-->
शिवसेना व उध्दव यांचे काय होणार?

शिवसेना व उध्दव यांचे काय होणार?

दि. 26 फेब्रुवारीच्या मोहोरसाठी चिंतन
शिवसेना व उध्दव यांचे काय होणार? भाजपाने उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कशी संपेल यासाठी जंगजंग पछाडले आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली प्रथम बंडखोरीच्या घडवून आणून शिवसेना पूर्णपणे पोखरुन काढण्यात आली. त्यानंतर न्यायालयीन लढाई असो किंवा निवडणुक आयोग असो दोन्ही पातळ्यांवर शिवसेनेच्या विरोधात निकाल कसे जातील हे पाहून शिवसेनेचे अस्तित्वच कसे संपेल असे पाहाण्यात आले. सुमारे तीन दशकांपूर्वी याच शिवसेनेची साथ घेत भाजपाने आपला राजकीय विस्तार सुरु केला आणि आता त्यांना हीच शिवसेना नकोशी झाली आहे व स्वबळावर सत्तेत येण्याचे वेध लागले आहेत. सध्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ केले आहे परंतु त्यांची गरज संपल्यावर त्यांना दूर फेकले जाईल यात काहीच शंका नाही. उत्तरप्रदेशात अशाच प्रकार भाजपाने मायावतीला संपविले, बिहारमध्ये जदयुला संपविण्याची खेळी आखली जात होती मात्र ही खेळी यशस्वी करु न देण्याचा संकल्प बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केला आणि वेळीच भाजपाशी फारकत घेतली. शिवसेने आपल्याशी गद्दारी केली व कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत सत्तेचा संसार थाटला त्यामुळे उद्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास सोडली, असे भाजपा ठणकावून सांगत आहे. शिवसेना व उध्दव ठाकरे यांनी कशी वैचारिक गद्दारी केली असे जनतेत दाखवित आहे. इतिहासात डोकावल्यास शिवसेना व कॉँग्रेसची दोस्ती ही काही नवीन नाही असेच दिसते. शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा काँग्रेसचे पुढे उपमुख्यमंत्री राहिलेले रामराव आदिक उपस्थित होते. 1960 साली दादरच्या बालमोहन हायस्कूलमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्तेच 'मार्मिक'चे प्रकाशन झाले होते. शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी झाली होती. 1967 मध्ये शिवसेनेने ठाणे महानगरपालिकेत 40 पैकी 17 जागा मिळवल्या, त्या मराठी माणसाचा अजेंडा मतदारांपुढे ठेवूनच. 1968 साली शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यावेळी 121 पैकी 42 जागा मिळवल्या. मात्र तेव्हाच शिवसेनेने प्रजासमाजवादी पक्षाशी युती केली होती. प्रजासमाजवादी हा पक्ष 1952 मध्ये स्थापन झाला होता. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष आणि जे बी कृपलानी यांचा किसान मजदूर प्रजा पक्ष यांचे विलीनीकरण होऊन प्रजासमाजवादीची स्थापना झाली होती. 1973 मध्ये शिवसेनेने भारतीय रिपब्लिकन पक्षाशी (रा सू गवई गट) युती करून मुंबई पालिकेच्या 39 जागा मिळवल्या होत्या. रिपब्लिकन पक्षाचा व शिवसेनेचाही त्यावेळी हिंदुत्वाशी काहीच संबंध नव्हता. 1974 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत मध्य मुंबईतून रामराव आदिक काँग्रेस उमेदवार म्हणून उभे होते त्यावेळी त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. 1977 साली बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मुरली देवरा यांनाच महापौरपदासाठी पाठिंबा दिला होता. तोपर्यंत शिवसेनेच्या जवळ हिंदुत्वाचा शब्दही नव्हता. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला. तसेच 1978 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसला समर्थन दिले. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत, म्हणजे 1977 साली, शिवसेनेने भागच घेतला नाही. तर 1978 मध्ये शिवसेनेने उमेदवार उभे केले, पण त्यापैकी कोणीही विजयी झाले नाही. काँग्रेसची शिवसेनेची तेव्हापासून दोस्ती होती. मुळातच कम्युनिस्टांना ठोकण्यासाठी किंवा संपविण्यासाठी कॉँग्रेसने मोठ्या शिताफिने शिवसेनेचा वापर करुन घेतला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात शिवसेनेला वसंतसेना म्हणत. कारण तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शिवसेनेशी चांगलेच सुत जमविले होते. 1980 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जाणीवपूर्वक आपले उमेदवार उभे केले नाहीत आणि काँग्रेसचा प्रचार केला. त्या बदल्यात शिवसेनेला महाराष्ट्र विधान परिषदेवर तीन जागा मिळाल्या. 1982 मध्ये गिरणी संप जोशात असताना कॉँग्रेस विरोधी लाट होती, अशावेळी काँग्रेसला समर्थन करणे तोट्याचे ठरेल, विशेषता गिरणगावात, हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने काँग्रेसशी संबंध तोडले. एकेकाळी शिवसेनेने मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतला होता आणि नंतर सुधीर जोशी मुंबईचे महापौर झाले होते. 1979 मध्ये शिवसेना व मुस्लिम लीगचे नेते एकाच व्यासपीठावर दिसले होते. मुस्लिम लीगला हिंदुत्वाचे काहीच देणेघेणे नव्हते. शिवसेना आणि मुस्लिम लीगची संयुक्त सभा मुंबईच्या नागपाड्यातील मस्तान तलाव पटांगणात झाली होती, तेव्हा शिवसेना जिंदाबाद, मुस्लिम लीग जिंदाबाद, बाळासाहेब जिंदाबाद अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय्य हक्कांसाठी एक साथ लढा उभारतील, आमची ही दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूने व देवाणघेवाणीतून झाली नाही, असे बाळासाहेब म्हणाले होते. त्यावेळी या मंडळींना कोणीही 'देशद्रोही' संबोधण्याची हिम्मत केली नव्हती. शिवसेनेची कॉँग्रेस दोस्ती ही फार जुनी आहे, त्यामुळे त्यांनी कॉँग्रेस व राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करणे यातही फार काही मोठे नव्हते. परंतु शिवसेनेबरोबर यापूर्वी आघाडी करताना व सरकार स्थापन करतानाही त्यांची कॉँग्रेसची पूर्वी असलेली दोस्ती माहित नव्हती का? मग असे असतानाही शिवसेनेसोबत भाजपा गेलीच होती ना? 1977 मध्ये शिवसेना व दलित पॅंथर यांची अल्पकाळ युती झाली होती. आपले हिंदुत्व शेंडी आणि जानव्याचे नाही हे शिवसेनेने केव्हाच दाखवून दिले होते. 1975 मध्ये इंदिरा गांधींच्या आणीबाणीस शिवसेनेने पाठिंबा दिला होता. 1980 मध्ये बाळासाहेबांनी आपले मित्र असलेल्या अंतुले यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. एवढेच नव्हे, तर श्रीवर्धनमध्ये त्यांचा प्रचारही केला होता. मुख्यमंत्री वसंतरावराव नाईक यांच्याशी बाळासाहेबांची दोस्ती तर सर्वांना परिचित होती. 1985 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांचे संबंध काही चांगले नव्हते. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव असल्याचा आरोप दादांनी केला आणि त्यानंतर मराठी माणसांनी शिवसेनेच्या हातात मुंबई महानगरपालिकेची सत्ता दिली! म्हणजे ही सत्ता मिळण्यास तेव्हा काँग्रेसची मदतच झाली होती. 1982 मध्ये शरद पवार व जॉर्ज फर्नांडिस हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित होते. 2007 मध्ये प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने साथ दिली होती आणि 2012 मध्ये प्रणव मुखर्जींनाही असाच पाठिंबा देण्यात आला. विशेष म्हणजे, शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने तेव्हा प्रणवबाबूंना नाही, तर पी ए संगमा यांना पाठिंबा दिला होता. 2008 मध्ये बाळासाहेब हयात असताना राष्ट्रवादी व शिवसेना यांची युती होणार, अशी चर्चा होती. म्हणूनच काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर केवळ विशिष्ट परिस्थितीमध्ये शिवसेनेने सरकार स्थापन केले, म्हणजे हिंदुत्वाशी तडजोड केली किंवा बाळासाहेबांच्या विचारापासून ती दूर गेली, असे मुळीच म्हणता येणार नाही. एकनाथ शिंदे गटाला किंवा भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवायची होती. हिंदुत्ववादाची झूल पांघरून एकनाथ शिंदे यांनी आपला डाव साधला असला, तरी सर्वसामान्य जनता आणि सामान्य शिवसैनिक त्यांचा डाव आणि लबाडी पुरती ओळखून आहेत. आता कसोटी आहे ती उध्दव ठाकरे यांची. त्यांच्याकडे आज हातात पक्षही नाही, निवडणूक चिन्हही नाही. फक्त आहे तो प्रबोधनकार व बाळासाहेब यांचा वारसा. त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांना नवीन पक्ष स्थापन केल्यासारखे म्हणजे शून्यातून काम सुरु करायचे आहे. अर्थातच त्यांनी ठरविले तर ते सध्याच्या परिस्थितीवर सहजरित्या मात करु शकतात. परंतु त्यांनी तशी जिद्द दाखविण्याची गरज आहे. त्यांची प्रकृती साथ देत नाही असे असले तरीही शक्य असेल तेव्हा मातोश्रीतून बाहेर पडून जनसंपर्क वाढविला पाहिजे. कारण आता उध्दव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. सध्या राजकारण हे पैशावर जास्त चालते हे खरे असले तरीही उध्दव ठाकरे यांनी ठरविले तर शिवसैनिकांना ते आपल्याकडे वळवू शकतात. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी जे चांगले काम केले आहे त्यामुळे अनेक शिवसैनिक नसलेले सर्वसामान्य नागरिकही त्यांना अनुकूल झाले आहेत. फक्त प्रश्न आहे उध्दव ठाकरे व त्यांचे चिरंजीव किती जिद्दीने या संघर्षात उतरतात. उध्दव यांच्यासाठी आता समुद्रात उडी मारल्यावर पोहावे लागते नाही तर बुडून मरायचे असे आव्हान आहे.

0 Response to "शिवसेना व उध्दव यांचे काय होणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel