-->
समुद्राची पातळी वाढतेय...

समुद्राची पातळी वाढतेय...

समुद्राची पातळी वाढतेय.
जागतिक पातळीवर समुद्राची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्याकडून जो पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे त्याचाच एक भाग म्हणून माणसाला त्याचे हे परिणाम भोगावे लागत आहेत. २०१३ ते २०२२ या काळात समुद्राची पातळी ४.५ मिलीमीटरने वाढली आहे, असे जागतिक हवामानखात्याने म्हटले आहे. या शतकात ही प्रक्रिया अशीच सुरु राहाणार आहे व तसे वेगाने झाल्यास २१०० सालाच्या पुढे अनेक समुद्राच्या किनाऱ्यावरील मोठी शहरे धोक्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने शांघाई, ढाक्का, बँकॉक, जकार्ता, मुंबई, मनिला, लोगास, कैरो, लंडन, कोपनहेगन, न्यूयॉर्क, लॉस एन्सिलिस, ब्रुनोस एअर्स, सँन्तागो यासारखी अनेक समुद्रकिनाऱ्यावर वसलेली व आर्थिक केंद्र असेलेली मोठी, लहान शहरे धोक्यात येणार आहेत. या किनाऱ्यावर असलेली जनता व १५ ट्रिलियन डॉलरची संपत्ती धोक्यात येणार आहे. आपण सध्या असलेली पर्यावरणाची हानी कमी करण्यास जरी आत्तापासून सुरुवात केली तर २१०० सालानंतर याचा प्रभाव आपम कमी करु शकतो. त्याचबरोबरीने हिमशिखरांची उंची झपाट्याने कमी होत चालली आहे. हिमशिखरे वितळत असल्याने त्यांच्या पायथ्याशी असलेल्या अनेक वस्त्या धोक्यात आल्या आहेत. याचा धोका केवळ याच लोकांना आहे असे नाही तर जागतिक पातळीवरील सर्व मानवजातीला याचा धोका आहे. प्रामुख्याने शहरी व निमशहरी लोकांच्या अंगभूत सवयी, जीवनशैलीतून पर्यावरणाचा तोल ढासळत चालला आहे. परंतु आजवर त्याचा फारसा धोका जाणवत नव्हता. आता मात्र संपूर्ण मानव जमात धोक्याच्या एका वळणावर येऊन ठेपल्याने आता जगाने यावर विचार करुन अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सरकारने याकडे जसे लक्ष देणे गरजेचे आहे त्यापेक्षा सर्वसामान्य जनतेने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपली समाजाप्रति असलेली भावना लक्षात घेऊन याची चळवळ उभारण्याची गरज आहे. सध्याच्या एकूणच बदलत्या पर्यावरणातील परिस्थितीमुळे कधी कुठले अस्मानी संकट अचानक कोसळेल, याचा भरवसा राहिलेला नाही. अचानक कोसळणारा पाऊस, अचानक थंडी पडणे किंवा अचानक थंडी गायब होणे हे सर्व पर्यावरणाचा तोल ढासळत असल्याचे चिन्ह आहे. काही वर्षांपूर्वी अचानक आलेल्या सुनामीमुळे हजारो लोकांचे बळी गेले, संसार उद्ध्वस्त झाले, जंगल खाक झाली, संहारक वादळाने अनेकांना बेघर केले. पावसाळ्यात अतिरेकी वर्षावाने नद्यांना पूर येणे तर नित्याचंच झालंय! काही शहरांमध्ये अतिवृष्टी, तर काही ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाण्याची टंचाई… असा निसर्गाचा अनिश्चित, अंदाधुंद कारभार चाललेला दिसतो. हवेचे बिघडत चाललेले प्रदूषण हा याचाच भाग आहे. ठिकठिकाणी वाढत चाललेल्या औद्योगिकीकरणाचा हा परिणाम आहे. त्याशिवाय कोळसा आणि लाकूडसुद्धा इंधन म्हणून वापरले जाते. यातून घातक विषारी वायू निर्माण होऊनही प्रदूषण वाढत आहे. हे फार मोठं संकट समोर उभे राहिलंय. त्यामुळे बर्फाचे डोंगर वितळून नद्यांना पूर येताहेत. समुद्राच्या पाण्यातला खारेपणा आणि ऑक्सिजन संपून जलचर प्राणी जीवन धोक्यात आले आहे. तसेच, जलप्रदूषण हाही एक मोठा प्रश्न बनला आहे. असा हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक सहकार्य करायला उभं राहण्याची गरज आहे. शाळा-कॉलेजमध्ये पर्यावरणाचं शिक्षण द्यायला हवे. नाही तर, हा फास आणखी आवळला जाईल. मुलांना लहानपणापसून या विषयाचे गांभिर्य सांगितल्यास त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. तापमानवाढीचे सर्वात जास्त दुष्परिणाम प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधातल्या देशांमध्ये दिसून येत आहेत आणि ते गंभीर स्वरूपाचे आहेत. समशीतोष्ण कटिबंधात येत असल्याने भारतात तापमावाढीमुळे अनेक गंभीर प्रश्न आणि संकटं उभी राहिली आहेत आणि भविष्यात आणखी गंभीर होणार आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे ध्रुव प्रदेशावरील बर्फ वेगाने वितळत आहे. पुढील दहा ते बारा वर्षांमध्येच ध्रुव प्रदेशावरील सर्व बर्फ वितळेल, असा अंदाज आहे. या ध्रुवीय प्रदेशातल्या बर्फाच्या वितळण्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील गावांना आणि शहरांचा धोका वाढला आहे. भारताचा विचार करायचा, तर पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यांना समुद्राच्या पाणी पातळीतल्या वाढीचा धोका जाणवायला सुरुवातही झाली आहे. त्याचबरोबर मासेमारी उद्योगही संकटात आला आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतानाच पाण्याचे तापमानही वाढले आहे. शिवाय पाण्याचा खारटपणा कमी होत चालला आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे, समुद्राच्या पाण्यातल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले असून या पाण्यातली सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. येत्या काळात ही समस्या आणखी गंभीर होणार आहे. अलीकडच्या काळात पिकांवर पडणाऱ्या कीड, रोगांचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी, पीक उत्पादनात घट दिसून येत आहे. याशिवाय वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर नष्ट झाल्यामुळे सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. याचा परिणाम म्हणून मोतीबिंदू तसेच कातडीच्या कर्करेागाचे प्रमाण वाढले आहे. येत्या काही दशकांमध्ये भारत आणि दक्षिण आशियात राहणाऱ्या लक्षावधी नागरिकांना जागतिक तापमानवाढीचा फटका बसणार आहे. येत्या काळात उष्णता आणि आर्द्रता या दोन्हीतही मोठी वाढ होणार आहे. एवढंच नव्हे, तर या दोन्हींचीही पातळी पुढील काही वर्षांमध्ये धोकादायक स्तरावर पोहोचणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. साहजिक या परिस्थितीत सर्वसामान्यांना जगणे अशक्य होईल. अलीकडे पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. पृथ्वीवर असलेल्या एकूण पाण्यापैकी फक्त दोन टक्के पाणी गोडं आहे. हे पाणी बर्फाच्या रूपात ध्रुव प्रदेशावर आहे; परंतु आता तापमानवाढीमुळे तेही वितळून समुद्राच्या पाण्यात मिसळतेय. साहजिक ते मानवासाठी उपयोगाचे ठरत नाही. आजच्या आधुनिक शेतीत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्याचबरोबर विषारी कीटकनाशकांचा अमर्यादित वापर होत आहे. यामुळे जमिनी प्रदूषित झाल्या आहेत. शेतीसाठी पाण्याच्या अतिवापराने जमिनी क्षारपड बनल्या आहेत. पिकांवरील खते पाण्यात मिसळून त्याद्वारे विषारी घटक मानवापर्यंत पोहोचत आहेत. यातून कॅन्सरचं प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात अशा कीटकनाशकांच्या, खतांच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध घालणच हिताचे ठरणार आहे. प्लास्टिकचा अतिरेकी वापरही थांबवायला हवा. देशातल्या जैवविविधतेच्या ऱ्हासाकडे आजवर फारसे लक्ष देण्यात आले नाही. जगाच्या पाठीवर १७ देशांमध्ये सर्वात जास्त जैवविविधता आहे. या देशांना महाजैवविविधता देश असे म्हटले जाते. भारत हा त्यातील एक देश आहे. भारतात दरवर्षी १४ लाख हेक्टरवरील जंगल नष्ट होत आहे. देशात ३३ टक्के भूमीवर जंगल असणे आवश्यक असताना फक्त दहा टक्के प्रदेशच जंगलव्याप्त आहे. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणाबाबत साऱ्यांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. पर्यावरणाकडे आपण आजवर दुर्लक्ष करुन विकासाची कास धरली. मात्र हाच विकास जनतेला मारक ठरला आहे. याचा अर्थ विकास नको असा नव्हे, तर विकास आपल्याला जरुर पाहिजे आहे. परंतु पर्यावरणाचा ऱ्हास करणारा विकास करुन मानवजातच आपण धोक्यात का आणावयाची, असा सवाल आहे.

0 Response to "समुद्राची पातळी वाढतेय..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel