-->
पावसाचे स्वागत करताना

पावसाचे स्वागत करताना

13 June 2020 अग्रलेख पावसाचे स्वागत करताना यंदा अगदी वेळेत म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच वरुणराजाचे आगमन होत आहे. केरळात 1 जून रोजी आगमन झाल्यावर आता तळकोकणात पावसाचे आगमन कालपासून झाले आहे. येत्या दोन दिवसात संपूर्ण कोकण पावसाने व्यापला जाईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याला गेल्या आठवड्यात चक्रीवादळाने जबरदस्त तडाखा दिल्याने त्याचबरोबर पहिला बिगर मोसमी पाऊस अनुभवला आहे. कोकणातील शेतकरी यंदा वेळेत येणाऱ्या पावसाचे उत्सुकतेने स्वागत करावयास सज्ज असला तरी चक्रीवादळामुळे त्याच्या मनात काहीशी भीती दडली आहे. परंतु रायगड जसा सावरत जाईल तसा या चक्रीवादळाने निर्माण झालेली भीती कमी होत जाईल. मात्र चक्रीवादळाचा हा दिवस सर्वांनाच आयुष्यभर लक्षात राहाणारा आहे. त्यानंतर झालेले नुकसान तर कधीच विसरता येणार नाही. चक्रीवादळाने झालेले नुकसान सहन करीत त्याने आता पावसाळा तोंडावर आला असल्याने शेतीची कामे सुरु केली आहेत. भाताचा राब पेरण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्हा झपाट्याने झालेल्या औद्योगिकीकरणानंतर आता भाताचे कोठार राहिले नसले तरी सर्वाधिक भात येथे अजूनही पिकवला जातो. त्यामुळे भाताच्या लागवडीची सर्व पूर्वतयारी आता सुरु झाली आहे. येत्या दोन दिवसात पहिल्या मोसमी पावसाचा शिडकावा झाल्यावर शेतकरी खऱ्या अर्थाने सुखावेल. यंदा एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे चक्रीवादळाने झालेले नुकसान त्यामुळे संकटात असला तरीही शेतकरी पावसाचे मोठ्या उत्साहात सागत करीत आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर आलेली ही सर्व संकटे कमी होतील असा त्याला विश्वास वाटतो. हवामान खात्याचा जर यंदाचा चांगला पाऊस होण्याचा अंदाज खरा ठरावा, असे त्याचे मागणे आहे. कोरोनाच्या साथीमुळे अनेक गावात शहरातून चाकरमऩी आले आहेत. त्यामुळे सध्या गावागावात गर्दी दिसते. एककीडे कोरोनाची पथ्य़े पाळत असताना मुंबईकराचे त्याने चांगले स्वागत केले आहे. मुलांच्या शाळेला सुट्या, कॉलेजही बंद, त्यातच लॉकडाऊन 30 जूनपर्यंत असल्याने चाकरमनी गावात चांगलाच विसावला आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात येणारे हे दरवर्षीचे गावचे शहरी पाहुणे यंदा आले उशीरा व जातीलही उशीरा अशी परिस्थिती आहे. लॉकडाऊन उठल्याशिवाय हे मुंबईकर गाव सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे यंदाच्या शेतीची कष्टाची कामे कशी असतात त्याचा या शहरी लोकांना अनुभव घेता येईल. कोरोनासोबत आपल्याला आता अजून बराच काळ जगायचे आहे, हे वास्तव अनेकांनी स्विकारले आहे. मुंबई, पुण्यातील कोरोनाची साथ अजून तरी तातडीने आटोक्यात येईल असे दिसत नाही. त्यामुळे कदाचित सध्याचे लॉकडाऊन आणखी कडक करुन व कदाचित गरज भासल्यास 30 जून नंतर लॉकडाऊनची मुदत आणखीनही वाढवावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. एकीकडे पावसाळा आल्यावर कोरोनाचा प्रसार वाढण्याबाबतचा धोका आहे. कडक उन्हाळ्यात याच्या फैलावावर नियंत्रण राहते मात्र कोरड्या हवेत कोरोनाचे विषाणू अधिक वेगाने पसरतात असा अनुभव असल्याने पुढील दोन ते तीन पावसाचे महिने त्यादृष्टीने धोकदायक आहेत. दरवर्षी पावसाळा आल्यावर साथीच्या रोगांचा फैलाव सर्वत्र सुरु होते. मलेरिया, डेंग्यू, ताप, सर्दी, खोकला या रोगांचे प्रमाण वाढते. सध्या कोरोनावरील रोग्यांच्या उपचारांमुळे नियमित अन्य रोग्यांसाठी कमी बेड उपलब्ध होत आहेत. आता पावसाळ्यात अशा बेडची संख्या वाढवावी लागणार आहे. त्यामुळे कोरोनासोबत आपण अन्य रोगांचाही मुकाबला करु शकतो. सध्या आपल्या आरोग्य यंत्रणेचे सर्व लक्ष कोरोना झालेल्या रोग्यांवर केंद्रीत झाले आहे. मात्र कोरोना संपविण्येच उदिष्ट्य साध्य करताना अन्य रोग्यांनाही तेवढीच रुग्ण सेवा उपलब्ध झाली पाहिजे. सध्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारे अन्य रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी स्थीती आहे. पावसाळा सुरु झाल्यावर आपल्याला कोरोनाच्या सोबतीने अन्य रोगांचाही तेवढ्याच ताकदीने मुकाबला करावा लागणार आहे. तसे न केल्यास अन्य रोगी अडचणीत येतील. कोरोनाची लस एवढ्या लवकर काही बाजारात येत नाही. अगदी नजीकच्या काळात जरी ही लस उपलब्ध झाली तरी त्याला किमान तीन-चार महिने लागतील. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या लसीच्या क्लिनिकल ट्रायल्स पुरेशा घेतल्या गेल्या आहेत किंवा नाहीत ते स्पष्ट झाले पाहिजे. जागतिक पातळीवर जरी लस आली तरी ती आपल्यासारख्या विकसनशील किंवा अविकसीत देशांसाठी प्रथम वापरली जाईल. आपल्या लोकसंख्येचा पुळका आहे म्हणून नव्हे, तर तो एकप्रकारे आपल्यावर प्रयोगच होणार आहे. त्यामुळे लशींच्या बाबतीत विकसीत देश सावध आहेत. त्यांना लशीची घाई करावयाची नाही. ब्रिटनमध्ये एका केलेल्या पाहणीत बहुतांशी नागरिकांनी आम्हाला लगेचच लस नको असे ठणकावून सांगितले आहे. अशा स्थीतीत आपल्यावर प्रयोग म्हणून ही लस सर्वात प्रथम वापरली जाण्याच धोका आहे. हा धोका आपण पत्करावयाचा का ते आपल्या सरकारने अगोदर ठरवावे. आपला देश ही लसीची प्रयोगशाळा ठरु नये, एवढे मात्र नक्की. पावसाळ्यात नेहमीच रोगराई वाढते. त्यातच यावेळी कोरोना असल्यामुळे आपल्याला दुहेरी लक्ष आरोग्याकडे पुरवावे लागणार आहे. वरुणराजाचे स्वागत करताना हे जे धोके आहेत त्याची जाणीव ठेऊन आपल्याला त्यावर मात करावयाची आहे.

Related Posts

0 Response to "पावसाचे स्वागत करताना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel