
परखड राजीव बजाज
08 June 2020 अग्रलेख
परखड राजीव बजाज
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लॉकडाऊन कसे चुकीच्या पध्दतीने हाताळले व त्यातून अर्थव्यवस्था कशी लयाला गेली यासंबंधी परखड विधान उद्योगपती राजीव बजाज यांनी केले आहे. सध्या कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी विविध क्षेत्रातील नामवंताची वेबिनारवर चर्चा सुरु केली आहे. त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून लोकशाही बळकट होण्यासाटी अशा प्रकारे चर्चा होणे गरजेचच असते. सरकारचा एखादा निर्णय चांगला असेल तर त्याची मुक्तकंठाने स्तुती करीत असताना एखादा निर्णय चुकीचा असेल तर त्यावर टीका करण्याचा अधिकार असला पाहिजे. एका जबाबदार विरोधी पक्षाने यापेक्षा ते वेगळे काय करायचे असते ? राहूल गांधींनी या मालिकेतील पहिली मुलाखत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची घेतली होती. त्यातही राजन यांनी आपली परखड मते मांडली होती. आता उद्योगपती राजीव बजाज यांची घेतलेली मुलाखत सध्या बरीच गाजत आहे. राजीव बजाज हे राहूल गांधींशी चर्चा करणार हे समजल्यावर त्यांनी अशा चर्चेत सहभागी होऊ नये यासाठी त्यांच्यावर दडपण आले होते. ते दडपण झुगारुन त्यांनी ही मुलाखत दिली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. पुणेस्थित बजाज या औद्योगिक घराण्याला स्वातंत्र्य चळवळीचा वारसा लाभला आहे. राजीव यांचे वडील राहूल बजाज हे देखील परखड व स्पष्टपणे बोलण्यास कधी मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या टिकेचे धनी आजवरचे अनेक सत्ताधारी झाले आहेत. आता आपल्या वडिलांचाच वारसा राजीव बजाज चालवित आहेत. कदाचित त्यांना पुढे ट्रोलही केले जाईल. अगदी टोकाला जाऊन त्यांना देशद्रोही देखील संबोधिले जाईल. परंतु याची तमा त्यांनी न बाळगता आपली परखडे मते मांडली आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. आज जी परखडपणे मते त्यांनी मांडली आहेत, त्याच्याशी अनेक उद्योगपती सहमतही असतील परंतु त्यांना अशा प्रकारे बोलण्याची हिंमत होत नसावी. आता मात्र काही उद्योगपती पुढे येऊन आपली मते मांडतील असे समजावयास हरकत नाही. सत्ताधाऱ्यांपुढे माना डोलावणे सोपे असते, मात्र त्यांच्या चुकलेल्या गोष्टी परखडपणे मांडणेही तेवढेच आवश्यक ठरते. त्याचबरोबर राहूल गांधी हे चांगल्या मुलाखती घेत आहेत, त्याच्यातून लोकांना चांगले विचार एकावयास मिळत आहेत. त्याबद्दल त्यांना कशासाठी ट्रोल केले जाते हे काही समजत नाही, असे मत अभिनेत्री स्वरा भास्कर हिने व्यक्त केले आहे. तिच्या या वक्तव्याबद्दल कदाचित तिलाही ट्रोल केले जाईल. परंतु तीने आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले हे उत्तमच झाले. अशा प्रकारे विविध क्षेत्रातील नामवंत आपली मते खुलेपणाने मांडू लागले आहेत याचे स्वागत झाले पाहिजे. आपल्या लोकशाहीत विरोधी मत मांडण्याचा अधिकार आहे, हे उद्योग, चित्रपट या क्षेत्रातील लोकांनी दाखवून दिले आहे. असो. राजीव बजाज यांनी फार चांगले मुद्दे मांडले आहेत व त्यावर सरकारकडून खुलासे होतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, लॉकडाऊन हे आवश्यकच होते, मात्र त्याचे संपूर्ण नियोजन चुकीचे होते. तसेच जगात लॉकडाऊन नंतर रुग्ण कमी होत गेल्याचा अनुभव आहे. मात्र आपल्याकडे लॉकडाऊन संपत आले असताना रुग्ण वाढत चालले आहेत. जगातील अगदी विकसीत देशातही जे गरजू आहेत त्यांना थेट मदत सरकारने दिली आहे. यासाठी त्यांनी इटली, जपान, जर्मनी या देशांची उदाहरणे दिली. आपल्याकडे अशी मदत सरकारने का केली नाही ? जे सधन वर्गातील आहेत त्यांना सरकारी मदतीची आवश्यकता नव्हती. परंतु जे गरजू होते त्यांना आर्थिक मदत देणे आवश्यकच होते. आपल्याकडे गरजुंना अन्न व गरजेच्या वस्तू न पुरविल्यामुळे लॉकडाऊन फसले आहे. जे गरजवंत आहेत त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली असती तर ते घरी बसले असते. त्यामुळे लॉकडाऊन यशस्वी होण्यास मोठा हातभार लागला असता. लॉकडाऊन सुरु करण्यापूर्वी सरकारने विविवध पातळीवरील लोकांशी, पक्षांशी चर्चा करावयास पाहिजे होती. त्याविषयातील तज्ज्ञांशी चर्चा करुन मग त्याची अंमलबजावणी करणे गरजेच होते. तसे सरकारने केले नाही, हे दुर्दैवी आहे. जागतिक महायुध्दातही अशी परिस्थिती लोकांवर ओढावली नव्हती. सरकारच्या या नियोजनशून्यतेमुळे जनतेच्या हालाखीत बरच पडली व लोकांच्या मनात कोरोनाविषयी भीती निर्माण झाली. आता देखील लोकांच्या मनातील भय काढण्याचे काम पंतप्रधानच करु शकतात व त्यासाठी त्यांनी पुढे यावे, असा विश्वास राजीव बजाज यांना वाटतो. सरकारचे लॉकडाऊन संबंधीचे सर्व नियोजन फसले हे मान्य करणे गरजेचे आहे. परंतु मोदी सरकार आपली चूक मान्य करणार नाही. उलट बजाज यांच्यावरच आगपाखड केली जाईल. लॉकडाऊन सुरु करण्यापूर्वी रोजंदारीवरील जे स्थलांतरीत मजूर आहेत त्यांना त्यांच्या घरी पोहोचण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात न आल्याने त्या मजुरांची कशी फरफट झाली हे आपण पाहिले आहे. शेवटी या प्रकरणी न्यायालयालाही हस्तक्षेप करावा लागला. आता लॉकडाऊन संपले आले असताना या मजुरांची गावाला पाठवणी केली जात आहे, हे हास्यास्पद आहे. राजीव बजाज यांनी जी परखड मते मांडली आहेत ती स्वागतार्ह आहेतच. शिवाय सरकारला त्यांच्या झालेल्या चुका दाखविण्याचा एक सुज्ञ नागरिक म्हणून अधिकारही आहे, हे देखील त्यांनी दाखवून दिले.
0 Response to "परखड राजीव बजाज"
टिप्पणी पोस्ट करा