-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २७ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
कॉँग्रेसची व्यर्थ जुळवाजुळव
--------------------------
नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यातल्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसचे पानिपत झाल्यावर कॉँग्रेस संघटनेचा सुस्त झालेल्या हत्तीला जाग आली आहे. लोकसभेच्या निवडणुका पुढील एप्रिल महिन्यात अपेक्षित असताना त्याची तयारी आत्तापासूनच केली पाहिजे याची जाग प्रामुख्याने पक्षाला सपाटून मार खाला लागल्यावर आली आहे. कॉँग्रेसचे सुकाणू सध्या युवा नेते राहूल गांधी यांच्याकडे आलेले असल्याने त्यांनाही अचानक आपल्या संघटनेत फेरफार करण्याची आवश्यकता वाटू लागली. सहसा कॉँग्रेस पक्ष हा सत्तेत असला की त्याला फक्त लोकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करावे असे कधी वाटत नाही. आपल्या हातून सत्ता जाणार असे दिसू लागल्यावर अनेकदा लोकांच्या प्रश्‍नाची अचानक जाग येते. सद्या कॉँग्रेस पक्ष या स्थितीतून जात आहे. चार राज्यातला पराभव हा केंद्रीय नेतृत्वास जीव्हारी लागणे आपण समजू शकतो. कॉँग्रेसला लोकांनी दिलेला हा जबरदस्त दणकाच होता तसेच यापुढे तुम्ही सत्तेत येणार नाही याचा सांगणारा इशाराही यातच होता. परंतु आता कितीही कॉँग्रेसने धडपड केली तरीही फारसे काही होणार नाही. पक्षांतर्गत फेरबदल, काही मंत्र्यांना डच्यू देणे, नवीन पक्षांशी मैत्री करणे व तरुण पिढीला वाव दण्याचा प्रयत्न करणे हे ठराविक साच्यातले प्रयत्न करण्यास कॉँग्रेसने आता प्रयत्न सुरु केला आहे. हा प्रयत्न निष्फळच ठरणार असला तरीही कॉँग्रेसची ही केविलवाणी धडपड पाहणे गंमतीशीर आहे. कॉँग्रेसने पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांना पक्षकार्यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. या मंत्रीबाईंमुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांचे विकास प्रकल्प पर्यावरण खात्याच्या मंजुरी अभावी रखडले आहेत असा साक्षात्कार झाल्यावर त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले. जयंती नटराजन यांच्या सांगण्यानुसार आपल्या कामावर पंतप्रधान मनमोहनसिंग खुष होते. मग असे अचानक का घडले? अर्थात असे प्रश्‍न कॉँग्रेस पक्षात विचारत नाहीत. तुम्ही सत्तेत आहात तोपर्यंत पक्षश्रेष्ठी तुमच्यावर खूष आहेत. तुम्हाला मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्ष कार्याच्या दावणीला बांधले जाते त्यावेळी समजायचे की पक्ष नेतृत्व तुमच्यावर खट्टू आहे. अर्थात कॉँग्रेस पक्षाच्या हातून वेळ आता गेली आहे. अशा प्रकारे काही मंत्र्यांना घरी बसवून सरकार काही कार्यक्षम होणार नाही आणि त्यातून निवडणुकीला काहीच फायदा होणार नाही. आगामी निवडणुकीत आपल्याबरोबर कोणते पक्ष राहातील वा ापल्याला सोडून जातील याची छाननी करुन त्यादृष्टीने काही नवीन मित्र जोडण्यास कॉँग्रेसने सुरुवात केली आहे. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार या मोठ्या राज्यात कॉँग्रेसला यावेळी जबरदस्त मार खावा लागणार आहे. त्यात बिहारमध्ये लालू व पास्वान यांच्या पक्षाबरोबर जुळवून घेऊन आपल्या जागा वाढतील असा राहूल गांधींचा होरा आहे. मध्यंतरी बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमारे हे कॉँग्रेसच्या कळपात येतील असा अंदाज होता. मात्र कॉँग्रेसची चार राज्यात हार झाल्यावर ते कशाला पराजीताबरोबर येतील? अशा स्थितीत कॉँग्रेसला बिहारमध्ये लालू व पास्वान या जोडीबरोबर जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही. परंतु यावेळी बिहारमध्ये चौरंगी लढती लढल्या जाणार आहेत त्यामुळे त्यात कॉँग्रेसचा तर निश्‍चत फायदा होणार नाही. कॉँग्रेसचा आणखी एक सत्तेतला भागीदार आहे तो काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स. हा पक्ष सध्या कॉंग्रेसबरोबर असला तरीही भाजपाला जर निवडणुकीनंतर जागा कमी पडत असतील तर ते भाजपाच्या कळपात जाऊ शकतात. त्यामुळे कॉँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सवर विश्‍वास नाही. मात्र तिकडे कोणताच दुसरा साथीदार पक्ष नाही, त्यामुळे कॉँग्रेसला फारुख अब्दुल्लांबरोबर फरफटत जावे लागणार आहे. दिल्लीतून यंदा लोकसभेला एकही जागा कॉँग्रेसला मिळणार नाही अशी स्थिती आहे. राजस्थान, मद्यप्रदेश या दोन राज्यातही त्यांची स्थिती निराशाजनकच असेल. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींशी त्यांचे यापूर्वीच फाटले आहे. ममतादीदी या भरवशाच्या नाहीत आणि कॉँग्रेसची इकडे स्वबळावर विशेष ताकद नाही. त्यामुळे या राज्यातही कॉँग्रेसच्या जागा कमी होणार आहेत. गुजरातमध्येही कॉँग्रेसच्या परिस्थितीत काही सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. महाराष्ट्रात असलेला साथीदार राष्ट्रवादी कॉँग्रेसवर भरवसा कधीच ठेवता येणार नाही. महाराष्ट्रात यंदा राष्ट्रवादी कॉँग्रेस आपला साथीदार असलेल्या कॉँग्रेसचेच उमेदवार कसे पडतील यासाठी जास्त मेहनत खर्ची पाडेल. कर्नाटकात गेल्या विधानसभेला कॉँग्रेसला सत्ता मिळाली ती येदुयुरप्पा यांच्या फुटीमुळेे. परंतु त्यांनी आता पुन्हा एकदा भाजपाशी जुळवून घेेतल्याने कॉँग्रेसला गेल्यावेळी जो फुटीचा फायदा मिळाला होता तो आता मिळणार नाही. तामीळनाडूत सध्याचा सहकारी पक्ष द्रमुकने पुढील निवडणुकीत कॉँग्रेसबरोबर आपण नसणार हे जाहीर केलेले आहे. त्यामुळे कॉँग्रेसच्या गेल्या दहा वर्षे असलेल्या या साथीदाराने रामराम केले आहे. जयललीता यांचे भाजपाशी सूत यापूर्वीच जमलेले असल्याने त्या देखील कॉंग्रेससोबत येणार नाहीत. अशा स्थितीत नव्याने पक्ष स्थापन केलेल्या सिनेनेट विजयकांत यांंच्या पक्षाबरोबर आपली सोयरिक जमते का याची चाचपणी कॉँग्रेसने सुरु केली आहे. समजा ही सोयरिक जमली नाही तर कॉंग्रेसला चौरंगी सामन्यात लढत द्यावी लागेल. अशा प्रकारे देशातील मोठ्या राज्यांचा विचार करता जवळजवळ प्रत्येक ठिकाणी कॉँग्रेसची स्थिती अतिशय दयनिय आहे. तरी देखील कॉँग्रेस नेतृत्वाची सत्ता टिकविण्यासाठी धडपड सुरु आहे. यात त्यांना फारसे काही यश लाभेल असे दिसत नाही. कॉँग्रेसची शेवटच्या टप्प्यातली ही जुळवाजुळव व्यर्थ आहे.
----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel