-->
बौध्दीक संपत्तीत आपण मागे का?

बौध्दीक संपत्तीत आपण मागे का?

दि. 5 मार्चच्या मोहोरसाठी चिंतन
जागतिक पातळीवर आपण अजूनही बौध्दीक संपत्तीच्या क्रमवारीत ४२ व्या क्रमांकावर आहोत ही बाब आपल्यासाठी काही भूषणावह अजिबात नाही. बौध्दीक संपत्तीमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. त्याखालोखाल ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व स्वीडन असे आघाडीचे पाच देश या क्रमवारीत आहेत. आपल्याकडे बौध्दीक संपत्तीच्या जीवावर अनेक कंपन्या गेल्या तीन दशकात उभ्या राहिल्या असल्या तरी जागतिक पातळीवरील या क्षेत्रातील यश पाहता आपण अतिशय नगण्यच आहोत. सर्वात महत्वाचे म्हणजे आफ्रिकी व दक्षिण अमेरिकेतील देशांपेक्षा आपण पिछाडीवर आहोत ही सर्वात दुर्दैवी बाब आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी आपल्याकडे आय.टी. उद्योगाचा पाया रचला गेला व आपल्याला बौध्दीक संपत्तीच्या जोरावर उद्योग उभारता येतो याची सर्वात प्रथम कल्पना समजली. अन्यथा तोपर्यंत आपल्याला उद्योग करावयाचा म्हणजे भांडवल हवे. म्हणजे केवळ भांडवलदारच उद्योग स्थापन करु शकतो असे गणित होते. केवळ तटपुंज्या भांडवलावर उद्योग करता येतो हे कुणाच्या स्वप्नातही नव्हते. परंतु आपल्याकडे पहिल्या पिढीतले उद्योजक नारायममूर्ती, शिवनाडर यांच्यासरख्यांनी आपले शिक्षण पूर्ण करताच थोडा काळ अनुभव घेऊन उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आणि किरकोळ भांडवलाच्या सहाय्याने आपला उद्योग सुरु केला आणि आज त्यांनी आय.टी. उद्योगात साम्राज्य उभे केले आहे. अर्थात अशा प्रकारे बौध्दीक क्षमतेच्या जोरावर आपण उद्योग उभारु शकतो असे त्यांनी देशवासियांना दाखवून दिले. यातील नारायणमूर्तींनी तर आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेऊन वीस हजार रुपयात उद्योग सुरु केला होता. आज ही कंपनी अब्जावधीं रुपयांची उलाढाल करणारी झाली आहे. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे देता येतील. अर्थात ही उदाहरणे प्रामुख्याने आय.टी. उद्योगातील आहेत. जगातील यासंबंधीचे सर्वात मोठे उदाहरण द्यायचे झाल्यास फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांचे देता येईल. यांनी आपल्या घरच्या बाहेरील गॅरेजमध्ये फेसबुक जन्माला घातले आणि आज जगात आपली सोशल मिडियाची महासत्ता स्थापन केली आहे. या माध्यमातून एखाद्या देशाचे सरकार पाडले जाऊ शकते किंवा एखाद्या लोकशाही प्रधान देशात लोकांचे मतपरिवर्तन करुन सरकार पुन्हा निवडून आणले जाऊ शकते, हे सर्व जगाने अनुभवले आहे. सोशल मिडियाची सध्याची ताकद ही यातूनच निर्माण झाली आहे. त्या जोरावर मार्क झुकेरबर्ग यांनी अब्जावधीची संपत्ती जमविली. त्यांच्याकडे भांडवल शून्यच होते. केवळ बौध्दीक संपत्तीच्या जोरावर त्यांनी ही किमया करुन दाखविली आहे. २१ शतक हे सोशल मिडियाचे व पर्यायाने बौध्दीक संपत्तीचे युग आहे असे म्हटले जाते ते खरेच आहे. अर्थात यातून मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका असतोच. वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक संपदा हक्क त्यांच्या निर्मात्याला या निर्मितीवर ठराविक काळापुरते स्वामित्व हक्क बहाल करतात. या काळात निर्मात्याच्या परवानगीशिवाय ही निर्मिती मग कुणीही वापरू शकत नाही; तिच्यावर तिच्या मालकाची या काळात मक्तेदारी असते. निर्मात्याने ही निर्मिती करण्यासाठी जे कष्ट, पैसा, वेळ घालवला त्याचा मोबदला म्हणून देशाचे सरकार त्याला ही मक्तेदारी बहाल करते. या कालावधीत तिच्या मालकाशिवाय दुसरे कुणीही ती गोष्ट बनवू शकत नाही. त्यामुळे त्या निर्मितीला बाजारात कुठलीही स्पर्धा नसते. स्पर्धा नसल्यामुळे मग तिचे भाव प्रचंड असतात. या वाढीव भावांमुळे मग बौद्धिक संपदा हक्क आणि इतर दुस-या कुठल्यातरी हक्कांमधे संघर्ष होणे अटळ होऊन बसते. अनेकदा औषधांच्या बाबतीत असे घडते. त्यामुळे अनेक नवीन संशोधीत औषधे ही सर्वसामान्यांना परवडणारी नसतात. त्यासाठी जगाने एकत्र येऊन काही नियमावली करण्याची गरज आहे. एखाद्याने लावलेल्या संशोधनाचा त्याला निश्चित आर्थिक फायदा झाला पाहिजे हे जेवढे खरे आहे तसेच त्याचा उपयोग जनतेला होण्यासाठीही विचार झाला पाहिजे. कोरोनावरील लसीच्या संदर्भात असा विचार झाला होता. बौध्दीक संपत्तीचा आता आणखी एक नवा अवतार स्टार्टअपच्या रुपाने आता अवतरला आहे. स्टार्टटप ही संकल्पना चांगली आहे, त्यातून अनेक नवनवीन उद्योग फुलण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु गेल्या काही वर्षांच्या अनुभवानंतर स्टार्टअपमधील उद्योग यशस्वी होण्याचे प्रमाण हे जेमतेम दोन ते तीन टक्के आहे. उद्योग सुरु करणे आणि त्यात यशस्वी होणे ही काही सोपी बाब निश्चतच नसते. ज्यांनी बौध्दीक संपतीच्या जोरावर उद्योग सुरु केले त्या सर्वांनाच नारायणमूर्तींसारखेच भरभरुन यश मिळाले असे नव्हे. त्याचप्रमाणे स्टार्टटपचे आहे, परंतु यातील अनेक नवउद्योजकांच्या कल्पना खरोखरीच भन्नाट आहेत. त्यातून त्यांचे उद्योजकिय कौशल्य पणाला लागले आहे. त्यात यशाचे प्रमाण कमी असले तरीही तरुणांचे प्रयत्न व धडपड खूपच चांगली व स्वागतार्ह आहे. आपल्याकडे बौध्दिक संपत्ती वाढली पाहिजे, खरे तर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीस याचाच मोठा हातभार लागणार आहे. फेसबुक, इन्ट्रग्राम, व्टिटरसारख्या एका संशोधनाने अमेरिकेला जगात मक्तेदारी करण्याची संधी उपलब्ध तर झालीच शिवाय अमाप संपत्ती या मार्गातून मिळविता आली. यात जसा झुकेरबरेग यांचा लाभ आहे तसाच अमेरिकेचाही मोठा फायदा झाला. त्यामुळे आपल्याकडे बौध्दीक संपत्ती भविष्यात वाढली पाहिजे. नवनवीन संशोधन होऊन त्यातून जगाला जसा फायदा होऊ शकतो तसा त्या देशाचाही विकास होतो. भारतात आय.टी. उद्योग जोरात आहे, त्यासाठी आवश्यक बौध्दीक संपत्ती आपल्याकडे पुरेपूर आहे. परंतु ही संपत्ती केवळ अनुत्पादक कामांसाठी खर्च होते. ती जर संशोधनाकडे वळली तर त्याचा देशाला अधिक उपयोग होऊ शकतो. आज आपला देश ४२ व्या क्रमांकावर आहे तो पहिल्या पाच क्रमांकात येणे सहज शक्य आहे. परंतु त्यादृष्टीने सरकारचे व उद्योगातील लोकांचेही प्रयत्न होण्याची गरज आहे.

0 Response to "बौध्दीक संपत्तीत आपण मागे का?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel