-->
झिंकाचा जागतिक धोका

झिंकाचा जागतिक धोका

संपादकीय पान सोमवार दि. ०८ फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
झिंकाचा जागतिक धोका
जागतिक आरोग्य संघटनेने झिंका विषाणूच्या प्रसारामुळे जागतिक आपत्तीची परिस्थिती जाहीर केली आहे. या विषाणूमुळे होणार्‍या रोगात ब्राझीलमध्ये अनेक नवजात बालकांच्या मेंदूची वाढ खुंटली असून अमेरिकेतही काही मुले मेंदूत व्यंग घेऊन जन्माला आली आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेची तातडीची बैठक जीनिव्हा येथे झाली, त्या वेळी या विषयातील तज्ज्ञ उपस्थित होते. झिंका विषाणूमुळे नेहमीच्या फ्लूसारखा ताप येतो. दोन दिवसांनी तो कमी होतो. अंगावर थोडे चट्टे उठतात, मात्र तेदेखील काही दिवसांनी कमी होतात. ७० ते ८० टक्के रुग्णांना झिंका विषाणूंची लागण झाल्याचे लक्षातही येत नाही. डेंग्यू, चिकनगुनिया, पितज्वरप्रमाणेच झिंका विषाणूही एडिस इजिप्ती डासांमार्फत पसरतो. दक्षिण अमेरिकेतील वीस देश व कॅरेबियन बेटांवर ही साथ पसरली आहे. अमेरिका व युरोपमध्ये स्थानिक पातळीवर संसर्ग झाल्याची नोंद नाही. जागतिक आरोग्य संघटनेने झिंका विषाणूंची साथ आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. २०१४ मध्ये इबोलासाठी अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. या विषाणूंची साथ पसरलेल्या दक्षिण अमेरिकेत आणि कॅरेबियन बेटांवर प्रवासासाठी जाण्याविषयी गर्भवती महिलांनी पुनर्विचार करावा अशा सूचना युरोप-अमेरिकेतील देशांमध्ये देण्यात आल्या आहेत. भारतात झिंका विषाणूंचा एकही रुग्ण आढळलेला नाही, मात्र या साथीवर लक्ष ठेवण्यासाठी तांत्रिक समिती नेमण्यात आली आहे. गेल्या वर्षी या विषाणूमुळे ४९ नवजात बालके दगावल्याचे म्हटले जाते. झिका विषाणूंचा प्रौढांना त्रास होत नसला तरी महिलांना गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत या विषाणूची लागण झाली तर गर्भावस्थेतील मुलाच्या मेंदूची वाढ खुंटते. आकाराने लहान डोके असलेल्या या मुलांना बोलता किंवा चालता येत नाही. अनेक मुले दगावतात. मात्र झिंका विषाणूंचा या आजाराशी नेमका संबंध अजूनही निश्चित झालेला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. तसेच या विषाणूंवर अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. झिका विषाणूच्या प्रसारास वाढते तापमान खूपच पोषक असल्याचे निष्पन्न झाले आहे. एडिस एजिप्ती या डासामुळे या विषाणूचा फैलाव होतो. त्याच डासामुळे डेंग्यू व चिकुनगुन्या, पीतज्वर या रोगांचा प्रसार होतो. डासांमुळे माणसाला अनेक रोग होतात त्यामुळे त्यांच्यापासून बचाव करणे आवश्यक असते. एल निनो परिणामामुळे अनेक ठिकाणी तापमान वाढून डासांची उत्पत्ती वाढली. परिणामी झिंका विषाणूचा प्रसारही वाढला असा वैज्ञानिकांचा दावा आहे. पूर्वीही झिका विषाणूचे काही रुग्ण होते पण त्याचे गांभीर्य फार मोठे नव्हते. अलीकडे हवामान बदलांमुळे या विषाणूचा प्रसार मोठया प्रमाणात झाला आहे. एल निनो या प्रशांत महासागरातील सागरी जलतापमानवाढीच्या कारणास्तव जगात अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे.  झिंकाचा संबंध एल निनो परिणामाशी जोडणे जरा घाईचे होईल. तापमान वाढते त्याप्रमाणे एडिस एजिप्ती या डासाची पैदासही वाढते त्यामुळे झिकाच नव्हे, तर डेंग्यू व इतर रोगांचा प्रसार वाढतो असे डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ बिल रिनसेन यांचे मत आहे. तापमानवाढीने डास वाढतात व त्यामुळे रोगाचा संसर्ग वाढतो, त्यानंतर विषाणूंची संख्या वाढत जाते व डास ते फार आधीच माणसापर्यंत पोहोचतात. डासांची उष्मागतिकी ही तापमानावर अवलंबून असते. झिंका पसरणारी ठिकाणे ही जास्त तापमानाची व दुष्काळी आहेत. झिंका विषाणूचा वैज्ञानिकांनी फार कमी अभ्यास केला आहे, तुलनेने डेंग्यू व चिकुनगुन्याचा जास्त अभ्यास झाला आहे. जगात दरवर्षी ४० कोटी लोकांना डेंग्यू होतो व त्यांना काही वेळा रुग्णालयात दाखल करावे लागते. या रोगाचा प्रसार करणार्‍या डासाच्या आतडयात विषाणू जाऊन त्या रोगाचा नंतर माणसात प्रादुर्भाव होण्यास वेळ लागतो, त्यापूर्वीच डास रोगाचा प्रसार करण्यापूर्वीच मरतो, असे डेव्हिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे टॉम स्कॉट यांचे मत आहेे. उष्ण हवेत थंड रक्ताच्या डासांमध्ये विषाणूची वाढ लवकर होते व तो रोग पसरवतो. वॉशिंग्टन विद्यापीठातील क्रिस्टी एबी यांच्या मते एल निनोमुळे ईशान्य ब्राझीलमध्ये दुष्काळ पडतो, गेल्या वर्षीही दुष्काळ पडला होता. अमेरिकन हवामान संस्थेच्या वार्षिक मेळाव्यात त्यांनी एक शोधनिबंध सादर केला होता. त्यात अमेरिकेत जागतिक तापमानवाढीने डास वाढतात व अमेरिकेतील मिसुरी, टेनिसी, केंटुकी, उत्तर कॅरोलिना, व्हर्जिनिया या राज्यात हा परिणाम दिसून येतो असे म्हटले होते. एका भारतीय कंपनीने यावरची औषध शोधल्याचा दावा केला आहे. परंतु या औषधाला अजूनही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे झिंकाचा धोका अजूनही कायम आहे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "झिंकाचा जागतिक धोका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel