-->
स्पुटनिकचे आगमन

स्पुटनिकचे आगमन

16 एप्रिलच्या अंकासाठी अग्रलेख
स्पुटनिकचे आगमन कोरोनाचा संसर्ग जोरात होत असताना त्याला अटकाव करण्यासाठी एकीकडे आता जनतेवर निर्बंध लादत असताना त्याचगतीने लसीकरण करणे गरजेचे ठरले आहे. सध्या आपल्याकडे दोनच लसी मान्यताप्राप्त आहेत. त्यातील कोव्हिशिल्ड ही सिरम इन्ट्टिस्ट्यूटने उत्पादीत केलेली एक लस आहे व दुसरी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस सरकारने मान्य केली आहे. परंतु सध्या या लसींचा पुरवठा पुरेसा नाही. कारण त्यांचे उत्पादन आजही मर्यादीत आहे. त्यातील सिरमची ही लस ऑक्सफर्ड व अस्ट्राझेंका यांच्या संयुक्त संशोधनातून तयार झाली आहे तर भारत बायोटेकची लस ही पूर्णत भारतीय बनावटीची आहे. कोव्हिशिल्ड भारतात दरमहा सहा कोटी डोस उत्पादीत करते तर कोव्हॅक्सिन दरमहा ५० लाख डोस निर्मिती करते. त्यामुळे सरकारने दरमहा पंधरा कोटी लोकांना लस देण्याचे कितीही महत्वाकांक्षी उदिष्ट निश्चित केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आपल्याकडे मागणीच्या तुलनेत पुरवठा फारच कमी होत आहे. त्यामुळे सध्याच्या लसींचे उत्पादन वाढवित असताना अन्य देशांतील चांगल्या व माफक दरात उपलब्ध असणाऱ्या लसींची आयात करणे हाच त्यावरील उपाय आहे. त्यादृष्टीने सरकारने रशियाच्या स्पुटनिक-५ या लसीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अन्य काही लसींनाही मान्यता देण्याच्या निर्णयापत सरकार आले आहे त्याचे स्वागत झाले पाहिजे. ऱशियाने स्पुटनिक हे नाव त्यांच्या जगतिक विक्रम केलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहावरुन दिले आहे. स्पुटनिक नावाचा उपग्रह (त्यावेळचे सोव्हिएत युनियन) रशिय़ाने १९५७ साली सर्वात प्रथम अवकाशात सोडला होता. अशा प्रकारे सर्वात प्रथम उपग्रह सोडून जगाला थक्क करुन सोडले होते. आता देखील स्पुटनिक लस असाच विक्रम करील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. भारतात या रशियन लसीचे उत्पादन करण्याचा डॉ. रेड्डीज लॅबने करार रशियन कंपनीशी केला आहे. परंतु त्यांचे उत्पादन सुरु व्हायला अंदाजे अजून चार महिने लागतील. तोपर्यंत डॉ. रेड्डीज ही लस आयात करुन देशात वितरीत करणार आहे. ही लस सध्या आयात करीत असल्याने प्रत्येकी अंदाजे ७०० रुपयांना पडेल व त्याचे दोन डोस महिन्यांच्या अंतराने घ्यावे लागतील. भारतात तिचे उत्पादन सुरु झाल्यावर त्याची किंमत थोडीफार कमी होईल असा अंदाज आहे. सुरुवातीस स्पुटनिकचे रशियाने चाचणी अहवाल प्रसिध्द केले नव्हते. सर्वात प्रथम ही लस रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी व त्यांच्या लेकीने घेतली होती. आता या लसीचे रशियात चांगले परिणाम दिसत आहेत व त्यामुळेच आता भारतात तिचे आगमन होऊ घातले आहे. आता स्पुटनिकने त्यांचे चाचणी अहवालही प्रसिद्द केले आहेत व त्यानुसार स्पुटनिकची परिणामकारकता ९१.६ टक्के आहे. त्याउलट कोव्हिशिल्डची परीणामकारकता ८१ टक्के व कोव्हॅक्सिनची ७१ टक्के आहे. स्पुटनिक सर्व वयोगटासाठी फायदेशीर असल्याचे त्यांचा चाचणी अहवाल सांगतो. सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना देशात लसीकरण करुन कोरोनाला अटकाव करणे हाच एकमेव उपाय आता शिल्लक राहिला आहे, त्यामुळे सरकारने केवळ देशातील लसींच्या उत्पादनांवर अवलंबून न राहता अन्य लसीं आयात करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. जगात आता झपाट्याने लसीकरण सुरु झाले आहे. त्यात प्रामुख्याने विकसीत जग पुढे आहे. इस्त्रायलमध्ये ५४ टक्के व अमेरिकेच्या २२ टक्के लोकसंख्येला लसीकरण करण्यात आले आहे. त्यातुलनेत भारत बराच मागे पडला आहे. १६ जानेवारीपासून आपल्याकडे सुरु झालेल्या लसीकरणाच्या मोहिमेत आजवर ११ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. हा आकडे मोठा दिसत असला तरीही एकूण लोकसंख्येच्या एक टक्काही हे प्रमाण भरत नाही. त्यामुळे आपल्याला झपाट्याने लसीकरण करावे लागणार आहे. केवळ स्पुटनिकला परवानगी देऊन भागणार नाही तर जगातील अन्य काही लसींना देखील आमंत्रित करावे लागणार आहे. अर्थात यातील काही लसी या महागड्या आहेत. फायझर कंपनीची लस ही जगात सर्वात महाग आहे. ती महाग असली तरी तिची परिमाणकता १०० टक्के असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे आपल्याकडे ज्यांना ती लस घेणे आर्थिकदृष्ट्या परवडते त्यांना तो पर्याय खुला केला पाहिजे. यातून आपल्याकडे लसीकरणाला वेग येऊ शकतो. ज्या देशात कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनने देखील तीन लसी तयार केल्या आहेत. मात्र त्याचे परिक्षण जाहीर केलेले नाहीत. चीनने आपल्या देशातील नागरिकांना चीनमध्येच निर्मिती केलेली लस देणे पसंत केले आहे. त्याशिवाय त्यांनी जवळपास दोन डझन देशांना आपली लस निर्यात केली आहे. परंतु आपल्याकडे चीनच्या लसीबाबत सांशकता आहे. चीनने जर आपले लसीचे अहवाल दिले व ते प्रभावी ठरले असतील तर ती लस देखील आपल्याला घेता येऊ शकते. आपल्याकडे देशातील १३० कोटी जनतेला लसीकरण करणे हे एक मोठे आव्हान आहे. आव्हान या अर्थाने की, सर्वांपर्यत लस पोहोचविणे आणि ती देखील कमीत कमी वेळेत दिली जाणे हे महत्वाचे आहे. सध्या कोरोना मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली या सारख्या मोठ्या शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अशा मोठ्या शहरात केवळ वयोगट न पाहता सर्वसाधारण सर्वांना लसीकरण होणे गरजेचे ठरले आहे. स्पुटनिक आता आल्याने आपल्याकडे लसीचा एक तिसरा नवा पर्याय खुला झाला आहे.

0 Response to "स्पुटनिकचे आगमन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel