-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १८ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
पावसाचा दिलासा
-----------------------------
गेल्या चार दिवसात मुंबई, कोकणसह राज्यातील बहुतांशी भागात पावसाने आपली हजेरी लाव्याने लोकांना खर्‍या अर्थाने दिलासा मिळाला आहे. मध्य प्रदेशात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मॉन्सून सक्रिय झाला. पश्‍चिम किनारपट्टीलगत अरबी समुद्रात समांतर असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे कोकण, मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मुंबईतील कुलाबा येथे २३० मिलिमीटर पाऊस झाला. विदर्भातही बर्‍याच ठिकाणी अतिवृष्टी झाली. दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. कोकणकिनारपट्टीवर पाऊस झाल्याने पेरण्या आता जोरात सुरु झाल्या आहेत. गेले महिनाभर पावसाने दडी मारल्याने या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे यंदा दुबार पेरणीचे संकट उभे राहाणार की काय अशी भीती वाटत होती. मात्र हे संकट आता टळले आहे आणि बळीराजा आता सुखावला आहे. गुजरात ते केरळदरम्यान समुद्रावर किनार्‍याला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने कोकण, गोवा, मुंबई आणि घाटमाथ्यावर पाऊस जोरदार बरसला. रायगड जिल्ह्यातील उरण येथे १६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हिंगणा १८० मिलिमीटर, कळमेश्‍वर १६० मिलिमीटर, उरमेर येथे १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर येथे १८० मिलिमीटर पाऊस पडला. तर दक्षिण महाराष्ट्रातही पावसाला सुरवात झाली असून, गगनबावडा येथे १६० मिलिमीटर पाऊस पडला आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकण, विदर्भासह, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, ईशान्येकडील राज्ये, मध्य प्रदेश, जम्मू- कश्मीर, हिमाचल प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, पश्‍चिम राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, अंदमान निकोबार, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप बेटांवर बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडमध्ये बर्‍याच ठिकाणी, तर सीमांध्रच्या काही भागांत जोरदार पाऊस पडला. हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्‍चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक किनारपट्टीवर मॉन्सून सक्रिय झाला आहे. पश्‍चिम राजस्थानमध्ये उष्णतेची मोठी लाट होती. त्यामुळे तेथे पावसाने हजेरी लावल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. गुजरातपासून केरळपर्यंत पश्‍चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाच्या पट्टा कायम आहे. विदर्भातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता जमिनीवर आले असून, ओडिशा आणि छत्तीसगडकडे सरकले आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पंजाबपासून पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गुजरातलगत उत्तरपूर्व अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये उत्तरपूर्व भागात ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवरही हवेचा चक्रावाताची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने जुलै महिन्यात दडी मारल्याने कोयना धरणाने नवा तळ गाठला होता. परिणामी वीज निर्मितीवर परिणाम होण्याचा धोका होता. शेवटी कोयना पाणलोट क्षेत्रात सलग सहा दिवस कोसळणार्‍या पावसाने चांगलाच जोर धरला व धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या ३० तासांत धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात २३१ एकूण १,१०३ मि.मी., नवजा विभागात २३९ एकूण १,३१० तर, महाबळेश्वर विभागात १९० एकूण ८४२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना शिवसागराची जलपातळी सात फुटाने वाढून २,०५२ फूट तर, पाणीसाठा अडीच टीएमसीने वाढून १८.४७ टीएमसी आहे. धरणाचा पाणीसाठा १७.५४ टक्के आहे. धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठीही पावसाची रिपरिप कायम आहे. त्यामुळे खरीप हंगामाला दिलासा मिळत असल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. कोयना धरणक्षेत्रात सध्या जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने शिवसागराची जलपातळी झपाटयाने वाढत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईसारख्या महानगरात पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार होता. परंतु सध्या तेथील पाणीकपातीचे संकट काही काळ तरी टळले आहे. मुंबई-ठाण्याला पाणी पुरवठा करणारे चार तलाव आता भरण्यास सुरुवात झाल्याने मुंबईकरही खर्‍या अर्थाने सुखावला आहे. राज्यातील सर्वच धरणांमध्ये केवळ पंधरा दिवस पुरेल ऐवढा साठा होता. परंतु आता वरुणराजा बरसल्याने या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. मात्र पाणी कपातीचा फटका अनेक औद्योगिक प्रकल्पांना बसला आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे दोन्ही प्रकल्प अपुर्‍या पाण्यामुळे बंद करावे लागले होते. मात्र आता यातील एक प्रकल्प पुन्हा कार्यान्वित झाला आहे. पावसाच्या आगमनामुळे अशा प्रकारे जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होण्याच्या मार्गावर आहे. पावसाने गेले महिनाभर दडी मारल्याने आपल्यावर काय परिस्थिती उद्भवू शकते याची झलक आपल्याला पहायला मिळाली. त्यामुळे पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब हा आपल्यासाठी मोलाचा आहे तो जमीनीत कसा मुरेल व आपल्याला गरज लागल्यावर कसा वापरता येईल ते पाहिले पाहिजे. त्याचबरोबर कोकणात ऐवढा पाऊस पडतो परंतु बहुतांशी तो समुद्राला जाऊन मिळतो. हे पाणी साठवून जर आपण ज्या भागात पाऊस कमी पडतो तिकडे पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. केंद्र सरकारने आता नदी जोड प्रकल्प गांभीर्याने घेतला आहे त्याचे स्वागत व्हावे.
----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel