-->
पनामा पेपर्सचे भूत

पनामा पेपर्सचे भूत

शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
पनामा पेपर्सचे भूत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणुकीच्या काळात काळ्या पैशांवर भर दिला होता. परदेशातील काळा पैसा देशात आणू व त्या पैशाचे वाटप भारतीय लोकांमध्ये करु अशी त्यांची घोषणा होती. मात्र सरकारने सत्तेत आल्यावर यासंबंधी एक समिती नेमण्याच्या पलिकडे फारसे काही केले नाही. त्यामुळे मोदी यांनी हा मुद्दा फारसा मनावर न घेता केवळ निवडणुकपुरताच होता असे अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. गेल्या तीन वर्षात सरकारच्या हाती देशातील व विदेशातील एकही रुपया हाती लागलेला नाही. नोटाबंदीमुळे काळा पैसा हाती लागेल असे मोठे गुलाबी चित्र उभे करण्यात आले होते. मात्र त्यातही डोंगर पोखरुन झुरळही हाताशी लागलेले नाही. काळा पैसा शोधणे ही बाब सोपी आहे असे नरेंद्रभाईंना खरे वाटतच नव्हते. कारण मोदी हे स्व:त आपण गुजराती हे व्यापारी आहोत असे मोठ्या अभिमानाने सांगतात. त्यामुळे हा काळा पैसा हाती लागणे अशक्य आहे याची त्यांनी कल्पना होतीच. केवळ निवडणुकीसाठी हा मुद्दा त्यांना आपल्यासाठी वापरावयाचा होता. असो. आता पनामा पेपर्समध्ये 714 भारतीयांची नावे आढळल्याने सरकारला एक जोरदार दणका बसला आहे. खरे तर यात नवीन असे काहीच नाही. यातील नावे यापूर्वीही चर्चेत आलेली आहेत. परंतु त्यापुढे काहीच झाले नाही. मात्र त्यावेळी कॉग्रेसचे राज्य् होते व कॉग्रेस काही करीत नाही असे आपण गृहीत धरलेले आहेच. आता भाजपाचे आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा मोठ्या आहेत. त्यांनी आता तरी पनामा पेपर्समध्ये असलेल्या बड्या धेंडांना कोठडीची हवा दाखविणे आवश्यक आहे. सरकारने या प्रकरणी कसून तपासणी करण्याची तयारी दाखविली आहे. परंतु कसून म्हणजे नेमके काय याचे उत्तर कालांतराने मिळेल. जगभरातील राजकारणी, उद्योजक, चित्रपट तारे आणि अन्य अनेकांनी अवाढव्य रकमा परदेशातील टॅक्स हेवन असलेल्या देशात गुंतवून केलेल्या करचुकवेगिरीचा उजेडात आलेला महाघोटाळा अब्जावधी डॉलर्सचा आहे. जगाच्या पाठीवरील 180 देशांमधील बड्या-बड्यांची नावे या प्रकरणात असून, त्यात 714 भारतीयांचा समावेश आहे. यात मोठा दणका भाजपाला बसला आहे, कारण केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा व राज्यसभा सदस्य रवींद्र किशोर सिन्हा यांची नावे यात आढळली आहेत. कोट्यवधींची कर्जे बुडवून परदेशात फरारी झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि सुपरस्टारफ अमिताभ बच्चन, कॉर्पोरेट क्षेत्रात लॉबिंग करण़र्‍या नीरा राडिया यांचाही समावेश असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा (सीबीडीटी)च्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणातील भारतीयांची चौकशी करण्यात येणार असली तरी, त्यात जयंत सिन्हा यांचे नाव आल्याने केवळ या यादीत नाव आहे, याचा अर्थ त्यांनी काही गैरव्यवहार केला असा नाही! अशी सारवासारव सरकारी अधिकार्‍यांनी सुरू केली आहे. आता हेच जर कॉग्रसेच्या एखाद्या मंत्र्याचे नाव असते आणि भाजपा विरोधी पक्ष असता तर त्यांनी किती कल्लोळ केला असता याची कल्पनाच न केलेली बरी. या यादीत जगातील बड्या धेंडांची नावे असल्याने अनेकांना आश्‍चर्य वाटण्याची शक्यता आहे. कारण यात ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाचे पंतप्रधान यांच्याबरोबरच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शौकत अझीझ आदी नेत्यांचीही नावे असल्यामुळे अनेकांना आश्‍चर्य वाटेल. परंतु अशा प्रकारची करचुकवेगिरी ही जगात चालते. कारण त्यामागे फसवणुकीची मानसिकता आहे. केवळ जादा कर असल्यामुळे कर चुकवेगिरी होते असे नाही तर तशी मानसिकता त्यांची असते. अशा या नेत्यांची कृत्ये लपविण्याचे काम आताचे आपल्याकडील राजकारण करीत आहेत. जगात अनेक देश हे टॅक्ल हेवन म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी अनेक धनिक उत्सुक असतात कारण त्यामुळे त्यांचा कर वाचतो. मात्र त्यामुळे ते ज्या देशातून पैसा कमवितात त्या देशाच्या तिजोरीत पैसा देत नाहीत. हा त्यांचा मोठा गुन्हा आहे. करवसुलीच्या जगभरातील व्यवस्थेतील कच्चे दुवे करचुकवेगिरीलाच कशा वाटा मोकळ्या करून देत आहेत, यावरच पॅरडाइज पेपर्समुळे प्रकाश पडला आहे. अर्थात, त्याचा पहिला गौप्यस्फोट हा पनामा पेपर्समुळे झालाच होता. बर्म्युडातील ऍपलबॉय या कायदेविषयक सल्लागार संस्थेमार्फत उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतून हे प्रकरण उजेडात आले आहे. खासदारकीपूर्वी विद्यमान मंत्री जयंत सिन्हा हे डिलाइटफ कंपनीचे संचालक होते आणि उमेदवारी अर्जाच्या वेळी त्यांनी ही माहिती लपवली, तसेच पंतप्रधान कार्यालयालाही याचा सुगावा लागू दिला नव्हता, असे ही कागदपत्रे सांगतात; तर अमिताभ बच्चन यांनी बर्म्युडातील जलवा मीडिया कंपनीत कौन बनेगा करोडपती या बहुचर्चित आणि धनाढ्य मालिकेच्या पहिल्या हंगामानंतर 2002 मध्ये गुंतवणूक केली होती, असे या कागदपत्रांवरून उघड झाले आहे. राणी एलिझाबेथ यांनी कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक परदेशात केल्याचे या कागदपत्रांवरून दिसते. या राजघराण्याने अशी गुंतवणूक करणे कायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या मालमत्तेची देखभाल करणार्‍या व्यवस्थापकांनी केला आहे. जागतिक पातळीवर एका रशियन कंपनीनेही अशाच प्रकारची गुंतवणूक परदेशात केल्याचे स्पष्ट झाले आहे, शौकत अझीझ हे अशा प्रकारे परदेशात गुंतवणूक करून करचुकवेगिरी करणारे पाकिस्तानचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी नवाज शरीफ यांचे नाव गैरव्यवहारांच्या संदर्भात समोर आले होते. आता ट्रम्प ते राणी एलिझाबेथ आदी अनेक बड्या नेत्यांचे पितळ उघड झाल्याने या गौप्यस्फोटाचे जागतिक स्तरावर होणारे परिणाम अपरिहार्य दिसतात. यापूर्वीच्या कॉग्रेस सरकारच्या मानगुटीवर पनामा पेपर्सचे हे भूत सतत बसलेले असायचे. त्यावेळी भाजपा टाळ्या वाजवित असे. आता भाजपाच्या मानगुटीवर हे भूत बसले आहे. याची त्यापासून ते कशी सुटका करतात ते पहायचे.
----------------------------------------------------------

0 Response to "पनामा पेपर्सचे भूत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel