-->
संपादकीय पान गुरुवार दि. २६ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
मोदींची गोबेल्सनिती
---------------------------
एखादी खोटी गोष्ट जर ती वारंवार सांगत राहिली तर ती आपल्याला खरी वाटू लागते. याला गोबेल्सनिती असे म्हणतात. दुसर्‍या महायुध्दात हिटलरचा साथीदार गोबेल्स हा कोणतीही खोटी गोष्ट बेमालूमपणे खरी असल्यासारखा सांगायचा त्यामुळे लोकांना ती गोष्ट खरीच असल्याचे वाटे. त्यामुळे जगात गोबेल्सनिती हा शब्द प्रचलित झाला. याची आठवण होण्याचे कारण म्हणजे हीच गोबेल्सनिती भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अवलंबित आहेत. नरेंद्र मोदी ठिकठिकाणी आपल्या भाषणात इतिहासाचा विपर्यास करीत आहेत. इतिहास चुकीच्या पध्दतीने म्हणजे आपल्याला सोयिस्कर वाटेल असा सांगण्यात तर त्यांची हातोटी आहे. महाराष्ट्र आपला मोठा भाऊ आहे सांगत त्या भावाची बदनामी करत सुटायचे असा निश्‍चय मोदींनी आपल्या मुंबईतील महागर्जना केला होता. या सभेत देखील त्यांनी अनेक खोटे पुरावे बेमालूमपणे दिले. गुजरातपेक्षा महाराष्ट्र हा केव्हाही प्रगत आहे आणि महाराष्ट्राला मोदी एवढ्या झटक्यात काही मागे टाकू शकणार नाहीत. मोदी जर अशा प्रकारे मराठी माणसाला मान खाली घालायला लावणारे आरोप करुन आपण म्हणजे गुजराती कसे श्रेष्ठ आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला तर मोदींच्या भाजपाला राज्यात मते मिळणे कठीण आहे. महाराष्ट्र सरकार जिकडे चुकत असेल तिकडे त्यांच्यावर जरुर आरोप करावेत. तो हक्क केवळ मोदींचा नाही तर अन्य कुणालाही आहे. परंतु चुकीची आकडेवारी सहजरित्या फेकून राज्याला बदनाम करण्याचा मोदींचा डाव असेल तर तो कुणी सहन करणार नाही. महाराष्ट्र व गुजरातचा जन्म एकाच दिवशी झाला. खेर तर त्यासाठी महाराष्ट्रातील लोकांना हुतात्मा होऊन त्यांच्या रक्तातून हे राज्य उभे राहिले आहे. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या लढ्यात गोळीबार केला त्यावेळी मुख्यमंत्रीपदी मोरारजी देसाई होते आणि त्यांना संयुक्त महाराष्ट्र नको होता. हा इतिहास मोदी सोयिस्कर विसरत आहेत. तसेच ही दोन राज्ये स्थापनेनंतर महाराष्ट्रात २६ तर गुजरातमध्ये १४ मुख्यमंत्री झाले असे आपल्या भाषणात मोदी म्हणाले. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील १७ मुख्यमंत्र्यांनी २६ वेळा शपथ घेतली. तर गुजरातमध्ये १४ मुख्यमंत्र्यांनी २७वेळा शपथ गेतली. मोदींनी मात्र इतिहासाची मोडतोड करुन महाराष्ट्रात २६ मुख्यमंत्री झाल्याची लोणकढी थाप ठोकली. गुजरातमध्ये राजकीय अनागोंदीमुळे प्रदीर्घ काळ राष्ट्रपती राजवट होती. तर महाराष्ट्रात केवळ एकदाच राष्ट्रपती राजवट होती, या बाबीकडेही मोदी यांनी दुर्लक्ष केले. अशा प्रकारे मोदी ठिकठिकाणी आपल्या भाषणात खोटी माहिती जनतेला पुरवून त्यांची दिशाभूल करीत आहेत. टोल नाक्यावरीलही उदाहरण मोदी यांनी चुकीचे देऊन जनतेची व महाराष्ट्रीयन लोकांची फसवणूक केली आहे. महाराष्ट्रातील चेकपोस्टवर आधुनिकीकरण नसल्याने तसेच भ्रष्टाचार बोकाळलेला असल्याने महाराष्ट्राचे किमान ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे मोदी यांनी जाहीर सभेत सांगितले होते. गुजरातच्या सीमेवर मगाराष्ट्रात अचाड येथे टोल नाका आहे. याचे आधुनिकीकरण ऑगस्ट २०१२ मध्ये झाले. ऑक्टोबर १३ पर्यंत या नाक्यावर ७ हजार ५७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. तर आधुनिकीकरणापूर्वी याच नाक्यावर अवघ्या सात महिन्यात २६२७ कोटी रुपये महसूल झाला होता. तो गुजरातमधील नाक्यावर जमा होणार्‍या महसुलापेक्षा कितीतरी जास्त आहे. महाराष्ट्राने आपल्या चेकपोस्टचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय २००६ साली घेतला होता. एकूण २२ चेकपोस्टपैकी १७ पोस्टचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी राज्य सरकारने एक हजार कोटी रुपये खर्च केला असून त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आधुनिकाकरणाच्या अभावी कमी उत्पन्न होत असल्याचा मोदींचा दावा फोल आहे. अशा प्रकारे  मोदींनी महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी कितीही खोटी आकडेवारी तोंडावर फेकली तरी लोक फसणार नाहीत. महाराष्ट्राचे देशात असलेले औद्योगिकिकरणातील अव्वल स्थान हे यापुढेही टिकणार आहे. कारण देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे. मुंबई हे बंदर असल्यामुळे तसेच ब्रिटीशकाळापासून या बंदरातून मोठी उलाढाल होत असल्याने मुंबईचे महत्व कधीच कमी होणार नाही. भांडवलदारांना सवलती देऊन मोदी आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करतील. त्यात त्यांना काही प्रमाणात जरुर यश येईल, मात्र मुंबई व महाराष्ट्राचे जे स्थान आहे ते ढळणार नाही. पंतप्रधानपदासाठी दावा करणार्‍या उमेदवाराने अशा प्रकारे दोन राज्यातली तुलना करुन दोघा भावांमध्ये भांडणे लावून देणे चुकीचे आहे. मोदी यांनी राष्ट्रीय प्रश्‍नांवर आपली मते मांडणे योग्य होईल. दोन राज्यांची तुलना करणे त्यांना शोभत नाही. उद्या देशाचे पंतप्रधानपदी रुजू झाल्यावर संपूर्ण देशाचा विचार करणार की अशा प्रकारे राज्यांची तुलना करणार याचा विचार मोदींनी करणे आवश्यक आहे. मोदींना जर आपली प्रतिमा खरोखरीच देशव्यापी नेता अशी करावयाची असल्यास त्यांनी देशाला भेडसाविणार्‍या प्रमुख प्रश्‍नांना हात घालावा व ते कसे प्रश्‍न सोडविणार याचे उत्तर द्यावे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्याकडे दिल्लीची सत्ता आल्यास पंधरा दिवसात जनलोकपाल संमंत करु असे आश्‍वासन दिले होते. आता मात्र सत्ता आल्यावर आता असे करणे तातडीने शक्य नाही असे म्हटले आहे. केजरीवाल यांनी अशा प्रकारे जनतेची दिशाभूलच केली आहे. नरेंद्र मोदींनी देखील यापासून धडा घेण्याची आवश्यकता आहे.
----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel