
केरळातील डाव्याचे यश
09 मेच्या मोहोरसाठी चिंतन
केरळातील डाव्याचे यश
पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व त्यांच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी भुईसपाट झाली असताना केरळात मात्र माकपने जबरदस्त यश पदरात पाडले आहे. दरवेळी एकदा डावी आघाडी व दुसऱ्यावेळी कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी अशी आलटून पालटून सत्तेत येण्याचा केरळात इतिहास आहे. मात्र यावेळी ४४ वर्षाची ही परंपरा खंडीत झाली आणि सत्ताधारी डाव्या आघाडीने कॉँग्रेसला व त्यांच्या जोडीला निव्वळ हवा निर्माण केलेल्या भाजपाला पार झोपविले. कॉँग्रेसला यावेळी सत्तेत येण्याची आशा होती ती केवळ दरवेळच्या या परंपरेमुळेच. परंतु यावेळी केरळातील सुज्ञ जनतेने डाव्या आघाडीलाच आश्चर्यकारकरित्या कौल दिला. मागच्या विधानसभेत भाजपाने शून्य फोडून एक सदस्याची नोंदणी केली होती. त्यामुळे एकदा का आपण शून्य फेडले की आता सत्तेच्या केंद्रस्थानीच जाणार, अशी हवा भाजपाने निर्माण केली. परंतु त्यांची ही हवाच ठरली आणि पुन्हा एकदा भाजपाला शून्यावर समाधान मानावे लागले. भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने केरळात हिंदुत्वाची पेरणी करण्यास प्रदीर्घ काळापासून सुरुवात केली आहे, परंतु हिंदुत्वाचे हे बीज डाव्यांच्या सत्ताकारणात काही रुजत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले. प्रत्येक राज्याचे राजकारण हे वेगळे असते, मग तेथे पक्षांचे कितीही संघटन असो किंवा तेथील जनतशी बांधिलकी असो. प्रत्येक राज्याचे राजकारण हे वेगळेच ठरते. एकाद्या राज्यात यशस्वी ठरलेला पक्ष दुसऱ्या राज्यात सफशेल फेलही ठरतो. भारतीय लोकशाहीचा हा महत्वाचा गाभा ठरला आहे. अगदी ज्या पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने साडेचार दशके सत्ता गाजविली त्या राज्यात सत्तांतरानंतर केवळ तीन निवडणुकांनंतर हा पक्ष पूर्णपणे झोपला आहे, तर केरळात मात्र नव्या उभारीने वर आला आहे. केरळात भाजपाने सत्ताधाऱ्यांचा पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडले होते. गेले दोन वर्षे त्याची जोरदार तयारी सुरु होती. शबरीमला मंदीराच्या प्रकरणावरुन येथील वातावरण तापविण्यास सुरवात झाली होती. परंतु जनतेने सुज्ञपणे हिंदुत्वाची झूल न पांघरता डाव्यांच्या लाल झेड्यांलाच सलाम केला आहे. भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला थारा न देण्याचा स्पष्टपणे इशारा केरळातील जनतेने दिला आहे. भाजपाचे केरळात जे मर्य़ादीत संघांच्या खांद्यावरचे संघटन आहे, त्याला मोदी-शहांनी आपला साज चढविण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर करण्यात आला. मुख्यमंत्री विजयन यांना बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक कट रचला गेला. सोन्याची तस्करी प्रकरण, सरकारमध्ये मागच्या दरवाजाने होणाऱ्या नियुक्त्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांना मासेमारीतील राज्य सरकारने दिलेले मुक्तव्दार असे अनेक प्रश्न भाजपाने गाजविले होते. त्यावर सोशल मिडियात एवढे रण माजविले गेले की, काही क्षण कोणालाही वाटेल की यावेळी भाजपाचेच सरकार येणार. भाजपाकडे केरळात नेतृत्व नसल्याने मेट्रोमॅन म्हणून ज्यांची संभावना केली जाते त्या ई श्रीधरन यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले. त्यांनी देखील संघाच्या आणाभाका घेत केरळात सत्ता परिवर्तनाची हाक दिली. परंतु या नोकरशहाला जनतेने सफशेल नाकारले. अगदी त्यांना विधानसभेतही प्रवेश दिला नाही. नोकरशहा म्हणून कितीही यशस्वी झालेला माणूस राजकारणी म्हणून यशस्वी होतोच असे नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले. केरळातील डाव्या आघाडीच्या यशामागे त्यांची आजवर जनतेशी जोडली असलेली नाळ कारणीभूत आहे. त्याचबरोबर माकपने गेल्या काही वर्षात संघटनात्मक पातळीवर अनेक बदल केले आहेत. अनेक महत्वाच्या पक्षातील पदांमध्ये तरुणांना वाव दिला. सत्तास्थानी तरुणांना काही पदे दिली. त्यातील सर्वात तरुण महापौर करण्याचा मान दिला गेला. अर्थात ही पदे भरताना घराणेशाही टाळली गेली व पक्षातील संघटन कसे मजबूत होईल ते पाहिले गेले. यातून तरुणांची एक मोठी फळी पक्षात उभी राहू लागली. देशात मार्क्सवाद्यांची पिछेहाट होत असताना केरळात तरुणांना आकर्षित करण्यास माकप यशस्वी ठरला आहे, तो यातूनच. गेल्या पाच वर्षापूर्वी कॉँग्रेस आघाडीकडून सत्ता खेचून आणल्यावर डाव्या आघाडीने पहिल्याच दोन वर्षात पूराचे संकट झेलले. त्यातून केरळ सावरत होता तेवढ्यात कोरोनाचे संकट आले. परंतु या दोन्ही संकटात सरकारची खरी कसोटी लागली. मुख्यमंत्री विजयन य़ांनी यशस्वीरित्या या संकटांचा मुकाबला केला. कोरोनाच्या काळात सुरुवातीपासून त्याचे नियंत्रण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले गेले. यात आरोग्यमंत्री के शैलजा यांनी फार कष्ट घेतले. त्यांच्या या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. लॉकडाऊनमध्ये गरजवंतांना दोन वेळचे पुरेसे अन्न मिळावे यासाठी राज्यभर एक हजार कम्युनिटी किचन स्थापन केली. त्यातून लाखो लोकांना दिलासा मिळाला. त्याचे प्रामुख्याने त्यांना भरघोस फायदे या निवडणुकीत मिळाले आहेत. यावेळी ५० टक्के महिलांची मते व तरुणांची प्रामुख्याने नवमतदारांची मते ही डाव्या आघाडीला मिळाली आहेत. नोव्हेंबर २० मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत डावी आघाडी प्रचंड मतांनी विजयी झाली होती. त्यामुळे त्यातून त्यांच्या भविष्यातील विजयाची झलक त्यावेळी दिसली होती. कॉँग्रेसच्या आघाडीचा पाया हा प्रामुख्याने मुस्लिम व ख्रिश्चन मतदार होता. परंतु यावेळी हा मतदार त्यांच्याकडून दुरावून डाव्यांकडे काही प्रमाणात वळला. डाव्यांच्या यावेळच्या यशातील जे अनेक कंगोरे आहेत त्यातील हा एक महत्वाचा आहे. परंतु कॉँग्रेससाठी ही धोक्याची घंटा ठऱणार आहे. केरळात डाव्या आघाडीने आपली पाळेमुळे या निवडणुकीच्या माध्यमातून घट्ट केली आहेत. माकपचा हा शेवटचा किल्ला राहिला आहे व ढासळू न देण्याचा त्यांचा निर्धार आहे.
0 Response to "केरळातील डाव्याचे यश"
टिप्पणी पोस्ट करा