-->
संपादकीय पान--अग्रलेख-- २८ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
अंतिम टप्प्यातली लढाई
-------------------------
पाच राज्यातली विधानसभेच्या निवडणुकीची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, मणिपूर, छत्तीसगढ या राज्यातील निवडणुकांचा प्रचार आता रंगू लागला आहे. या पाच राज्यांपैकी तीन राज्ये म्हणजे दिल्ली, राजस्थान व तुलनेने छोटे असलेले मणिपूर हे राज्य कॉँग्रेसच्या ताब्यात आहेत तर अन्य दोन राज्ये भाजपाच्या ताब्यात आहेत. गेल्या पंधरववड्यात प्रचाराची रणधुमाळी उडू लागल्यावर लोकांचे त्यातून प्रबोधन होण्याऐवजी करमणूकच होत आहे. भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी व कॉँग्रेसच्या वतीने अध्यक्षा सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्या सभा सध्या गाजत आहेत. यात नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभांमधून कॉँग्रेसला टार्गेट केले आहे. नरेंद्र मोदी हे आक्रमक जरुर बोलतात परंतु अनेक इतिहासाचा विपर्याय करणारी वक्तव्ये त्यांनी केल्याने त्यांचे हसे होऊ लागले आहे. नरेंद्र मोदी हे व्यक्तीमत्व हे एका टोकाचे ठरले आहे. त्यांचा मुस्लिम विरोध हा काही लपून राहिलेला नाही. गुजरातमधील जातीय दंगलीचा त्यांच्यावर लागलेला कलंक अद्याप काही धुवून निघालेला नाही. केवळ प्रचाराच्या जोरावर व मिडीयाला हाताशी धरुन मोदी आपले घोडे दामटत आहेत. अलीकडच्या काळात एका झालेल्या पाहाणीत अनेक चॅनेल्सनी जास्ती कव्हरेज नरेंद्रभाईंना दिले. अर्थात मागे मोदी जो पैसा मुक्तहस्ताने सोडत आहे त्यात आहे. दुसरीकडे भाजपाचे कट्टर विरोधक असलेल्या कॉँग्रेसच्य अध्यक्षा सोनिया गांधी असो किंवा राहूल गांधी यांच्याबद्दलही लोकांमध्ये नैराश्य आहे. गेले दहा वर्षे सलग कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार केंद्रात असतानाही कितपत कामे केली आहेत हे आपल्याला दिसतच आहे. अशा वेळी भाजपा काय किंवा कॉँग्रेस दोन्ही जनतेचे प्रश्‍न सोडविणारे पक्ष नाहीत हे आता त्यांच्या काळात सिध्द झाले आहे. गेल्या काही वर्षात लोकांनी या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाखालील आघाड्यांना पुरेशी संधी दिलेली आहे. परंतु त्यांनी जनतेची कोणतीही कामे न केल्याने जनता या दोन्ही पक्षांवर नाराज आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. सध्या निवडणूक असलेल्या राज्यांपैकी मध्यप्रदेश हे एक मोठे राज्य. यएा राज्यात भाजपा सलग तिसर्‍यांदा जिंकणार का असा मुख्य प्रश्‍न आहे. येथे मतदारांनी ७० टक्के मतदान करुन आपले अस्तित्व दाखविले आहे. अर्थात मतदान ऐवढे विक्रमी झाल्याने कोणत्या पक्षाचा फायदा होणार याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. कॉँग्रेसच्या मते लोकांना बदल हवा आहे म्हणून लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडले ाहेत. तर भाजपाच्या दाव्यानुसार लोकांना पुन्हा हेच सरकार पाहिजे आहे त्यामुळे लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे. परंतु ७० टक्के मतदान झाल्याने या दोन्ही पक्षांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालेले सल्याने ते भाजपाला मारक ठरेल. परंतु एक देखील बाब नजरेआड करता येत नाही ती म्हणजे, गेले प्रदीघ काळ सत्ता नसल्याने येथील कॉँग्रेस दुबळी झाली आहे. काही भागात तर कॉँगेसचे अस्तित्व देखील शोधावे लागेल अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या स्वच्छ प्रतिमेचाच भाजपाला येथे फायदा होईल अशी चर्चा आहे. दिल्ली या राजधानीच्या शहरातही कॉँग्रेसला मोठे आव्हान आम आदमी पक्षाने निर्माण केले आहे. निवडणुकांच्या अनेक चाचणी निकालातही आम आदमी पार्टी दिल्लीत महत्वाची भूमिका बजावणार असे निदर्शनास आले आहे. परंतु त्या पक्षाचे देखील उखळ पांढरे झाली आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये आम आदमी पार्टीचा उमेदवार पैसे गेताना रंगेहाथ पकडला गेला आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीला फार मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच अरविंद केजरीवाल अण्णांना आपल्या बाजूने निवडणुकीत प्रचार करण्याच आग्रह करीत आहेत. परंतु अण्णांचा याला विरोध आहे. अर्थात अण्णांनी एखादी प्रचार सभा दिल्लीत घेतली तरी आम आदमी पार्टीविषयी निर्माण झालेली नाराजी काही दूर होणारी नाही. राजस्थानातही सध्या सत्तेवर असलेल्या कॉँग्रेसला आपली सत्ता टिकविण्यासाठी फार मोठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे सर्वच आघाड्यांवर कॉँग्रेसला सहज विजय मिळणारा नाही. अशा वेळी भाजपालाही मध्यप्रदेश व छत्तीसगढ वगळता अन्य राज्यात काही सहज विजय मिळणार नाही. यावेळी भाजपाची सर्वात मोठी मदार ही नरेंद्र मोदींवर आहे. मोदी हे देशाचे भावी पंतप्रधान असल्याच्या थाटात वावरत असतात आणि त्यांनी आपल्या नावाची तशी हवा तयार करण्यात मोठे यश मिळविले आहे. परंतु अशा प्रकारच्या हवेमुळे काही मते मिळतातच असे नाही. अनेकदा निवडणुकांच्या सभांना मोठी गर्दी झाली की आपला विजय नक्की असे राजकीय पक्षांचे गणित असते. परंतु ही गणिते अनेकदा खोटी ठरली आहेत. त्यामुळे मतदारांच्या मनाचा नेमका ठाव घेणे कठीण असते. मात्र लोकांमधील सार्वत्रिक नाराजी ही कॉँग्रेसवर व त्याच्या जोडीला भाजपावरही आहे हे स्पष्ट दिसते आहे. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉँग्रेसेत्तर व भाजपावगळता अन्य समविचारी डाव्या पक्षांची एक स्वतंत्र आघाडी स्थापन करावी लागणार आहे.
-----------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel