-->
संपादकीय पान--चिंतन-- २९ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
बाल विज्ञान परिषदेचा स्तुत्य उपक्रम
------------------------------
सध्या विविध शााळांमध्ये विज्ञान प्रदर्शने आयोजित केली जात आहेत. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली २० वर्षे नियमितपणे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित केली जाते. या परिषदेच्या माध्यमातून बालकांना विशेषत: ग्रामीण भागातील बालकांना आपल्यापाशी असलेल्या कल्पकतेला वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून ही मुले संशोधकता आणि उद्यमशीलतेच्या जोरावर आपल्या भोवतालच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद प्रकल्प हा वैज्ञानिक संशोधक प्रकल्प असतो. लहान वयातच मुले आपल्या निवडलेल्या समस्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून तो प्रकल्प शास्त्रोक्त पद्धतीने मांडतात. ही शास्त्रोक्त पद्धत कुठल्याही पातळीवरच्या संशोधनात सारखीच असते. अगदी पीएच.डी.चा अभ्यास, संशोधन, प्रकल्प पण याच पद्धतीने करावयाचा असतो. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद संशोधन प्रकल्प करताना दिलेल्या मुख्य विषयाच्या अंतर्गत एखादा उपविषय मुलांना निवडावा लागतो. या उपविषयांतर्गत एखादी समस्या निवडून तिचे निराकरण करावे लागते. यासाठी प्रथमत: प्रास्तविक, नंतर प्रकल्पाचे उद्दिष्ट, गरज मांडावी लागते. संशोधन प्रकल्पात गृहीतक महत्त्वाचे असते. हे गृहीतक नोंदवावे लागते; यानंतर कार्यप्रणाली. या कार्यप्रणालीत सर्वेक्षण, प्रयोग पद्धत, निरीक्षण याचा समावेश असतो. या सर्वांची नोंद व मांडणी करावयाची असते. आपण केलेल्या नोंदी अथवा माहिती यांचे विश्लेषण करून गृहीतकाची पडताळणी करावी लागते. हे सर्व झाल्यावर प्रकल्पाचे निष्कर्ष व समस्यापूर्ती यांचा वेध घ्यायचा असतो. हे सर्व गणिती पद्धतीने मांडावे लागते. शेवटी आपला प्रकल्प पुस्तकी न राहता त्याचा समाजाला कसा उपयोग होईल व त्यासाठी भविष्यात काय करावे लागेल, हे पण विशद करावे लागते. १९९८ मध्ये ठाण्यातील मुलांनी गणपती विसर्जनाचा तलावांवर होणारा परिणाम हा वैज्ञानिक संशोधक प्रकल्प याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.  राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद मुख्य विषय दर दोन वर्षांनी बदलत असते. २०१२-२०१३ या वर्षाकरिता मुख्य विषय ऊर्जा-शोध, संसाधने आणि संवर्धन हा आहे. ऊर्जा समस्या आज गावपातळीपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सर्वांनाच भेडसावत आहे.
ऊर्जा निर्माण करणारी नैसर्गिक संसाधने अतिवापरामुळे कमी होत चालली आहेत. यामध्ये लाकूड, दगडी कोळसा व पाण्याचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे. यासाठी नवीन अपारंपरिक, अक्षय्य ऊर्जा देणारी नवी संसाधने आणि तंत्रज्ञान याचा शोध व वापर करणे आवश्यक आहे. सध्याच्या काळातली ही गंभीर समस्या संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा व आपल्या परीने सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील विद्यार्थी करीत आहेत. या विज्ञान चळवळीत खेड्यापाड्यात राहणार्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे, ही खरी आनंदाची गोष्ट आहे. विज्ञानाचा जागर शासकीय अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक व विद्यार्थी अतिशय उत्साहाने करीत आहे.  गेली १२ वर्षे जिज्ञासा ट्रस्ट आदिवासी बाल विज्ञान परिषद ठाणे व इतर आठ जिह्यांत आयोजित करीत होती. या वर्षी आयुक्त, एकात्मिक आदिवासी विकास, आयुक्तालय नाशिक यांच्या   सहकार्याने उर्वरित महाराष्ट्रातील नाशिक, अमरावती व नागपूर या विभागातील आदिवासी वस्ती असलेल्या आणखी १८ जिल्ह्यांतून आयोजित करीत आहे. या शाळांमधील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती व मार्गदर्शन मिळावे म्हणून ठिकठिकाणी कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. यातूनच आपल्याकडे भविष्यातले वैज्ञानिक घडत असतात. मुलांना लहानपणापासून विज्ञानाची आवड निर्माण केली पाहिजे. यातून प्रत्येक जण काही त्याच विषयात रस घेऊन अभ्यास करेल असे नाही तर त्याला यातून वैज्ञानिकदृष्टी लाभत असते. तरुण पिढीचे भविष्य यातून चांगल्या तर्‍हेने घडू शकते. त्यामुळेच बाल विज्ञान परिषदेचा हा उपक्रम स्तुत्य ठरावा.
-------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel