
अनलॉक करताना...
09 June 2020 अग्रलेख
अनलॉक करताना...
देशात आता लोक घरी बसून कंटाळले आहेत. ज्यांच्याकडे दोन वेळ जेवणाची व्यवस्था आहे त्यांना काही अडचण नाही. मात्र ज्यांचे पोट रोजंदारीवर आहे किंवा ज्यांचे बँक खाते रिकामे झाले आहे त्यांना आता 70 दिवसांनंतर जगण्यांची भ्रांत सुरु झाली आहे. सध्या पाचवा लॉकडाऊन सुरु झाला आहे. जून अखेरपर्यंत तो संपेल. परंतु लॉकडाऊन सुरु असताना सरकारने आता काही बाबी अनलॉक करुन हळूहळू अर्थकारणाला गती देण्यासाठी एकएक बाबीत ढिल देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार शाळा, कॉलेज, मॉल, सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे वगळता बहुतांशी बाबी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे सुरु करण्यासंबंधी मतभेद आहेत, त्यामुळे त्या सेवा काही सुरु झालेल्या नाहीत. परंतु त्या देखील टप्प्याटप्प्याने सुरु कराव्या लागणार आहेत. थोडक्यात सरकारने आता लॉकडाऊन कायम ठेवत असताना काही बाबतीत ढिलाई देण्यास सुरुवात केली आहे. आता त्याचे परिणाम काय होतील हे आत्ताच सांगता येत नाही. सरकारलाही लोकांच्या अडचणी समजू शकत आहेत, मात्र पूर्णपणे लॉकडाऊन उठवले तर कोरोना वाढण्याचा धोका जास्त आहे. याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा प्रामुख्याने भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांना यापूर्वीच दिला आहे. यात सरकारची मोठी अडचण झाली आहे. एकीकडे लोकांमधील अस्वस्थता तर दुसरीकडे लॉकडाऊन उठविल्यास साथ वाढण्याचा धोका. अशा स्थितीत यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांकडे सुपूर्द करुन केंद्राने आपले हात वर केले आहेत. परंतु अशा प्रकारे राज्यांना अधिकार दिले असले तरी केंद्र आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. त्यांनाही जनतेला उत्तर द्यावेच लागणार आहे, कारण धरणात्मक निर्णय त्यांचे आहेत. देशातील कोरोनाची साथ नियंत्रणात येण्याची काडीमात्र चिन्हे दिसत नाहीत, उलट कोरोनाग्रसस्तांचे आकडे वाढतच चालले आहेत. शनिवारी तर एकाच दिवशी देशात दहा हजारांनी रुग्ण वाढले आहेत. तर सुमारे 300 लोक एकाच दिवशी मरण पावले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण मरण पावण्याची ही संख्या सर्वाधिक आहे. आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या अडीज लाखांवर गेली आहे. तर सुमारे सव्वा लाख रुग्ण यातील बरे झाले आहेत. आजपर्यंत या साथीत बळी गेलेल्यांची संख्या सहा हजारांवर गेली आहे. कोरोनाची साथ येत्या जुलै महिन्यांपर्यंत कळस गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या जी साथ वाढलेली दिसते आहे ती कळस गाठण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल दिसते आहे. एका अभ्यासानुसार, कोरोना रुग्णांची संख्या ही कोरोनाने मरण पावलेल्या लोकांच्या संख्येच्या पातळीवर येईल, त्यानंतर या रोगाचा प्रभाव कमी होत जातो. त्यादृष्टीने विचार करता आपल्याकडे अजून तो टप्पा यायला वेळ आहे. महाराष्ट्रात 80 हजारांपेक्षा जास्त रुग्ण असून देशातील सर्वाधिक रुग्ण असलेले ते राज्य ठरले आहे. त्यानंतर तामीळनाडू, दिल्ली व गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. जगभराचा विचार करता आपला क्रमांक सतत वाढतच चालला आहे. आता आपण इटलीच्याही पुढे म्हणजे सहाव्या स्थानी आलो आहोत. महाराष्ट्राचा विचार करता आता आपली रुग्णसंख्या चीनच्या बरोबरीने झाली आहे. परंतु त्या तुलनेत मृत्यूदर मात्र निम्म्यावर ठेवण्यात यश आले आहे. राज्यात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दोन टक्क्यांनी वाढले आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. राज्याचा मृत्यूदर हा 3.57 टक्के एवढा आहे. तर देशात मृत्यूदर हा 2.7 टक्के आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. शहरातील दाटीवाटीची वस्ती पाहता, ही संख्या वाढत चालली आहे. देशात रुग्णांची संख्या 16 दिवसात दुप्पट होत असताना मुंबईत मात्र हे प्रमाण 20 दिवसांवर आले आहे. मुंबईतील हॉटस्पॉटच्या यादीत अग्रभागी असलेल्या भायखाळा, नागपाडा व वडाळा, सायन या विभागातील रुग्णसंख्या घटू लागली आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईतील झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोना झपाट्याने फैलावताना दिसत आहे. तसे होणे स्वाभाविकच आहे, कारण दाट लोकवस्ती येथे आहे व सामायिक शौचालये असल्यामुळे येथे साथ फैलावण्यास मदत होते. अशा स्थितीत मुंबईतील जनजीवन बहुतांशी सुरु होत असल्यामुळे साथ फैलावण्याचा धोका सर्वाधिक आहे. सध्या सरकारकडे रुग्णांना ठेवण्यासाठी बेड नाहीत. त्यामुळे सरकारने ज्यांना शक्य आहे त्यांना होम क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळ सरकारने हा निर्णय सुरुवातीपासूनच घेतला होता. अनेकदा रुग्ण घरी राहूनही चांगला होऊ शकतो, मात्र त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. जून व जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढण्याचा धोका असल्यामुळे हा घेतलेला निर्णय योग्यच आहे. आता लॉकडाऊनच्या अटी शिथील केल्यावर सरकारची खरी कसोटी सुरु झाली आहे. सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनचे नियम शिथील करणे हा मोठा धोकाच आहे. परंतु लोकांची वाढती अस्वस्थता व थांबलेले अर्थकारण यासाठी हे सुरु करावे लागत आहे. धोका पत्करुनही अनलॉक करणे सरकारला भाग पडत आहे. यात सरकारपेक्षा जनतेवर जबाबदारी मोठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
0 Response to "अनलॉक करताना..."
टिप्पणी पोस्ट करा