
उभारी घेऊया...
06 June 2020 अग्रलेख
उभारी घेऊया...
निसर्ग या चक्रीवादळाचा सर्वच कोकण किनारपट्टीला फटका बसला असला तरी रायगड जिल्ह्यात हे वादळ थेट धडकल्याने येथील नुकसान सर्वाधिक आहे. आता जनतेचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्याने सर्व शासकीय यंत्रणा आता सक्रीय झाली आहे. असे असले तरी तातडीने जनतेला आर्थिक नुकसानभरपाई देण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिला रायगड दौरा होता. त्यांच्या या दौऱ्यामुळे रायगडवासिय आता आपल्याला लवकर मदत मिळणार याबाबत आश्वस्त झाले आहेत. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडाले आहेत. सध्या बाजारात पत्रे उपलब्ध नसल्यामुळे तसेच पाऊस आता तोंडावर आल्याने त्यांच्या घरावर तातडीने पत्र बसविले जाणे गरजेचे आहे. अनेकांचे संसार या चक्रिवादळाने उघड्यावर आणले आहेत. त्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने त्यांनी मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना तातडीने अन्न व स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविले जाणे ही प्राधान्यतेचे गरज आहे. त्याचबरोबर जिल्हातील अनेक भागात वीज सुरु झालेली नाही. काही भागात 24 तासानंतर वीज आली आहे. मात्र काही भागात जिकडे मोठ्या प्रमाणावर लाईटचे पोल्स पडले आहेत तेथील वीज आलेली नाही. तेथे महावितरणचे कर्मचारी अहोरात्र कार्य करीत आहेत. परंतु त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी पडत असल्यास त्यांना अन्य जिल्ह्यातून कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन दिला पाहिजे. त्यामुळे वीज सुरु करणे ही देखील प्राधान्यता आहे. वीज सुरु करताना रुग्णालये व दवाखाने यातील वीज तातडीने सुरु केल्यास जनतेला मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर अनेक भागात मोबाईल टॉवर्स ठप्प झाले आहेत. काही ठिकाणी बी.एस.एन.एल.चे टॉवर फक्त कार्यरत आहेत तर खासगी कंपन्या पूर्णपणे ढेपाळल्या आहेत. काही भागात अजूनही नेटची व्यवस्था नाही. सध्याच्या काळात नेट सुरु राहणे ही अत्यंत महत्वाची बाब ठरते. त्यामुळे वीजेच्या जोडीने नेटचा पुरवठा सर्वत्र सुरळीत होणे गरजेचे आहे. रायगड जिल्हा या मुंबईला जोडलेला असून किनारपट्टीचाही भाग मोठ्या प्रमाणात आहे. अशा स्थितीत येथील सर्व वीजपुरवाठा हा पोल्स एवजी जमीनीखालून करण्यासाठी आत्ताच काम सुरु केले पाहिजे. चक्रीवादळ सोडा परंतु जास्त पाऊस झाल्यावरही अनेक भागातली वीज गायब होते. अशा स्थितीत संपूर्ण जिल्ह्यातील वीज पुरवठा भूमीगत मार्गाने होण्यासाठी पुढील तीन ते पाच वर्षाची योजना आखली गेली पाहिजे. सध्या कोरोनाचे संकट असताना मदतकार्यात अनेक अडथळे येणे स्वाभाविक आहे. सध्याच्या काळातील अनेक मर्यादा लक्षात घेऊन मदतकार्याचे काम करावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मंत्रालयात यासंबंधी सर्व अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे बैठक घेऊन तसेच शुक्रवारी प्रत्यक्ष पहाणी दौरा करुन मदत कार्याला कसा वेग येईल ते पाहिले आहे. कोरोनामुळे अनेक चाकरमनी मुंबईहून येथे आपल्या गावाला आसरा घेण्यासाठी जिल्ह्यात आले आहेत, काही ठिकाणी ते गावाच्या बाहेर क्वारंटाईन आहेत. त्यांच्याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यांची कोरोना चाचणी करुनच मग हलविले पाहिजे. आपल्याकडे पूर्व किनारपट्टीवर वादळे ही नेहमीची झाली आहेत. परंतु पश्चिम किनारपट्टीवर फारशी वादळे येत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे. मुंबईनेही 139 वर्षानंतर यावेळी पहिल्यांदा चक्रीवादळ अनुभवले. पंरतु आता पश्चिम किनारपट्टीवरही वादळे येण्याचा धोका ओळखून पुढील काळात वाटचाल करावी लागणार आहे. त्यासाठी आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी लागेल. पालघरपासून सुरु झालेली आपली पश्चिम किनारपट्टी सिंधुदुर्गपर्यंत आहे, ही आजवर नेहमीच सुरक्षीत राहिली आहे. परंतु भविष्यात वादळाचे होणारे धोके लक्षात घेऊन पावले टाकावी लागणार आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा लँडिंग पॉंईंट हा अलिबाग ते श्रीवर्धन असल्याने तेथे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. जवळपास जिल्ह्यातील एक लाखाहून झाडे पडली आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, पाच हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारचे पंचनामे सुरु झाले असून अनेक ठिकाणी त्यांना अंतर्गत रस्ते खराब असल्याने अडथळे येत आहेत. रायगड जिल्ह्याच्या बरोबरीने रत्नागिरी, सिधुंदुर्ग या शेजारच्या जिल्ह्यातही नुकसान झाले आहे, मात्र तुलनेने कमी आहे. पर्यटन व्यवसाय हा रायगडचा आत्मा आहे. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुरुवातीला कोरोना व आता चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसायावर संक्रांत आली आहे. अशा वेळी हा उद्योग पुन्हा नव्याने उभारावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यकता लाभल्यास या पर्यटन उद्योजकांना बँकांची कर्जे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन द्यावी लागतील. या चक्रीवादळाच्या निमित्ताने रायगडची पुन्हा एकदा नव्यानेच उभारणी करावी लागणार आहे. आपत्ती ही अनेकदा आपल्याला पुढील भविष्य चांगले करण्याची संधी चालून आलेली असते. चक्रीवादळाची ही आपत्ती रायगडसाठी अशीच चांगली संधी ठरावी. यातून पुन्हा एकदा औद्योगिकदृष्टया प्रगत, पर्यटनाचे आकर्षण ठरलेला व शेतीने समृध्द रायगडाची भरभराट होईल अशी अपेक्षा व्यक्त करु या.
0 Response to "उभारी घेऊया..."
टिप्पणी पोस्ट करा