-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २७ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
एका जगप्रसिध्द रायफलच्या जन्मदात्याचा मृत्यू
-------------------------------
जगातील एक नामवंत रायफल म्हणून नावलौकिक पावलेल्या एके ४७ चा जन्मदाता असलेला मिखाईल कलाश्‍निकोव्ह वयाच्या ९४व्या वर्षी या जगातून निघून गेला आहे. १९५० साली अधिकृत वापरात आलेल्या या रायफलीने आजही आपली लोकप्रियता काही सोडलेली नाही. जगात शस्त्रत्रात क्षेत्रात अनेक संशोधने झाली. अत्याधुनिक शस्त्रे आली परंतु एके ४७ ला काही पर्याय निर्माण झाला नाही, हेच मिखाईल कलाश्‍निकोव्ह यांच्या यशाचे गमक आहे. आजवर या रायफलीची अंदाजे साडेसात कोटी एवढी विक्री झाली आहे. या रायफलीच्या गोळ्यांनी जगात करोडो बळी घेतले असतील. केवळ अतिरेक्यांनीच नव्हे तर जगभरातील क्रांतिकारकांनी गनिमी काव्याच्या युद्धात तिचा वापर केला. क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन यालाच्या सोबतही नेहमीच हीच रायफल असायची. अशा या रायफलीचे जनक मिखाईल कलाश्‍निकोव्ह हे तत्कालीन असलेल्या सोव्हिएत युनियनच्या लष्करात अधिकारी होते. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले मिखाईल १९३८ मध्ये रेड आर्मीमध्ये भरती झाले. तेथेच त्यांच्यातील शस्त्रास्त्र रचनाकाराला पैलू पडले. सोव्हिएत रणगाडा रेजिमेंटमध्ये काम करताना ते जखमी झाले आणि ती त्यांच्या पुढील आयुष्याचा मार्ग निश्‍चित करणारी घटना ठरली. यानंतर त्यांनी बंदुका बनविण्याचा ध्यास घेतला. सुरवातीला जर्मनीच्या बंदुकांची ख्याती मोठ्या प्रमाणात होती. त्यांच्या दर्जामुळे रशियाच्या सैनिकांना नेहमी हार खावी लागे. यावर मार्ग काढण्यासाठी काही सहकारी सैनिकांनी जर्मनीच्या तोडीस तोड बंदूक तयार करण्याची त्यांना विनंती केली. यातून निर्माण झाली कलाश्‍निकोव्ह रायफल. सुरवातीला यात काही त्रुटी होत्या. त्या दूर करून आधुनिक बंदूक तयार झाली आणि तिचे नामकरण झाले एके ४७. सोव्हिएत युनियनच्या लष्करात १९४९ मध्ये तिचा वापर सुरू झाला आणि याबद्दल मिखाईल यांना  रशियातील सर्वोच्च सन्मान देऊन गौरविले गेले. नंतर त्यांना ऑर्डर्स ऑफ लेनिन आणि हिरो ऑफ सोशालिस्ट लेबर  यासारख्या मोठ्या सन्मानांनी गौरविण्यात आले. सोव्हिएत युनियन फुटल्यावर रशिया स्थापन झाल्यावर त्यांच्या ७५ व्या वाढदिवशी बोरिस येल्त्सिन यांनी त्यांना मेजर जनरल पदावर बढती दिली. पुढे चालून या रायफलीची नक्कल अनेक देशांत केली गेली. यातील काही देशांनी मिखाईल यांना हक्काचे मानधन दिले. उरलेल्या देशांनी मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसली. कलाश्‍निकोव्ह यांच्या उत्तरायुष्यात एका कंपनीने मिनरल वॉटर आणि छत्र्यांसाठी त्यांच्या नावाचा वापर करण्याचा करार केला. या बदल्यात त्यांना कंपनीचे ३० टक्के समभाग देण्यात आले. एके ४७ मुळे करोडो लोकांचे प्रण गेले. मात्र याबाबत त्यांना कधीही वैशम्य वाटले नाही. कारण मिखाईल यांचे नेहमी म्हणणे होते की, माझी निर्मिती ही जरुर आहे. परंतु तिचा वापर कसा करायचा हे मानवाच्या हातात आहे. त्याने जर त्याचा वापर स्वरंरक्षणार्थ केला तर तत्यातून त्याचा फायदा होईल मात्र दुसर्‍याला मारायला केला तर ती त्याची जबाबदारी ही सर्वस्वी त्याचीच आहे. मानवाने एखाद्या नव्या संशोधनाचा वापर कसा करावयाचा हे त्यानेच ठरवायचे आहे. त्यांचे हे तत्वज्ञान मनुष्याला धडा शिकविणारे आहे. मिखाईल कलाश्‍निकोव्ह यांनी रायफल निर्मितीत आपला एक ठसा जागतिक     पातळीवर उमटविला. याबाबत त्यांचे नाव जगात सुवर्णाक्षराने लिहिले जाणार आहे.
--------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel