाहिजे. कोकणावर अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येण्याची काही ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही वादळ, पूर अशा संकटांचा सामना कोकणाने केला आहे. या चक्रीवादळाची आगावू सूचना आपल्याला उपग्रहाने पाठविलेल्या फोटोव्दारे मिळाली व आपल्या हवामान खात्याने सावध केले. त्यातून ही सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली. स्वातंत्र्यानंतर आपण केलेल्या प्रगतीचे हे एक मोठे यश आहे असेच म्हणावे लागेल. आपल्याकडे हवामान खात्याचा अनेकदा पावसाचा अंदाज चुकतो, त्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीकाही होते. मात्र त्यांचे वादळासंबंधीचे बहुतांशी अंदाज खरे ठरतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे आपण आपल्या हवामान खात्याच्या सतर्कतेचेही कौतुक केले पाहिजे. त्यांनी आगावू सूचना देता आल्यामुळे पण या आपत्तीचा सामना करु शकलो हे विसरता येणार नाही. त्याचबरोबर देशाने गेल्या 60 वर्षात काय केले? असे विचारणाऱ्यांनाही याव्दारे चोख उत्तर दिले पाहिजे की, बघा देशाने ही वैज्ञानिक प्रगती केल्यानेच आपण आज या चक्रीवादळाचा मुकाबला यशस्वीरित्या करु शकलो. आत्मनिर्भर भारत ही नव्याने घोषणा देण्यात काहीच अर्थ नाही. आपण स्वातंत्र्यानंतरच आत्मनिर्भर होऊन यशस्वी वाटचाल करीतच आहोत.

Related Posts

0 Response to "निसर्गाची आपत्ती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel