
अस्वस्थ नेपाळ
15 June 20202 अग्रलेख
अस्वस्थ नेपाळ
आपला शेजारी व जगातील एकमेव हिंदूराष्ट्र असलेला देश नेपाळने भारताच्या सीमेवर गोळीबार केल्याची बातमी आली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. सध्या देशात हिंदुत्ववाद्यांचे सरकार सत्तेत असताना अशा प्रकारे एका हिंदूराष्ट्राने आपल्या सीमेवर गोळीबार करावा व आपल्या सुधारित नकाशात भारतातील गावे दाखवावीत एवढे धैर्य नेपाळने कसे केले? असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. सध्या नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आहे, अर्थात यापूर्वीही तसे अनेकदा तेथे डाव्या पक्षांचे सरकार होते. मात्र त्याचा भारताशी संबंध बिघडायला तिळमात्र संबंध नाही. चीनने गेल्या दोन-चार वर्षात नेपाळशी आपले संबंध सुधारुन चांगली मैत्री केली आहे. अर्थात अशी मैत्री करावयाला नेपाळला भारताचे असलेले धोरणच कारणीभूत ठरले आहे. नेपाळच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणासंबंधी सल्लागार दिनेश भट्टाराय यांनी अलिकडेच इंडियन एक्स्प्रेसमध्ये लेख लिहून भारत व नेपाळ यांच्या संबधावर चांगलाच प्रकाश टाकला आहे. खरे तर हा लेख म्हणजे मोदींच्या परराष्ट्र नितीच्या पराभवाचा पाढाच आहे. त्यात त्यांनी अनेक चांगले मुद्दे मांडले आहेत. नेपाळने लिंपियाधुरा, कालापानी, लिपुलेख हे भारताच्या ताब्यात असलेले भाग नेपाळच्या नवीन नकाशात नेपाळचा भाग असलेले दाखविले आहेत. मोदींनी नेपाळला भेट दिली त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान सुशील कोईराला यांनी या भागासंबंधी वाद उपस्थित केला होता. त्यावेळी लिपुपास मधून व्यापार करण्यावर सहमती झली असली तरी या यासंदर्भात नेपाळने आक्षेप नोंदविला होता. सप्टेंबर 15 मध्ये नेपाळने नवीन राज्यघटना केल्यावर भारताने सीमेवर ब्लॉकेड केला होता. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू नेपाळमध्ये पोहचू शकल्या नाहीत. परिणामी नेपाळमधील 2017 ची निवडणूक ही भारतविरोधी मुद्दावर लढविली गेली. हीच संधी साधत चीनने नेपाळशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वी होत गेले. म्हणजे नेपाळशी भारताने चांगले संबंध ठेवायला पाहिजे होते पंरतु तसे न झाल्याने चीनला यात घुसण्याची एक संधी चालून आली. एकदा तर भारतीय लष्कर प्रमुखांनी नेपाळची भूमिका चीनच्या आदेशावर नाचत असल्याचा आरोप केला. त्यातून नेपाळी जनतेला अपमान झाल्याची भावना बळावली, परिणामी संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. सीमा प्रश्नासारख्या संवेदनाक्षम प्रश्नावर भारताने तत्परता दाखवून मोठ्या भावाच्या भूमिकेत हा प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलायला पाहिजे होती, परंतु भारताकडून तसे काही घडले नाही. शेवटी या वादाचे आता मोठे पडसाद उमटू लागले आहेत. नेपाळचा या गावांवरील दावा काही नवीन नाही. मात्र यापूर्वीच्या कॉँग्रेस सरकारने नेपाळला सवलती देत, कधी गोंजारत हा प्रश्न मागे कसा पडेल व संबंध चांगले ठेवण्यावर भर दिला होता. परंतु मोदी सरकारने मी मोठा भाऊ आहे, माझी दादागिरीच चालेल, तुला माझेच एकावेच लागेल, अशी भूमिका घेतल्याने हा वाद चिघळला. मोदी सत्तेत असलेल्या गेल्या सहा वर्षाच्या काळात नेपाळमध्ये दोन सरकारे आली परंतु त्या दोन्ही सरकारशी मोदींनी फारसे काही जुळवून घेतले नाही. त्या सर्वाचा हा परिपाक सध्याचे संबंध बिघडण्यात झाले आहेत. मोदी सरकारने नेपाळशी चर्चेची दारे खुली न ठेवता त्यांच्याशी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणून आपला एवढ्या वर्षाचा सख्खा शेजारी देश आता शत्रुपक्षाच्या बाजूने ढकलला गेला. आन्तरराष्ट्रीय राजकारण हे पूर्णता दादागिरी करुन चालत नाही. अमेरिकेला देखील दादागिरी करुन आपले जागतिक पातळीवरील राजकारण पुढे रेटता येत नाही अशी स्थीती आहे. आन्तरराष्ट्रीय संबंध हे मोठ्या मुसद्देगिरीने हाताळले गेले पाहिजेत. त्यासाठी कधी आपण दोन पावले मागे जात गोडीगुलाबीने दुसऱ्या देशाला चार पावले मागे घेतले पाहिजे. त्यासाठी चर्चेची दारे नेहमीच खुली ठेवली पाहिजेत. भारत-पाकिस्तान एवढा तणाव असला तरी उभय देशात पूर्वीपासून चर्चेच्या फेऱ्या चालत. मोदी विरोधात असताना त्याची टिंगल टवाळी करीत, परंतु तो आन्तरराष्ट्रीय राजकारणाचा व मुसद्देगिरीचा भाग आहे, हे विसरुन चालणार नाही. भारताला आपल्या सीमा शाबूत ठेवण्यासाठी नेहमीच शेजाऱ्यांशी सौदार्हाचे वातावरण ठेवले पाहिजे. पाकिस्तानशी वैर असल्याने आपली एक सीमा नेहमी असुरक्षीत असते अशा वेळी अन्य देशांना लागून असलेल्या सीमा आपण सुरक्षीत ठेवल्या पाहिजेत. त्यासाठी एक हाथ से दे, एक हाथ से ले अशी भूमिका ठेवावी लागते. चीन ही एक महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेला देश आहे. आशिया खंडातील त्यांचे वर्चस्व निर्विवाद आहे. अशा स्थितीत आपण चीनला मोठ्या भावाचा दर्जा दिला तर आपण बरेच काही साध्य करु शकतो. त्यासाठी भारताने चीनचे आजचे आशिया खंडातील स्थान अगोदर मान्य करायला पाहिजे. उगाचच सर्व शेजाऱ्यांशी भांडणे करुन शेजारी अस्वस्थ ठेऊन आपण सुखी राहू शकत नाही. युरोपातील देशांची तर परस्परांशी युद्दे झाली आहेत. असे असले तरीही ते व्यापार व शेजारधर्म म्हणून समान चलन करुन व्यापार वाढवू शकतात. आपण मात्र आशिया खंडातील समान चलन लांबच राहो, शेजाऱ्याशी भांडणे करुन आपला देश असुरक्षीत करीत आहोत. चीन आपल्यापेक्षा किती तरी पटीने पुढे गेला आहे, त्याचे हे अस्तित्व मान्य केल्यास आपण त्यांच्यांशी व्यापार, गुंतवणूक वाढवून प्रगती साधू शकतो. संघर्ष करुन हे साध्य होणार नाही. सतत शेजाऱ्याशी कुरापती काढणे ही परराष्ट्रनिती चुकीची आहे.
0 Response to "अस्वस्थ नेपाळ"
टिप्पणी पोस्ट करा