-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १८ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे का वळतात?
------------------------------------
गेल्या काही वर्षात अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे झाल्याचे उघड झाल्याने त्यांना कोणती शिक्षा करावी असा मुलभूत प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अर्थात अशा मुलांना कठोर शिक्षा द्यावी असे काही मानसशास्त्रज्ञांना वाटत नाही. मात्र अलिकडेच बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी अलिकडेच यासंबंधी केलेल्या विधान पाहता या बाबत पुन्हा एकदा चर्चेचे मोहोळ उठले आहे. अल्पवयीन मुलांकडून बलात्कारासारखा गंभीर गुन्हा घडल्यास त्यांना प्रौढ गुन्हेगारांप्रमाणेच फाशीसारखी कठोरतम शिक्षा देण्यात यावी, असे विधान मनेका गांधी यांनी केले. त्यांच्या या विधानात जनतेच्या मनात दडलेल्या भावनेचा उद्रेक आहे. निर्भया प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाने दाखवलेले क्रौर्य पाहता प्रथमदर्शनी अशा स्वरूपाची शिफारस अयोग्यही म्हणता येत नाही. मात्र, हा बदल करण्यासाठी प्रथमत: संसदेतील कायदेमंडळ आवश्यक ती पावले उचलणार का, केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि भाजपचे सरकार त्या अनुषंगाने पुढाकार घेणार का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. भावनेच्या भरात कायदे  तयार केले जाऊ शकत नाहीत. प्रत्येक कायदा करताना त्याचे होणारे दीर्घकालीन परिणाम हे तपासावे लागतात. अल्पवयीन मुलांना द्यावयाच्या बाबतीत तर विशेष खबरदारी घेण्याची गरज असते. अनेकदा भावनेपेक्षाही मानवी मूल्ये आणि तत्त्वांचे बळ मोठे असते. त्या आधारावर अस्तित्वात आलेले कायदे गुन्हेगाराला शिक्षा देताना चारित्र्य सुधारणेची संधीही देत असतात. तशीच संधी निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराला का देऊ नये, असा युक्तिवाद आपल्याकडील मानवतावादी संघटना एका बाजूला करताना दिसताहेत. हा युक्तिवाद पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनेचा अनादर करणारा भासत असला तरीही त्यात सुधारणेच्या शक्यता दडलेल्या आहेत, हेही विसरून चालणार नाही. जर्मनीसारख्या देशाने तर अपवादात्मक परिस्थितीत सुधारणेची शक्यता गृहीत धरता १८ ते २१  या दरम्यान वय असलेल्या गुन्हेगारांना अल्पवयीन  गुन्हेगार म्हणून गृहीत धरण्याची, त्या अनुषंगाने शिक्षेची तरतूद करण्याची कायद्याने मुभा दिली आहे. अल्पवयीन मुले गुन्हा करताना कुठल्या मानसिकतेत असतात, ती मूलत: गुन्हेगारी प्रवृत्तीची असतात का, या सगळ्या बाबींचा मानसशास्त्रीयदृष्ट्‌या विचार या ठिकाणी केलेला आढळतो. तसाच तो भारतासारख्या प्रगतिशील देशातही व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त झाल्यास ते चुकीचे ठरू नये. आपल्याकडे अल्पवयीन मुलांमध्ये गेल्या काही वर्षात गुन्हेगारी का वाढली ते तपासावे लागेल. याची अनेक कारणे असू शकतात. या कारणांचे मूळ हे सामाजिक व आर्थिक प्रश्‍नांतही दडलेले असू शकते. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात आपल्याकडे आर्थिक उदारीकरणाबरोबरीने समाजात मुक्तपणा आला आहे. अर्थात हा मुक्तपणा आलेला असताना आपण आपल्याकडील जुनी संस्कृती यांचा आपण योग्य मेळ घालू शकलेलो नाही. त्यामुळे आपल्याकडे एककीडे वातावरणातील मुक्तपणा आणि त्याचे विकृतीकरण अशा पेचात आपली तरुण पिढी अडकलेली दिसते. अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण होताना आपल्याला दिसते. यातून त्याचे लैंगिक गैरसमज वाढतात आणि परिणामी त्यांच्या हातून अनेकदा लैंगिक गुन्हे होतात. लैंगिक शिक्षणाचा अभाव आपल्याकडे आहे. आपण अजूनही मुलांना लैंगिक शिक्षण देण्यास मनापासून तयार नसतो. याचा परिणाम असा होतो की त्यांचे लैंगिक अज्ञान वाढते. यातूनही त्यांच्या हातून लैंगिक गुन्हे घडण्याचा धोका असतो. त्याचबरोबर अनेक गुन्ह्यांमागे आर्थिक कारणेही अवलंबून असतात. अशा प्रकारे गुन्हे केलेल्या कोवळ्या मुलांना जबर शिक्षा करण्याच्या हेतूने जर प्रौढांप्रमाणे शिक्षा केल्या तर त्यांच्यात सुधारणा होण्याऐवजी त्यांच्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे मनेकाबाईंनी यासंबंधी कितीही जोरदारपणे आपली भूमिका मांडली असेल तरी प्रत्यक्षात तसे आणण्यास तरुण पिढीवर अनेक परिणाम घडू शकतात.
--------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel