-->
अन्नधान्यात स्वयंपूर्ण मात्र भूकमुक्त नाही!

अन्नधान्यात स्वयंपूर्ण मात्र भूकमुक्त नाही!

गुरुवार दि. 26 ऑक्टोबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
अन्नधान्यात स्वयंपूर्ण
मात्र भूकमुक्त नाही!
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता तब्बल सात दशके ओलांडली आहेत. स्वातंत्र्यानंतर आपण अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हतो. आता मात्र आपण अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत, एवढेच कशाला आपण अन्नधान्याची निर्यातही करतो. मात्र असे असले तरीही आपल्या देशातील जनता भूकमुक्त झालेली नाही, हे मोठे दुर्दैव आहे. आजही आपल्याकडे आदिवासी पाड्यावर कुपोषणाचे बळी झाल्याच्या घटना आढळतात. एकीकडे आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत असे मोठ्या गौरवाने सांगतो. मात्र दुसरीकडे भूकेने लोक मरत आहेत, बालके कुपोषणाने आपला जीव सोडत आहेत. यासंदर्भात राज्यकर्ते मात्र शांत आहेत. शासकीय यंत्रणा पूर्णपणे ढीम्म आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा तो भुकेला होता, पाच दशकांहून अधिक काळात ही परिस्थिती कायम आहे, असे मत नोबल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले होतेे. आंतरराष्ट्रीय अन्नधोरण संशोधन संस्थेने जाहीर केलेल्या जागतिक भूक निर्देशांकात भारताने शतक ठोकले आहे. महत्वाची बाब म्हणजे 2014 मध्ये 55 व्या स्थानावर असलेला आपला देश केवळ तीन वर्षांत 100 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. जगातील 33 टक्के कुपोषित भारतात राहतात. अर्थात आपली लोकसंख्या मोठी असल्याने ही संख्या वाढलेली वाटते. ही वस्तुस्थिती असली तरीही 125 कोटीहून अधिक लोकसंख्येच्या देशात दररोज 20 कोटी लोक उपाशी झोपतात. दररोज सात हजार हून अधिक भारतीय भुकेमुळे आपला प्राण सोडतात. कुपोषण ही या देशातील महाभयंकर समस्या असली, तरी त्याची चर्चा लोकांमध्ये अथवा निवडणूक जाहीरनाम्यांमध्येसुद्धा नसते. हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी अलीकडे या देशातील भूक आणि कुपोषणाच्या समस्येवर अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे. कुपोषणाविरुद्ध लढण्यासाठी पोषणयुक्त अन्नधान्ये निर्मितीची गरज असल्याचे ते सांगतात. देशातील कृषी शास्त्रज्ञांनी हे एक आव्हान समजून अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला या पिकांमध्ये अशा वाणांची निर्मिती करायला हवी. संकरित वाणांची निर्मिती करताना केवळ उत्पादनवाढ हे लक्ष न ठेवता त्यांचे आहारमूल्यसुद्धा वाढविले पाहिजे. रताळ्यासह भात, गहू, बाजरी यांच्या सत्त्वयुक्त जातींची निर्मिती आणि त्यांचा शेतकर्‍यांमध्ये प्रसार करून आफ्रिकेतील अनेक देशांचा प्रवास कुपोषणमुक्तीकडे चालू आहे. आपण अशा बाबींचा विचार करताना दिसत नाही. अनेकदा आपण अन्नधान्य उत्पादन काढतो परंतु त्याचा उपयोग जनतेला होतो किंवा नाही याचा कुणी विचारही करीत नाही. जे लोक अन्न धान्य बाजारातून खरेदी करु शकत नाहीत त्यांचे काय? त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळम्याची व्यवस्ता आपण आजवर केली होती. परंतु तेथे भ्रष्टाचार होतो असे सांगत ही व्यवस्था पण मोडीत काढली. त्यामुळे ज्यांच्याकडे अन्न धान्य नाही त्यांच्यापर्यंत ते कसे पोहोचेल याची जबाबदारी सरकार घेत नाही. अन्नधान्य हा हक्क असल्याचे सरकार सांगते. मात्र दुसरीकडे जनता उपाशी मरते देखील आहे. 
अमेरिकेसारख्या प्रगत देशात कृषी विभागाच्या वतीने तेथील नागरिकांसाठी रोजच्या आरोग्यपूर्ण आहारासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. अशाच प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अनेक युरोपियन देशांद्वारेसुद्धा प्रसारित केल्या जातात. अशा वेळी कुपोषणमुक्तीकडे नेणारे संशोधन आणि त्यांचा सर्वासामान्यांमध्ये प्रसार हे काम देशात एक चळवळ म्हणून राबवावे लागेल. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांकाने आपल्या देशाचा समावेश भूकेबाबत अत्यंत गंभीर परिस्थिती (हाय एन्ड ऑफ सीरियस कॅटेगरी) असलेल्या देशांच्या यादीत झालेला आहे. आता तरी आपण जागे होणार आहोत की नाही? भूक आणि कुपोषणाची समस्या ही गरिबी आणि शिक्षणाशीही संबंधित आहे. एका सरकारी सर्वेक्षणानुसार देशातील बहुसंख्य शेतकरी केवळ 1700 रुपये प्रतिमहिना उत्पन्नावर जगत आहेत. अशा वेळी शेतमजुरांसह इतर मोलमजुरीची कामे करणार्‍या लोकांचे जीवन कसे असेल, याचा अंदाज यायला हवा. शेतकर्‍यांसह सर्वसामान्य लोकांच्या उत्पन्नात वाढ आणि त्यांच्यात पोषक आहारबाबत जागृती यावरही शासनाला काम करावे लागेल. आपल्याकडे रोजगार हमी योजनेअंतर्गत अन्नधान्य दिले जाते. याचा ग्रामीण भागातील लोकांना जगण्यासाठी मोठा आधार मिळत होता. मात्र यात भ्रष्टाचार होऊ लागल्यापासून हे बंद करण्यात आले. त्याचबरोबर आपल्याकडे अन्नधान्याची नासाडी ही मोठ्या प्रमाणात होते. एका पाहाणीत असे आढळले होते की, कापणी झाल्यावर त्याची योग्य साठवणूक न झाल्यामुळे लाखो टन अन्नधान्य वाया जाते. त्यानंतर आपण वाहतुकीतही मोठ्या प्रमाणात अन्न वाया घालवितो. त्याहीपेक्षा आपण जेवताना अनावश्यक खाद्यवस्तू घेतल्यामुळे अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. आपल्याकडे अशा प्रकारची अन्नदान्याची नासाडी ही मोठ्या प्रमाणात होते. आपल्याकडे ही नाशाडी टाळली तरी अनेकांची भूक भागविली जाऊ शकते. आपण हरितक्रांती करुन अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केले. आता पुढील टप्प्यात आपल्याला कमी जागेत जास्तीत जास्त पीक घेण्यासाठी नवीन बियांणांचा शोध लावून त्यांचे उत्पादन घ्यावे लागणार आहे. यातून आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांना अन्नधान्य मिळू शकेल. त्याहून सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, सध्याचे असलेले धान्य वाटप गरीबांना झाले पाहिजे. ज्यांची आर्थिक क्षमता अन्नधान्य खरेदी करण्याची नाही त्यांच्यापर्यंत धान्य कसे पोहोचेल याचा विचार सरकारने केला पाहिजे. मात्र हे सरकार याचा विचार करील का, असा सवाल आहे.
----------------------------------------------------------------- 

Related Posts

0 Response to "अन्नधान्यात स्वयंपूर्ण मात्र भूकमुक्त नाही!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel