
उच्चशिक्षीत जाट नेता
08 मे शनिवारच्या अंकासाठी अग्रलेख
उच्चशिक्षीत जाट नेता
देशाचे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे पुत्र व माजी केंद्रीय मंत्री अजित सिंग यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी कोरोनाने दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनाने पश्चिम उत्तरप्रदेशातील जाट शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारा एक उच्चशिक्षीत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. २०१४ व २०१९ या गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांचा सलग पराभव झाल्याने तसे पाहता राजकीयदृष्ट्या ते संपले होते. परंतु एकेकाळी चरणसिंग व त्यंच्यानंतर अजितसिंग यांनी पश्चिम उत्तरप्रदेशावरील शेतकऱ्यांना मोहीनी घातलेली असल्याने त्यांचे प्रदीर्घ काळ निर्विवाद नेतृत्व होते. अर्थात अजितसिंग य़ांच्यापेक्षा त्यांच्या वडिलांची म्हणजे चौधरी चरणसिंग यांची मोठी राजकीय कमाई होती. चरणसिंग यांनी स्वातंत्र्य लढ्यापासून ते पंतप्रधान होईपर्यंत नेहमीच शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. त्यातून त्यांच्यामागे मोठी शक्ती उभी राहिली. सुरुवातीपासून अजितसिंग यांचा राजकारणाकडे ओढा नव्हता, मात्र परिस्थितीने ते राजकारणी झाले. जर ते राजकारणी झाले नसते तर कोणत्या तरी एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीचे प्रमुख निश्चित झाले असते. आय.आय.टी. खरकपूरमधून त्यांनी बी.टेक केल्यावर १९६० साली अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी शिकागो येथील विद्यापीठातून उच्चपदवी संपादन केली. त्यानंतर ते आय.बी.एम. या संगणक क्षेत्रातील त्यावेळच्या नामवंत कंपनीत नोकरीसाठी दाखल झाले. त्यानंतर ते जवळपास दीड दशक अमेरिकेत राहिले व तेथे ते चांगलेच स्थिरावले होते. त्यांना परत भारतात काही येण्याची इच्छा नव्हती. परंतु चरणसिंग यांचा आग्रह होता की, त्यांच्या मुलाने भारतात परतावे व आपली राजकीय गादी चालवावी. त्यावरुन पिता-पुत्रात बरेच मतभेदही झाले. मात्र शेवटी चरणसिंग यांचा आग्रह त्यांना मोडता आला नाही. १९८०च्या दरम्यान चरणसिंग यांची प्रकृती खालावली आणि हळूहळू चरणसिंग यांच्याकडे राजकीय वारसाने नेतृत्व आले. १९८६ साली त्यांची सर्वात प्रथम राज्यसभेवर नियुक्ती झाली. १९८७ मध्ये चरणसिंग यांच्या निधनानंतर जनता पार्टीत मतभेदांमुळे फूट पडली. त्यावेळी अजितसिंग यांनी जनता दल (अजित) हा गट स्थापन केला. येथूनच त्यांची खरी राजकीय वाटचाल सुरु झाली. त्यावेळी केंद्रात फार मोठ्या राजकीय हालचाली होत होत्या. व्ही. पी. सिंग यांची राजीव गांधींच्या विरोधात बंड पुकारले होते. त्यावेळी कॉँग्रेसविरोधक व्ही.पी.सिंग यांच्या नेतृत्वाखाली एकवटले होते. त्यात अजितसिंगही होते. पुढे चालून व्ही.पी.सिंग पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या मंत्रिमंडळात व्यापार व उद्योगमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. हे सरकार गडगडल्यावर झालेल्या निवडणुकीत ९१ साली पी.व्ही. नरसिंगहाव यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. त्यावेळी सर्वात प्रथम विरोधकांची साथ सोडून अजितसिंग हे कॉँग्रेसच्या आघाडीत गेले आणि अन्नप्रक्रिया मंत्री झाले. १९९६ सालची निवडणूक त्यांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर लढविली. परंतु त्यांचे कॉँग्रेस पक्षात फारसे काही जमले नाही. शेवटी त्यांनी कॉँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रीय लोक दल स्थापन केले. परंतु त्यांच्या या राजकीय उड्या लोकांना काही फारशा पटत नव्हत्या. त्यामुळे जनतेने त्यांना १९८८ साली लोकसभेत पाठविले नाही. त्यांनी घेतलेल्या चुकीच्या राजकीय निर्णयांचा त्यांना फटका सहन करावा लागला. परंतु त्यांच्या वडिलांच्या पुण्याईवर ते पुन्हा १९९९ साली लोकसभेत परतू शकले. २००१ साली वाजपेयींच्या सरकारमध्ये सामिल झाले व तेथे त्यांची कृषीमंत्रीपदी वर्णी लागली. वाजयेपयींच्या सरकारसोबत ते शेवटपर्यंत होते. मात्र ते सरकार पडले आणि कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार सत्तेत आले. अजितसिंग यांनी पुन्हा टोपी बदलून मनमोहनसिंग सरकारमध्ये दाखल झाले. तेथेही त्यांनी आपले मंत्रीपद कायम राखले. २००४ व २००९ साली ते पुन्हा लोकसभेवर निवडून गेले. २००९ साली त्यांचे पुत्र जयंत हे देखील लोसकभेवर निवडून गेले. आता हेच जयंत दिल्लीत झालेल्या कृषी कायद्याच्या विरोधातील लढ्यात अग्रभागी होते. त्यामुळे चरणसिंग यांची तिसरी पिढी देखील सध्या राजकारणात आहे. अजितसिंग यांनी आपली सत्ता कायम राखण्यासाठी नेहमीच केंद्रात सत्तेशी साटेलोटे केले, हा त्यांचा सर्वात वाईट गुण ठरला. मोदी सत्तेत येण्यापूर्वी असलेल्या गेल्या किमान पाच सरकारमध्ये ते होते. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो, अजित सिंग हे त्यांच्या मंत्रिमंडळात असणारच असे जणू काही समिकरणच झाले होते. त्यांच्या या सत्ताकेंद्रीत राजकारणाला जनता कंटाळली होती. त्यामुळेच त्यांना २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव चाखावा लागला. एकेकाळी बागपत हा जाटांचे प्रभूत्व असलेला मतदारसंघ चरणसिंग व त्यानंतर अजितसिंग यांची विजयाची मक्तेदारी असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जाई. परंतु त्यांची आता या मतदारसंघातील पक्कड ढिली होत होती. तसेच चरणसिंग यांची पुण्याची अजून किती काळ टिकणार होती, हा देखील प्रश्नच होता. २०१४ साली तर मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपालसिंग यांनी त्यांचा लोकसभेला मोठा पराभव केला होता. सत्यपालसिंग हे तसे बाहेरचे उमेदवार म्हणून ओळखले गेले होते, परंतु अशा उमेदराराकडून त्यांना पराभव चाखावा लागला. त्यांचा पारंपारिक मतदार असलेला जाट समाज व मुस्लिम समाज त्यांच्यापासून दुरावला होता. जाट समाजाला भाजपाने हिंदुत्वाच्या फेऱ्यात ओढले होते. त्यामुळे अजितसिंग यांच्या पारंपारिक मतदारांवर आता भिस्त ठेवणे शक्य नव्हते. उत्तरप्रदेशाच्या राजकारणातही त्यांचे स्थान डळमळीत झाले होते. गेल्या उत्तरप्रदेश विधानसभेत त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. अशा प्रकारे गेल्या दशकात अजितसिंग यांचा पक्ष आता हळूहळू संपत आला असताना आता त्यांचे निधन झाले.
0 Response to "उच्चशिक्षीत जाट नेता"
टिप्पणी पोस्ट करा