
राजन यांची जळजळीत टीका
06 मेच्या अंकासाठी अग्रलेख
राजन यांची जळजळीत टीका
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर व जागतिक पातळीवरील नामवंत अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी भारतात नेतृत्वाचा अभाव असल्याची जळजळीत टीका केली आहे. अर्थात त्यांचा टिकेचा हा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने आहे हे स्पष्ट आहे. रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक सोडल्यापासून देशातील आर्थिक प्रश्नावर सातत्याने आपले विचार मांडीत असतात व त्यात सरकारी धोरणावर टीका करण्यास ते मागेपुढे पाहात नाहीत. रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांचे मोदी यांच्याशी नोटाबंदी करण्याच्या विषयावर मतभेद झाले होते असे बोलले जाते. हे जरी खरे आहे, असे गृहीत धरले तरी राजन यांनी नोटाबंदीचे जे तोटे आहेत ते अनेकदा सांगितले व त्यांचे सरकारने न ऐकता हा एकतर्फी निर्णय घेतला. त्याचे राजन यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक तोटे आपण प्रत्यक्षात अनुभवले. त्यामुळे राजन अनेकदा जे सांगतात ते खरे होते असा आजवरचा अनुभव आहे. यावेळी त्यांनी मोदी यांचे नाव न घेता फार जहरी टीका केली आहे आणि ही टीका खरीच आहे. मोदी यांनी पाच राज्यातील घेतलेल्या निवडणुका व सत्ताधारी पक्षानेच या काळात लाखोंच्या सभा घेऊन कोरोना विषयक नियमांचे जे उल्लंघन केले तसेच पंचवीस लाख लोकांना जमवून घेतलेला कुंभमेळा तसेच आय.पी.एल.च्या भरविलेलल्या स्पर्धा यासंबंधी जगभरातून मोदी सरकारवर टीका झाली आहे. राजन यांनी केलेली टीका ही त्याचाच पुढील अंक म्हटला पाहिजे. मोदी यांनी निवडणुका कशाबशा रेटून नेल्या. मात्र त्यांना कुंभमेळा व आय.पी.एल. अखेर स्थगितच करावे लागले. त्यामुळे हे सर्व आयोजित करण्यात मोठी चूक होती, हे स्पष्ट होते. त्यामुळे भारतात कोरोना संकटामागे दूरदृष्टी नेतृत्वाचा अभाव असल्याची राजन यांनी केलेल्या टिकेला पुष्टी मिळते. पहिली लाट ओसरत आल्यावर सरकारने लगेच श्रेय लाटण्यासाठी कोरोना संपल्याचे जाहीर करुन टाकले आणि अनेक बाबी शिथील केल्या. त्यातच दुसऱ्या लाटेची पेरणी केली गेली. जागतिक स्तरावरील परिस्थितीचे भान न राखता देशातील नेतृत्वाने अनेक बाबी अविचाराने केल्या. ब्राझीलसारख्या देशात हा विषाणू पुन्हा डोके वर काढतोय हे जरी लक्षात घेतले असते तरी सावधानगिरी जोपासता आली असती अशी टीका राजन यांनी केली आहे ती वस्तुस्थितीला धरुनच आहे. त्याच्या जोडीला सरकारने दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन जरी काही बाबी केल्या असत्या तरी बरे झाले असते. एक तर पर्यायी आरोग्य व्यवस्था तैनात ठेवण्याची गरज होती. लॉकडाऊन हे काही काळासाठी लावाले लागते, हे मान्य परंतु लॉकडाऊन उठवितानाही भविष्यातील धोके गृहीत धरुन पावले टाकावी लागतात. यातील कोणतेच नियोजन भारत सरकारने केलेले नाही. उलट त्यात भरीस भर म्हणून निवडणुका, कुंभमेळा व आय.पी.एल. सारख्या स्पर्धा भरविल्या गेल्या. अर्थात या सर्व बाबी सध्या काही काळासाठी टाळणे योग्य झाले असते. परंतु तसे झाले नाही. यातील सरकारचे सर्व अंदाज चुकले. कोरोनावर मात केल्याची आत्मप्रौढी नडली. यातील आय.पी.एल व कुंभमेळा अखेर स्थगितच करावा लागल्याने सरकारचा हा निर्णय कसा चुकीचा होता यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे सध्याची दुसरी लाट येणे हा आपल्याकडील दूरदृष्टी नेतृत्वाचा अभाव असल्याचे स्पष्ट करतो. आता लसीकरणातील गोंधळ पाहाता त्याचीच पुनरावृत्ती केली जात आहे. अनेक देशांनी लसीकरणाच्या आधारावर तिसरी लाट थोपली आहे तसेच लॉकडाऊन हळूहळू उठवून जनतेला दिलासा देण्यास प्रारंभ केला आहे. आपल्याकडे लोकसंख्या मोठी आहे हे खरेच आहे, परंतु ही लोकसंख्या लक्षात घेऊनच त्याचे लसीकरणाचे नियोजन करणे काही अवघड नव्हते. त्यादृष्टीने राजन यांनी केलेल्या टीकेला महत्व आहे. रघुराम राजन यांनी लॉकडाऊनच्या काळात व त्यापूर्वी देखील सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळातील दारिद्र्या रेषेखालील लोकांना मदतीचा हात देताना सरकारने घेतलेला अखडता हात, उद्योगधद्यांना दिलासा देण्याची गरज, देशातील सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचे जाहीर केलेले धोरण, याबाबतील त्यांनी जोरदार टिका केली होती. राजन हे जगतमान्य अर्थतज्ज्ञ असल्याने त्यांच्या टीकेला महत्व आहे. केवळ राजनच नव्हे तर देशातील आघाडीचे बँकर उदय कोटक यांनी देखील पंतप्रधानानंचे नाव न घेता त्यांच्या धोरणावर टीका केली आहे. त्यामुळे हळूहळू उद्योगधंद्यातील धुरीणींचा मोदी विरोधी आवाज आता एकू येऊ लागला आहे. अशा प्रकारे सरकारच्या धोरणावर रास्त टीका केली जाणे, हे लोकशाहीतील कर्तव्यच आहे. त्याचबरोबर सरकारी पक्षाने ही टिका विचारात घेऊन त्यानुसार आपल्या कामकाजात सुधारणा करणे अपेक्षीत आहे. परंतु सरकार अशा टीकेला जुमानत नाही असे गेल्या सात वर्षात आढळले आहे. राजन यांनी केलेली टीका लक्षात घेता आता उदय कोटकही बोलते झाले आहेत. भविष्यात आता आणखी काही उद्योजक अशी टीका करण्याचे धाडस दाखवितात का ते पहावे लागेल.
0 Response to "राजन यांची जळजळीत टीका"
टिप्पणी पोस्ट करा